चार्ल्सऐवजी विल्यम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:47 AM2018-01-06T00:47:20+5:302018-01-06T00:48:03+5:30
इंग्लंडच्या इतिहासात राजपदाची वंशपरंपरागत होत आलेली वाटचाल यावेळी थांबण्याची व तीत बदल होण्याची शक्यता मोठी आहे. त्या पदावर असलेल्या महाराणी एलिझाबेथ (दुसºया) यांचे वय ९१ वर्षांचे आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव चार्ल्स (प्रिन्स आॅफ वेल्थ) यांनी त्या पदावर येणे ही परंपरा आहे. मात्र चार्ल्स यांनी त्यांची जनतेतील लोकप्रियता घालविली आहे.
इंग्लंडच्या इतिहासात राजपदाची वंशपरंपरागत होत आलेली वाटचाल यावेळी थांबण्याची व तीत बदल होण्याची शक्यता मोठी आहे. त्या पदावर असलेल्या महाराणी एलिझाबेथ (दुसºया) यांचे वय ९१ वर्षांचे आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव चार्ल्स (प्रिन्स आॅफ वेल्थ) यांनी त्या पदावर येणे ही परंपरा आहे. मात्र चार्ल्स यांनी त्यांची जनतेतील लोकप्रियता घालविली आहे. त्यांचे राजपदावर येणे जनतेलाच मंजूर नसल्याचे अलीकडच्या पाहणीत आढळले आहे. या सर्वेक्षणात त्यांच्या बाजूने अवघ्या १४ टक्के नागरिकांनी त्यांची मते नोंदविली तर त्यांच्या दुसºया पत्नी कॅमिला यांची लोकप्रियता त्याहूनही कमी दर्जाची असल्याचे आढळले आहे. त्यांच्या तुलनेत त्यांचे चिरंजीव राजकुमार विल्यम यांची लोकप्रियता मोठी व ती ७८ टक्क्यांएवढी असल्याचे या सर्वेक्षणात दिसले आहे. तर त्याची पत्नी केट हिला ७३ टक्के लोकांनी आपली पसंती दर्शविली आहे. सामान्यपणे इंग्लंडचे राजपद जगातल्या कोणत्याही राजपदासारखे बापामागून मुलगा किंवा मुलगी असेच आजवर जात राहिले आहे. या पदासाठी जनमत घेण्याची परंपरा कोणत्याही राजेशाहीत नाही. इंग्लंडची परंपरा आताशा बदलली आहे. तेथील राजघराणे संपुष्टात आणावे आणि त्याजागी एखाद्या अध्यक्षाची निवड करावी अशी मागणी त्या देशात बरीच वर्षे सुरू आहे. मात्र राजपदावर आलेल्या आजवरच्या अनेक व्यक्तींनी व विशेषत: आताच्या महाराणी एलिझाबेथ यांनी त्या पदाची लोकप्रियता आपल्या विनयशील वागणुकीने वाढविली आहे. त्यामुळे राजकारणातील सातत्य व प्रतिष्ठा कायम राहावी म्हणून ते पद टिकले पाहिजे असे म्हणणाराही एक मोठा वर्ग त्या देशात आहे. विशेषत: दुसºया महायुद्धात राजघराण्याने दाखविलेली बाणेदार देशनिष्ठा त्याची लोकप्रियता वाढवायला उपयोगाची ठरली आहे. तरीही चार्ल्स यांना राजपद न मिळणे आणि ते त्यांचे चिरंजीव विल्यम यांच्याकडे जाणे याला महत्त्वाचे ठरलेले कारण चार्ल्स यांचे विवाहबाह्य वर्तन आहे. चार्ल्स यांचा पहिला विवाह लेडी डायना या जगविख्यात सुंदर स्त्रीशी झाला होता. मात्र त्या वैवाहिक जीवनातही त्यांचे कॅमिला या मैत्रिणीशी संबंध होते व त्यांची उघड चर्चाही देशात होती. आपली पत्नी लेडी डायना हिलाही चार्ल्स यांनी त्यांच्या अशा संबंधाबाबत सारे सांगून टाकले होते. त्यांच्या संबंधात आलेला दुरावाही त्याचमुळे होता असे तेथे म्हटले जाते. विवाहबाह्य संबंधांना असामाजिक व अनैतिक मानण्याची मानसिकता इंग्लंडमध्ये अजून आहे. तो देश तसाही जास्तीचा परंपराभिमानी व कर्मठ मनोवृत्तीचा आहे. स्वाभाविकच त्याला चार्ल्स यांचे विवाहबाह्य संबंध फारसे आवडले नाहीत. शिवाय चार्ल्स यांनीही स्वत:ला समाजापासून बरेच दूर राखले. त्या तुलनेत विल्यम हे अधिक समाजाभिमुख राहिले आहेत आणि त्यांचा समाजातील सर्व वर्गांशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. या संबंधामुळे त्यांना मिळत असलेली लोकप्रियता चार्ल्स यांना मिळणा-या मान्यतेहून मोठी ठरली आहे. त्याचमुळे महाराणी एलिझाबेथ यांच्यानंतर विल्यम यांनी राजपदावर यावे असे तेथील जनतेला वाटू लागले आहे. राणी एलिझाबेथ यांनी त्यांचे याविषयीचे मत अपेक्षेप्रमाणे गुलदस्त्यात ठेवले आहे. तरीही त्यांच्या जवळची माणसे त्यांचे मत विल्यमला अधिक अनुकूल आहे असे बोलू लागली आहेत. हाच काळ इंग्लंडचे तेरेसा मे सरकारच्याही लोकप्रियतेला घसरण लागली असल्याचा आहे. ब्रेक्झिटचा निर्णय त्यांना नीट अमलात आणता येत नाही आणि त्यांचे सरकारवरचे नियंत्रणही शिथिल झाले आहे असे त्या देशात आता बोलले जाते. लेबर हा त्या देशातला प्रमुख विरोधी पक्ष आता अधिक आक्रमक झाला असून निवडणुका झाल्या तर आपणच सत्तेवर येऊ अशी खात्री त्याला वाटू लागली आहे. त्यामुळे येत्या काही काळात इंग्लंडच्या सरकारातच बदल होईल असे नाही. त्यासोबत त्याच्या राजपदाच्या परंपरेतही बदल होण्याची शक्यता मोठी आहे. लोकसत्ता आणि नामधारी असली तरी राजसत्ता या दोहोंमध्येही एकाचवेळी असा बदल घडून येणे हा योगायोग मोठा व अनपेक्षित म्हणावा असा आहे. मात्र त्यातून इंग्लंडची जगातील प्रतिष्ठा वाढणारीही आहे.