विल्यम-केटला हवाय ‘लो ईगो’ हाउस मॅनेजर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 07:51 AM2023-10-03T07:51:57+5:302023-10-03T07:52:25+5:30
सर्वसामान्यांमध्ये जगभरात सर्वाधिक काळ आणि सर्वाधिक वेळा चर्चा जर कोणाची होत असेल, तर ती ब्रिटिश राजघराण्याची.
सर्वसामान्यांमध्ये जगभरात सर्वाधिक काळ आणि सर्वाधिक वेळा चर्चा जर कोणाची होत असेल, तर ती ब्रिटिश राजघराण्याची. कोणत्या ना कोणत्या कारणानं हे ब्रिटिश राजघराणं कायम चर्चेत असतं आणि हा विषय केवळ ब्रिटनमधीलच लोक नाहीत, तर संपूर्ण जगातील जनता आवडीनं चघळत असते. या राजघराण्यात, त्यातील सदस्यांमध्ये काय चाललंय, ते काय करताहेत, याबाबत अक्षरश: कोट्यवधी लोकांना उत्सुकता असते. अनेकांसाठी विशेषत: ब्रिटिशांसाठी राजघराणं हा आदराचा, कौतुकाचा, अभिमानाचा विषय असला तरी राजघराण्याचं, या घराण्यातील सदस्यांचं पाऊल थोडं जरी वाकडं पडतंय असं त्यांना वाटलं तरी ते त्यावर आपली नाराजी व्यक्त करायला कमी करीत नाहीत. अर्थात त्यांच्या कौतुकातही त्यांची कधीच कंजुसी नसते.
मध्यंतरी काही काळ ब्रिटिश राजघराणं ‘शांत’ होतं. म्हणजे त्यांच्याविषयी फारशी काही चर्चा ऐकीवात नव्हती; पण, आता एका नव्या पण साध्याशाच विषयानं चर्चेची घुसळण पुन्हा सुरू झाली आहे. आता हा विषय आहे तरी काय आणि लोकांमध्ये त्याची एवढी उत्सुकता तरी का आहे?
द प्रिन्स ऑफ वेल्स विल्यम आणि द प्रिन्सेस ऑफ वेल्स कॅथरिन मिडलटन यांचं घर आहे ६० खोल्यांचं! या घराचं व्यवस्थापन पाहण्यासाठी त्यांना एक सीईओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी हवा आहे. मुख्य गोष्ट एवढीच. तरीही जगभरात त्याची ‘बातमी’ झाली आणि लोक ती आवडीनं चघळताहेत. अर्थात त्यात एक छोटीशी गोम आहे. आपल्याला सीईओ हवा, यासाठी त्यांनी एक जाहिरात दिली आहे. ब्रिटनमध्ये ‘ऑजर्स बर्नसन’ नावाची सर्वांत मोठी एक्झिक्युटिव्ह रिक्रूटमेंट फर्म आहे. कुठल्याही ‘भरती’साठी किंवा ब्रिटनमधील कोणत्याही जागांच्या भरतीसाठी या संस्थेला प्राधान्य दिलं जातं. या फर्मनं प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस मिडलटन यांच्या वतीनं त्यांच्या सीईओ पदासाठी नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात आहे चार पानांची आणि या जाहिरातीमुळेच जगभरात चर्चा सुरू झाली आहे.
हा सीईओ त्यांना कसा हवा? ..तर त्याला हाय परफॉर्मन्स टीम तयार करण्याचा पूर्वानुभव असावा, लोकांना त्याला प्रेरित, ‘विकसित’ करता यायला हवं, त्यांच्यात एकीची भावना, सकारात्मक दृष्टिकोन जागता ठेवतानाच त्यांच्यातलं प्रोफेशनल कल्चरही त्याला सातत्यानं पॉलिश करता यायला हवं, त्याला सामाजिक भान हवं, धोरणात्मक निर्णय घेण्याची त्याची क्षमता असावी, तो तत्पर, कर्तव्यदक्ष असावा, अडचणीच्या आणि आणीबाणीच्या प्रसंगी योग्य तसंच धडाडीनं निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यात असावी वगैरे वगैरे...
चार पानांची ही भलीमोठी जाहिरात; पण त्यातील काही मोजक्याच शब्दांवर लोकांची अधिक नजर गेली आहे. राजघराण्याला हा सीईओ कसा हवा, तर तो ‘लो इगो’ असलेला, म्हणजे त्याच्यात अहंकाराचा लवलेश नसावा, तो इमोशनली इंटेलिजन्ट असावा आणि स्ट्राँग सेल्फ अवेअरनेस असलेला असावा! त्याच्यात संवेदनशीलता असावी, तो ‘इमानदार’ असावा, आपल्या कामाशी आणि आपल्या जबाबदाऱ्यांशी प्रामाणिक असावा.
या सीईओवर कोणाचं नियंत्रण असेल? तो कोणाला रिपोर्ट करेल? - तर अध्येमध्ये इतर कोणाशीही बोलण्याची किंवा त्यांना रिपोर्ट करण्याची त्याला गरज नाही. रॉयल फॅमिलीतल्या वरिष्ठ सदस्यांना तो डायरेक्ट रिपोर्ट करू शकतो. आणखीही काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या सीईओवर असतील. तो मुख्यत: काम करेल ते केनसिंग्टन पॅलेस इथे. पण, ‘विंडसर पॅलेस’ला त्याला नियमित प्रवास करावा लागेल, या दोन्हीही ठिकाणी संपर्क ठेवावा लागेल. गरज पडेल त्याप्रमाणे त्याला ब्रिटन आणि इतर ठिकाणी देश-विदेशात जाताना रात्रीचा प्रवासही करावा लागेल. आठवड्यात ३७.५ तास काम त्याला करावं लागेल.
-पण, या कामाचे त्याला किती पैसे मिळतील? त्याबाबत मात्र आत्ताच कुठलीही वाच्यता करण्यात आलेली नाही आणि ते सीक्रेट ठेवण्यात आलं आहे. हा नवा सीईओ कोण असेल, तो कधी कामावर रुजू होईल, त्याच्याकडून प्रत्यक्षात कोणकोणती कामं करवून घेतली जातील, ही जबाबदारी तो कशा प्रकारे पार पाडेल; राजघराण्याचं नाव उंचावेल की राजघराण्याच्या नावावर शिंतोडे उडवेल, याकडे आता लोकांचं लक्ष लागलं आहे.
पर्सनल सेक्रेटरीऐवजी सीईओ का?
या जाहिरातीकडे आणि भावी सीईओकडे लोकांचं इतकं लक्ष का लागून आहे, त्याचंही एक कारण आहे. लोकांच्या मते प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस मिडलटन यांनी राजघराण्यासाठी सीईओची नेमणूक करणं हे यासंदर्भात त्यांनी उचललेलं आजपर्यंतचं अत्यंत धाडसी पाऊल आहे. कारण, राजघराण्यानं यापूर्वी कधीच सीईओ नेमला नव्हता. कायम ‘प्रायव्हेट सेक्रेटरी’चीच नेमणूक केली जायची. मग, आत्ताच त्यांना सीईओची गरज का पडावी, याची कुतुहलमिश्रित शंका त्यांच्या मनात रुंजी घालते आहे.