वाहनचालकांना हवा लगाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:48 AM2017-11-30T00:48:19+5:302017-11-30T00:48:44+5:30
आम्हा भारतीयांना स्वच्छतेचे जसे वावडे आहे तसेच वाहतूक नियमांचेही! त्यामुळे येथील रस्त्यांवर वाहतूक नियमांचे पालन करणाºयांपेक्षा ते तोडणारेच अधिक दिसतील. सिग्नल तोडून सुसाट वेगाने गाडी पळविणे हा तर आम्ही आमचा जन्मसिद्ध अधिकारच मानतो.
आम्हा भारतीयांना स्वच्छतेचे जसे वावडे आहे तसेच वाहतूक नियमांचेही! त्यामुळे येथील रस्त्यांवर वाहतूक नियमांचे पालन करणाºयांपेक्षा ते तोडणारेच अधिक दिसतील. सिग्नल तोडून सुसाट वेगाने गाडी पळविणे हा तर आम्ही आमचा जन्मसिद्ध अधिकारच मानतो. तसेच दुचाकीवर ट्रिपल सीट किंवा अगदी चारचार जणही बसून जाताना आम्हाला फार मोठा पराक्रम गाजवित असल्याचा अभिमान वाटतो. संपूर्ण देशात वाहतूक नियमांची अशी थट्टा होत असताना महाराष्ट्राची उपराजधानी समजले जाणारे नागपूर शहर तरी त्यापासून कसे अलिप्त राहणार? या शहरातील नागरिक वाहतुकीच्या नियमानुसार गाड्या चालविण्यात पुढाकार घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. माहितीच्या अधिकारातून समोर आलेले हे वास्तव नागरिकांचा बेजबाबदारपणा, स्वत:च्या आणि इतरांच्या जीवाची त्यांना नसलेली पर्वा आणि ‘हम करे सो कायदा’ ही वृत्ती अधोरेखित करणारे आहे. यावर्षी आतापर्यंत हेल्मेट न घालणाºया ४० हजार नागरिकांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय मद्यपी वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी पोलिसांनी ‘ड्रंकन ड्रायव्हिंग’विरुद्ध युद्धपातळीवर मोहीम सुरु केली आहे. त्याअंतर्गत १८ हजारावर वाहनचालकांना पकडण्यात आले. याशिवाय अतिवेगात गाडी चालविणारे, सिग्नल तोडणारे तसेच गाडी चालविताना मोबाईलवर बोलणारेही हजारो बहाद्दर पोलिसांच्या रडारवर आले. स्टंटबाजी करणाºयांचा एक मोठा वर्ग सध्या नागपुरात जन्मास आला आहे. अशा १८६६ स्टंटबाजांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. विदर्भातील अन्य भागातही वाहतूक नियमांबाबत यापेक्षा फारशी वेगळी स्थिती नाही. सर्वत्र वाहनचालकांची एकच तºहा आहे. खरे तर वाहतूक पोलीस शाखेतर्फे वाहतूक नियमांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जात असतात. परंतु ‘पालथ्या घडावर पाणी’ अशी अवस्था आहे. नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे प्रशासनाचे ‘अपघातमुक्त’ शहराचे स्वप्न भविष्यात कधी पूर्णत्वास येईल अशी आशा नाही. नागपूरचा विचार केल्यास यंदा जानेवारी ते सप्टेंबर या काळात शहरात ९०० वर अपघात झाले. यातील १८ टक्के अपघात प्राणांतिक ठरले. अपघातात बळी जाणाºयांमध्ये तरुणाईचे प्रमाण अधिक आहे. एकंदरीतच वाहतूक नियमांबाबत कुणीही फारसे गंभीर नाही. काही दिवस हवा असते मग परिस्थिती जैसे थे होते. हेल्मेट सक्तीबाबत हा अनुभव सर्वांनी घेतला आहे. सातत्य असल्याशिवाय सार्वजनिक शिस्त लागत नाही. प्रत्येक व्यक्तीने वाहतूक नियमांचे पालन केले तरच अपघातांना आळा बसेल आणि लाखो जीव वाचतील.