वंचितांची प्रकाशवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 11:36 PM2018-05-17T23:36:28+5:302018-05-17T23:36:35+5:30

प्रतिभा आणि बुद्धिमत्ता ही कुठल्याही जातीची, धर्माची किंवा वर्णाची मक्तेदारी नसते. संधी आणि प्रोत्साहन मिळाले की कुणीही नेत्रदीपक यश संपादन करू शकतो.

Wink light | वंचितांची प्रकाशवाट

वंचितांची प्रकाशवाट

Next

प्रतिभा आणि बुद्धिमत्ता ही कुठल्याही जातीची, धर्माची किंवा वर्णाची मक्तेदारी नसते. संधी आणि प्रोत्साहन मिळाले की कुणीही नेत्रदीपक यश संपादन करू शकतो. परवा माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील चार आदिवासी विद्यार्थ्यांनी हेच सिद्ध केले. ही मुले आश्रमशाळेत शिकणारी. त्यातही अभिमानाची बाब अशी की या महापराक्रमी विद्यार्थ्यांत एका मुलीचाही समावेश आहे. एरवी आश्रमशाळेत शिकणाºया मुलांच्या बाबतीत सरकारचा आणि समाजाचा भाव कायम करुणेचा असतो. आदिवासी समाजातील या मुलांना शिक्षण देणे एवढाच एक उपचार त्यामागे असतो. पण ही मुले अभ्यासाव्यतिरिक्त विविध क्षेत्रातही नेत्रदीपक यश मिळवू शकतात, असे सरकारला कधी वाटत नाही आणि त्या दृष्टीने प्रयत्नही होत नाहीत. ही मुले जन्मापासूनच संघर्ष करीत असतात. दारिद्र्य लहानपणापासून त्यांनी बघितलेले असते. त्यामुळे कष्ट उपसण्याची व प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची वृत्ती त्यांच्यात अंगभूत असते. फक्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्याची आणि त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असते. या जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या आदिवासी मुलांमधील हे शौर्य ओळखले. ‘मिशन शौर्य’ या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग आणि चंद्रपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या चार मुलांना घडविण्यात आले. सरकारी यंत्रणा समाजाभिमुख दृष्टिकोन ठेवून एखादा उपक्रम प्रामाणिकपणे राबवत असेल तर त्याचे यशही समाजासमोर ठळकपणे येत असते. ही एक चांगली गोष्टही या कीर्तिवंतांच्या यशातून समोर आली आहे. त्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे राजकारणाच्या पलीकडे जाऊन अभिनंदन करायलाच हवे. आमचे राजकारणी कायमस्वरुपी निवडणुकीतील मतांचा विचार करून आपले राजकारण पुढे दामटत असतात. मुनगंटीवार मात्र सतत समाजातील अशा उपेक्षित घटकांच्या कल्याणाचा राजकारणनिरपेक्ष विचार करीत असतात. केवळ आंदोलन आणि मोर्चातून या उपेक्षित घटकांचे प्रश्न सुटणारे नाहीत. त्यासाठी एक विधायक दृष्टिकोन हवा. या वर्गातील मुले समाजातील मुख्य प्रवाहात सामील होत असताना त्यांनी सर्वच क्षेत्रात आपले नैपुण्य दाखवावे, असेही प्रयत्न करण्याची गरज आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील या मुलांनी आपल्या यशातून समाजातील सर्वच उपेक्षित घटकांसमोर प्रकाशाची नवी वाट निर्माण केली आहे. हीच खरी शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीही आहे. या घटकांच्या प्रगतीची बीजेसुद्धा या यशात रुजलेली आहेत.

Web Title: Wink light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.