शहाण्या माणसाचे पेय
By Admin | Published: October 14, 2016 12:39 AM2016-10-14T00:39:00+5:302016-10-14T00:39:00+5:30
पाणी हे शहाण्या माणसाचे पेय आहे, असे थोर विचारवंत आणि ललित लेखक हेन्री डेव्हिड थोरो यांनी म्हटले आहे. माणसाच्या जीवनात पाण्याचे स्थान अनन्यसाधारण
- प्रल्हाद जाधव
पाणी हे शहाण्या माणसाचे पेय आहे, असे थोर विचारवंत आणि ललित लेखक हेन्री डेव्हिड थोरो यांनी म्हटले आहे. माणसाच्या जीवनात पाण्याचे स्थान अनन्यसाधारण स्वरूपाचे आहे. पंचमहाभुतांत पाण्याचा समावेश आहे. पृथ्वीचा पंचाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापला आहे. माणसाच्या शरीरातही नव्वद टक्के पाणी असते. अन्नावाचून माणूस तीन आठवडे जगू शकतो, पण पाण्यावाचून एक दिवसही नाही.
ज्या गर्भाशयात त्याला नऊ महिने वास करावा लागतो, तेसुद्धा जीवनरसयुक्त पाण्याने तुडुंब भरलेले असते. हैड्रोजनचे दोन आणि आॅक्सिजनचा एक कण मिळून बनलेल्या पाण्यात जगण्यासाठी अनिवार्य असा आॅक्सिजन आहे असे विज्ञान सांगते.
बायबल असो, कुराण असो वा ऋग्वेद; सृष्टी निर्मितीच्या कहाणीतील पहिल्या पाच वाक्यात पाण्याचे महात्म्य वर्णिलेले आढळते. पाऊस पडला की धरणी सुजलाम सुफलाम होते, नद्या समुद्राला मिळतात, पाण्याची वाफ थंड हवेच्या स्पर्शाने पाणी होऊन पुन्हा खाली येते आणि चराचराला संजीवनी देते. नद्यांच्या काठावरच माणसाच्या विविध संस्कृती उदयाला आल्या आणि विकसित झाल्या. हजारो वर्षांपासून निसर्गाचे चक्र अव्याहतपणे सुरू आहे ते पाण्यामुळेच आणि म्हणूनच माणूस त्याला जीवन असे म्हणतो.
अशा या तीर्थस्वरूप पाण्यात अल्कोहोल मिसळून ते दूषित करून पिणे यात कोणता शहाणपणा आहे हे लक्षात येत नाही. राष्ट्रांची अर्थव्यवस्था, कलावंताची प्रतिभा आणि श्रमिकांचा श्रमपरिहार दारूवर अवलंबून आहे, असे आजवर कुठेही सिद्ध झालेले नाही. फायदा सोडाच पण दारूमुळे होणाऱ्या नुकसानाची शेकडो उदाहरणे दाखवून देता येतील. रोम आणि ग्रीसचा विनाश दारूमुळे झाला तर इंग्लंड अमेरिकाही त्याच मार्गावर आहे, असेही थोरोने सांगून ठेवले आहे.
दारूचे समर्थन करणारे अनेक शहाणे पुढे येतील पण त्यातला एखादा तरी आपल्या बायको आणि मुलांना सोबत घेऊन उघडपणे दारू पिण्याची हिम्मत दाखवू शकेल काय?
क्षमा करा, पण हे पाणीपुराण वाचून सकाळीच ज्यांचे हातपाय थरथरायला लागले असतील त्यांना मी निरोगी आणि सुंदर दिवसासाठी शुभेच्छा देत आहे. आणि हो, कोल्ड्रिंकमुळे मधुमेह आणि फ्रीजमधील पाण्यामुळे सांधेदुखी जवळ येते हे लक्षात घेऊन साऱ्यांनीच प्लेन वॉटरवर विश्वास ठेवण्याचा शहाणपणा दाखवणे सुरू करावे असेही सुचवत आहे.