सोनिया गांधींना शुभेच्छा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 05:30 AM2017-12-15T05:30:49+5:302017-12-15T05:30:57+5:30
काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची सूत्रे १९९८ पासून सांभाळत राहिलेल्या व त्या पक्षाला २००८ आणि २००९ च्या निवडणुकीत केंद्रात विजय मिळवून देणाºया सोनिया गांधींनी दि. ९ ला पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे राहुल गांधींकडे सोपविली.
काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची सूत्रे १९९८ पासून सांभाळत राहिलेल्या व त्या पक्षाला २००८ आणि २००९ च्या निवडणुकीत केंद्रात विजय मिळवून देणाºया सोनिया गांधींनी दि. ९ ला पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे राहुल गांधींकडे सोपविली. ती सोपविण्याआधी त्यांच्या नेतृत्वाला सक्षमतेची जोड मिळालीे की नाही याची त्यांनी तीन वर्षे परीक्षा घेतली. सोनिया गांधींनी त्याच दिवशी आपल्या वयाची ७१ वर्षेही पूर्ण केली. त्यांचे आयुष्य हे एखाद्या लोकविलक्षण कादंबरीचा भाग बनावे असे आहे. राजीव गांधींच्या प्रेमात पडून भारतवासी झालेल्या सोनिया गांधींनी केवळ भारतच स्वीकारला नाही, त्याच्या सगळ्या सांस्कृतिक परंपरा व त्यातल्या बारीकसारीक चालीरीतीही त्यांनी आत्मसात केल्या. प्रसंगी अन्य कोणाही भारतीय स्त्रीहून त्याच अधिक भारतीय आहेत असे देशाला वाटत राहिले. त्यांचे वागणे, बोलणे व दिसणेही तसेच राहिले. अंगावर कोणताही दागिना न घालणाºया या महिलेने स्वत:ला साºया देशात व विशेषत: त्यातील ग्रामीण भागात, आदिवासी क्षेत्रात आणि तरुणाईत लोकप्रिय केले. आपल्या पतीचे स्फोटक मरण पाहून त्या कोसळल्या नाहीत. (त्यांच्या टीकाखोरांनी म्हटले तसेच त्या माहेरीही गेल्या नाहीत) त्यांचा भारतात स्थायिक होऊन राहण्याचा व अंगावर येईल त्या जोखमीला तोंड देण्याचा निर्धार कायम राहिला. त्याआधी इंदिरा गांधींना त्यांच्या डोळ्यादेखत ठार मारले गेले. तेव्हाही त्या खचल्या नाहीत. त्यांच्या पश्चात त्यांनी सारा गांधी परिवार एकहाती सांभाळला. घर राखले, त्यातली माणसे जपली आणि प्रत्येकाशी नाते राखले. पक्षनेत्यांच्या कारभारात कधी हस्तक्षेप केला नाही. पक्षाने काही काळ केलेली उपेक्षाही त्यांनी सहन केली. पक्षातील विरोधकांना त्यांच्यापासून तुटतानाही देशाने पाहिले. मात्र २००४ च्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वातील पक्षाला जनतेने बहुमत दिले तेव्हा त्यांनी मित्रपक्षांच्या सहकार्याने संयुक्त आघाडीचे सरकार स्थापन केले. त्या सरकारने त्यांना आपले नेतृत्वपद म्हणजे पंतप्रधानपद दिले. पण आपण ‘विदेशी’ असल्याचे राजकारण करून विरोधक देशात रडीचे राजकारण उभे करतील या शंकेने त्यांनी ते पद नाकारले. (प्रत्यक्षात सुषमा स्वराज या तेवढ्यासाठी स्वत:चे वपन करायला तेव्हा निघाल्याही होत्या) हाती आलेले देशाचे पंतप्रधानपद आपले विश्वासू सहकारी डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे सोपविण्यामागील त्यांचा त्याग हा जगाच्या इतिहासातील एक महत्त्वाची नोंद ठरावी असा झाला. त्या पदासाठी सारे पुढारी त्यांचे राजकारण करतात ते पद दुसºयाला देण्यातला त्यांचा त्याग अभूतपूर्व म्हणावा असा होता. नंतरच्या काळात सारी सत्ता हातात असताना त्यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्या पदाचा सन्मान कायम राखला व आपलीही आब पक्षात व देशात तशीच राखली. त्याच बळावर त्यांनी २००९ मध्येही पक्षाला केंद्रात मोठा विजय मिळवून दिला. पण सत्तेने वा अधिकाराने त्यांच्या स्वभावात वा व्यक्तिमत्त्वात कधी अहंकार येऊ दिला नाही. त्यांचे वागणे बोलणे एखाद्या घरंदाज भारतीय स्त्रीसारखेच राहिले. पतीच्या निधनाचे दु:ख आणि इंदिरा गांधींची झालेली हत्या असे आघात पचविणाºया सोनिया गांधींसमोर राहुल गांधींच्या एकाकी नेतृत्वाच्या सुरक्षेचेही भय आहेच. मात्र त्यांनी राहुलला कधी थांबविले नाही. गुजरातच्या निवडणुकीत ते जोखीम अंगावर घेऊन काम करतात. पण त्याविषयीचा चिंतेचा शब्द त्यांनी कधी काढला नाही. प्रत्येकाने आपल्या वाट्याचे कर्तव्य निष्ठेने पार पाडावे तसे त्या राहुल गांधींच्या प्रवासाकडे पाहत आहेत. त्यांना जय-पराजयाची चिंता नाही. त्या दोन्ही गोष्टी त्यांनी पाहिल्या आणि पचविल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयीची आस्था असणाºयांना आज वाटणारी काळजी त्यांच्या प्रकृतीची आहे.
त्यांच्या तब्येतीच्या उलटसुलट बातम्या येत असतात आणि त्या धास्तावणाºया असतात. देशाला अशी सून, अशी माता आणि असे शांत व अनाक्रमक नेतृत्व सोनिया गांधींच्या आधी फार क्वचितच लाभले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाध्यक्षीय कारकिर्दीच्या अखेरीस त्यांना दीर्घायुरारोग्याच्या व त्यांचे मार्गदर्शन देशाला दीर्घकाळ लाभत राहावे अशाच शुभेच्छाही द्यायच्या आहेत.