...ती बाई होती म्हणूनी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 05:39 AM2023-01-23T05:39:35+5:302023-01-23T05:40:21+5:30

ही गोष्ट न्यूझीलंडमधील कोरोनाचा प्रकोप झाला, तेव्हाचा प्रसंग. तिथल्या पंतप्रधानांनी आदेश दिला आणि हॉटेल्स निम्म्या क्षमतेने चालू झाली.

woman leadership taboo in world | ...ती बाई होती म्हणूनी?

...ती बाई होती म्हणूनी?

googlenewsNext

ही गोष्ट न्यूझीलंडमधील कोरोनाचा प्रकोप झाला, तेव्हाचा प्रसंग. तिथल्या पंतप्रधानांनी आदेश दिला आणि हॉटेल्स निम्म्या क्षमतेने चालू झाली. त्यामुळे चांगल्या उपहारगृहांमध्ये जागा मिळणे कठीण झाले. अशावेळी एक तरुण महिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत हॉटेलात गेली. मात्र, तिथल्या व्यवस्थापकाने जागा नसल्याचे नम्रपणे सांगितले. त्यावर, अगोदर बुकिंग न केल्याबद्दल माफी मागून ती तरुणी निघून गेली. ती तरुणी म्हणजे अन्य कोणी नव्हे, तर न्यूझीलंडची पंतप्रधान. जेसिंडा आईन.

पंतप्रधानपदी आरूढ झालेली जगातली सगळ्यात तरुण महिला. सत्तारूढ होताच 'बोलकी बाहुली' अशी संभावना करणाऱ्या सर्वांना पुरून उरलेली एक खमकी स्त्री! कोरोना असो की, भयंकर हिंसाचार, जेसिंडा यांनी कणखर आणि संवेदनशील प्रशासनाचे प्रात्यक्षिकच दाखवले. त्याच जेसिंडांनी सहा वर्षे काम केल्यानंतर राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला आणि अवधे जग आश्चर्यचकित झाले. पण, या राजीनाम्यानंतर उमटलेल्या प्रतिक्रियांमधूनही जेसिंडांचे वेगळेपण अधोरेखित होते. जेसिंडा राजीनामा देताना म्हणाल्या, सहा वर्षे मी काम केले. जे करायचे होते, ते केले. आता मला वाटत नाही की, हा भार मी आणखी पेलू शकेन! राजीनामा देताना त्या रडल्या. त्यांनी त्यांच्या कुटुंबाचाही उल्लेख केला. पण, या राजीनाम्याची बातमी बीबीसीने कशी दिली? त्यांचे शीर्षकच होते Can women really - have it all? जेसिंडांच्या राजीनाम्याकडे पंतप्रधानांचा राजीनामा म्हणून बघण्याऐवजी महिलेचा राजीनामा, असे खुद्द बीबीसीने पाहावे? नंतर त्यांच्यावर टीका झाली.

इंग्लंडचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासह अनेकजण तुटून पडले. मग बीबीसीने ते शीर्षक मागे घेतले हे वेगळे. कोणत्याही कर्तबगार महिलेला 'तुम्ही घर आणि करिअर यांचे संतुलन कसे सांभाळता?', असे विचारण्याची वाईट खोड आपल्याकडे आहे. पुरुषाला मात्र हे विचारले जात नाही। नयनतारा सहगलांच्या 'इंदिरा गांधी- ट्रिस्ट विथ पावर" या पुस्तकात एक संदर्भ आहे. बेटी फ्रायडन नावाच्या अमेरिकन स्त्रीवादी लेखिकेला इंदिरा गांधींची मुलाखत घ्यायची होती. इंदिरा तेव्हा नुकत्याच पंतप्रधान झालेल्या फ्रायडन नयनतारांना फोन करून विचारतात- "मला दडपण आलंय. मी पहिल्यांदाच महिला पंतप्रधानांची मुलाखत घेणार आहे. कशी घेऊ?"

त्यावर नयनतारा म्हणतात, "तु पंतप्रधानांची मुलाखत घे।" मोठ्या राजकीय पदावरील महिला हा आजही अपवाद वाटावा आणि त्या पदापेक्षाही तिचे महिला असणे ठळक व्हावे, हे क्लेशकारक आहे. सतराव्या वर्षी लेबर पार्टीत दाखल झालेल्या जेसिंडा आपल्या कर्तबगारीच्या जोरावर सत्तावीसाव्या वर्षी खासदार झाल्या, तर सदतीसाव्या वर्षी पंतप्रधान, वंचित, शोषित घटकांसाठी काम करतानाच, देशाची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी त्यांनी जोरकस प्रयत्न केले. संयुक्त राष्ट्र संघातील भाषणाने त्यांनी अवघ्या जगाचे लक्ष वेधले. न्यूझीलंड हा तसा पन्नासेक लाख लोकसंख्येचा चिमुकला देश. पण, समृद्ध आणि रम्य. या देशाच्या प्रगतीचा रोडमॅप तयार करत जेसिंडा पुढे जात राहिल्या. अगदी साध्या माणसांनाही सहज भेटत राहिल्या. 'मी तुमच्यापैकीच एक आहे, असे कृतीतून सांगत राहिल्या. त्यांनी आपण आई होत असल्याचे जाहीर केले, तेव्हा त्या आणखी चर्चेत आल्या. पंतप्रधानपदी असताना 'गुड न्यूज' देणान्या त्या बेनझीर भुट्टो यांच्यानंतरच्या दुसऱ्या पंतप्रधान. अद्यापही त्यांनी अधिकृतपणे लग्न केले नसले, तरी आपल्या मित्रासोबत त्यांना छान जगायचे आहे.

आपल्या मुलीलाही वेळ द्यायचा आहे. कारण काही असो, एक टर्म पूर्ण झाल्यानंतर, असा राजीनामा देणे किती जणांना शक्य आहे? देशात लोकप्रिय असताना, जगभर कौतुक होत असताना जेसिंडांनी शांतपणे पायउतार व्हावे, हे किती आश्चर्याचे! पदाला चिकटून न राहाता खुर्ची सोडणे सोपे नाही. आपल्याकडे तर मुलीसाठी वेळ देण्याऐवजी, आपण अजिबात निवृत्त न होता, नंतर मुलाच्या वा मुलीच्या हाती सत्तेची धुरा देण्याची परंपरा. त्यामुळे आपल्याला जेसिंडा कळणे अगदीच अवघड. ज्या देशातील बीबीसीने 'त्या' हेडलाइनसाठी माफी मागितली, त्याच इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक झाल्यावर आपल्याला कोण आनंद झाला! पण, याच सुनकांनी सीटबेल्ट लावला नाही, म्हणून त्यांना तिथे दंड झाला. गल्लीतील होर्डिंगवर झळकणारे नवनवे राजकुमार रोज पाहाणाऱ्यांना आणि मंत्र्यांच्या ताफ्यात खोळंबलेली वाहतूक अनुभवणाऱ्यांना ना जेसिंडा समजणार ना ऋषी।

Web Title: woman leadership taboo in world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.