स्त्री मुक्तिदाता : भगवान महावीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 04:33 AM2018-03-29T04:33:40+5:302018-03-29T04:33:40+5:30
स्त्री आणि पुरुष समाजरूपी रथाची दोन चाके आहेत. दोघांच्या समानतेतूनच रथाला गती मिळते. इतिहासाची पाने उघडून बघितली तर असे लक्षात येते की...
चंदनाला तारणाऱ्या महावीरांना वंदन
अर्जुनाला बळ देणाºया महावीरांना वंदन
करुणेचे सागर जनजनाचे बंधू
ज्योतिर्गमय भगवानाला वंदन
स्त्री आणि पुरुष समाजरूपी रथाची दोन चाके आहेत. दोघांच्या समानतेतूनच रथाला गती मिळते. इतिहासाची पाने उघडून बघितली तर असे लक्षात येते की, स्त्रीने समाजात कधी सन्मान तर कधी अपमानाचे जीवन जगले. भगवान महावीर यांचा या धरतीवर जेव्हा जन्म झाला तो कालखंड स्त्रियांच्या महापतनाचा होता. तत्कालीन समाज व्यवस्थेत स्त्रियांना महत्त्वाचे स्थान आणि सन्मान नव्हता. पशुंप्रमाणे खुलेआम उभे करून तिची विक्री केली जात होती. गर्भश्रीमंत सेठ सावकार तिची खरेदी करून दासीप्रमाणे उपभोग घेत होते. चेतनाशक्ती असूनही जणू तिच्याकडे जड वस्तू म्हणून पाहिले जात होते.
प्रभू महावीरांनी स्त्री शक्तीला आई, बहीण आणि कन्येसमान पाहिले. स्त्रियांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रभूने प्रचंड संघर्ष केला. स्त्रियांची हरविलेली प्रतिष्ठा व सन्मान पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी ते म्हणतात, स्त्रियांना पुरुषांपेक्षा हीन समजणे अज्ञान आणि अधर्म आहे. स्त्री निस्सीम प्रेमाने पुरुषांना प्रेरणा व शक्ती प्रदान करून समाजातील सर्वांपेक्षा अधिक हित साध्य करीत होती. विविध प्रकारचे विषय- विकार तसेच कर्मकांडाच्या बंधनातून उद्ध्वस्त करून मोक्ष मिळवू शकत होती. त्यामुळे भगवान महावीरांनी चतुर्विध संघात साधुंप्रमाणे साध्वींनाही तथा श्रावकाप्रमाणे श्राविकांचे तीर्थ म्हणून गौरव केला. चारही मोक्षांचा मार्ग म्हणून सूचन केले. याच कारणांमुळे महावीरांच्या धर्म आणि शासनात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या सर्वाधिक आहे. १४,००० साधू तर ३६,००० साध्वी आहेत. १ लाख ५९,००० श्रावक तर ३ लाख २८ हजार श्राविकांची संख्या होती. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या अधिक असणे याचा अर्थ भगवान महावीर स्वामीने स्त्री शक्तीच्या उद्धाराचा जो बिगुल वाजविला यातून संपूर्ण स्त्री जगतातच मोठी जागृती सुरू झाली. पतित आणि निराश स्त्री साधनेच्या मार्गावर गतिमान होऊ शकली. त्या काळात साधू संघाचे नेतृत्व इंद्रभूती गौतम यांच्याकडे तर साध्वी संघाचे नेतृत्व चंद्रबालाच्या हातात होते. हीच तेजस्वी परंपरा मृगावती, पद्मावती, सुल्सा शिवादेवी नावाच्या मुख्य नायिकांनी पुढे नेली. प्रभूने स्त्रियांना धर्मोपदेश ऐकणे, धर्म सभेत प्रश्न विचारणे, स्वत:च्या शंकाचे समाधान करणे आदी अधिकार प्रदान केले होते. जयंती नावाच्या राजकुमारीने प्रभूसोबत अनेक धार्मिक विषयांवर चर्चा केली होती. हाच अधिकार अन्य स्त्रियांनाही मिळवून दिला.
प्रभू महावीर यांच्या कालखंडात दासप्रथेने हैदोस घातला होता. प्रभूने या अनिष्ट प्रथेला पायबंद घातला. प्रभूने धर्म संघाची स्थापना केल्यानंतर राजघराण्यातील राणींसोबतच सर्वसामान्य वर्गातील महिलांनाही मोठ्या सन्मानाने दीक्षा ग्रहण करण्याचा अधिकार दिला. प्रभूच्या उपदेशाने प्रभावित होऊन पुरुष तर पुढे गेलेच, मात्र, महिलाही मागे राहिल्या नाहीत. मगध साम्राज्याचे सम्राट राजा श्रेणीक यांच्या महाराणी महालात राहून सर्व सुख सुविधांचा लाभ घेत होत्या. दागिन्यांनी शरीराला जणू मढवित होत्या. साधनेच्या मार्गावर पुढे जाऊ लागताच कनकावली, तप, रत्नावली तप आदी महान तपश्चर्या करून स्वत:ची अस्मिता जागविली. तत्कालीन समाजव्यवस्थेत सती प्रथेच्या घटनाही काही प्रमाणात घडत होत्या. ही जीव हत्याच असल्याचे भगवान महावीर यांनी समाजाला पटवून दिले.
परिणामी, निष्ठूर सतीप्रथेचा अंत झाला. विधवा महिलांच्या स्थितीमध्ये सुधारणा झाली. गृहस्थाश्रमात महिलांना सन्मान मिळाला. आनंद श्रावक आपली पत्नी शिवानंदाला म्हणतात,‘हे देवानुप्रिये मी प्रभूची वाणी ऐकली. ती खूपच उद्बोधक आणि हितकारक आहे. तुम्हीदेखील भगवानकडे जाऊन त्यांना वंदन करा. त्यांचा सत्कार, सन्मान करा. त्यांचे विचार कल्याणकारी, मंगलमय व ज्ञानस्वरूप असून उपासना करा. ५ अनुव्रत, ३ गुणव्रत, ४ शिक्षाव्रताला आत्मसात करा.’ हे ऐकून शिवानंदा प्रसन्न झाली. प्रभूकडे जाऊन त्यांनी श्राविका धर्माचा स्वीकार केला. पत्नीच्या भावभावना व हिताचा विचार करून कार्य करणाºया पुरुषाला महावीर यांनी ‘सत्पुरुष’ म्हटले आहे. प्रभूच्या दृष्टिकोनातून मातृशक्तीला मोठा आदर आहे. जेव्हा ते आईच्या उदरात होते तेव्हा तिला काही समस्या नकोत म्हणून हालचाली बंद केल्या होत्या. मात्र, ‘बाळाला काय झाले’ ही शंका मनात निर्माण होताच आई खिन्न झाली. प्रभू तर त्रिगुणाचे धनी आहेत. हे प्रभूच्या लक्षात येताच त्यांनी लगेच हालचाली सुरू केल्या. दरम्यान, गर्भातच असा संकल्प केला की, जेव्हापर्यंत आईबाबा हयात राहतील तोपर्यंत वैराग्य धारण करणार नाही. हा संकल्प त्यांनी कृतीत उतरविला. आईबाबा जिवंत असेपर्यंत दीक्षा घेतली नाही. यावरून हे स्पष्ट होते की, स्त्रियांविषयी प्रभूंच्या मनात उच्च कोटीचा आदर आणि श्रद्धा होती. स्त्री शक्तीमुळे साधनेमध्ये कोणतीही बाधा येणार नसून ती एक प्रेरणाशक्ती व सहनशीलतेची जिवंत मूर्ती असल्याचे ते मानत होते. हेच त्यांचे धाडस होते. त्यांनी हजारो वर्षांपूर्वी स्त्रियांच्या सामाजिक, आर्थिक व धार्मिक अधिकारांचा सन्मान केला. त्यामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रात महिला शक्ती अग्रेसर असल्याचे दिसून येते. त्यामागे प्रभूचे मूलभूत योगदान असून समग्र महिला जगतावरच मोठे उपकार आहेत. स्त्रियांनी आत्मशक्ती जागृत करून विकास साध्य केला आहे. प्रभूच्या शासन व्यवस्थेत परम परमात्मा पद मिळविले, अर्थात मोक्ष प्राप्त केले.
गंडस्थळी लागे त्याला तीर म्हणतात
धाडसाने जगले त्याला वीर म्हणतात
उद्ध्वस्त करे जगातील अन्याय
त्याला वीर नाही महावीर म्हणतात.
- सरला अशोक बोथरा