अफगाणात महिला पत्रकारांचा ‘बळी’च!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 04:15 AM2020-12-14T04:15:40+5:302020-12-14T04:15:53+5:30
अफगाणिस्तानात जलालाबाद इथं जेमतेम विशीत असलेल्या पत्रकार, कार्यकर्त्या मलालाई मईवांड यांची हत्या झाली. त्या ज्या गाडीनं जात होत्या, त्या गाडीचे चालक मोहमद ताहीरही त्या हल्ल्यात बळी पडले. भयंकर म्हणजे मलालाईच्या आईचीही पाच वर्षांपूर्वी हत्या झाली होती.
तालिबानी सत्तेत उद्ध्वस्त होत गेलेले अफगाणिस्तान या मुलींनी उघड्या डोळ्यांनी पाहिले, त्यांच्या आया-काकवा-मावशा घरात कोंडल्या गेल्या. काही जिवाच्या भीतीने लेकरांना घेऊन पाकिस्तानात जाऊन निर्वासितांचं जिणं जगल्या. मात्र, आता त्यांना आस आहे घराबाहेर पडून काम करण्याची, आपला देश, आपला समाज पुन्हा प्रागतिक पुरोगामी वाटेवर चालेल याची. मात्र, नव्यानं डोकं वर काढणाऱ्या तालिबान्यांना मात्र ते मान्य नाही. एकीकडे अफगाण सरकारसोबत शांतीवार्ता, दुसरीकडे दहशत, असा त्यांचा दुहेरी कारभार सुरू आहे. त्यात घराबाहेर पडून काम करणाऱ्या स्वतंत्र वृत्तीच्या महिलांचा बळी जाणंही सर्रास चाललं आहे. अफगाणिस्तानात जलालाबाद इथं जेमतेम विशीत असलेल्या पत्रकार, कार्यकर्त्या मलालाई मईवांड यांची हत्या झाली. त्या ज्या गाडीनं जात होत्या, त्या गाडीचे चालक मोहमद ताहीरही त्या हल्ल्यात बळी पडले. भयंकर म्हणजे मलालाईच्या आईचीही पाच वर्षांपूर्वी हत्या झाली होती. त्याही स्त्रीवादी कार्यकर्त्या होत्या. त्यांची हत्या कुणी केली, याचा अद्याप तपास लागला नाही. मात्र, आईच्या हत्येनंही खचून न जाता, त्याच वाटेवरून जात नीडरपणे पत्रकारिता करत मलालाई घराबाहेर पडून काम करतच होत्या. अलीकडेच त्यांनी जाहीर सांगितलं होतं की, अफगाणिस्तानसारख्या अतिशय बुरसटलेल्या, पुरुषी वृत्तीनं चालणाऱ्या देशात काम करणं एक महिला पत्रकार म्हणून काम करणं किती अवघड आहे. मात्र, तरीही आपलं काम करत राहणं पत्करलेल्या आणि आल्या अडचणीतून मार्ग काढत चाललेल्या या तरुण मुलीचा त्याच वृत्तींनी बळी घेतला. मलालाई यांच्यावर हल्ला हा अफगाणिस्तानात सध्या प्रख्यात व्यक्तींचं जे हत्यासत्र सुरू आहे, दहशत वाढावी म्हणून त्यांना टार्गेट केलं जात आहे, त्याचाच भाग असल्याचं चित्र आहे. मलालाई ज्या एनिकास नावाच्या वृत्तवाहिनीत काम करत होत्या, त्या वृत्तवाहिन्याच्या मालकांचेही खंडणीसाठी २०१८ मध्ये अपहरण करण्यात आले होते.
अफगाणिस्तानचे अध्यक्ष यांच्या प्रवक्त्या फातिमा मुरचाल यांनी झाल्या घटनेबद्दल खेद व्यक्त करत ट्वीट केलं की, ‘अफगाण समाजात घराबाहेर पडून काम करणाऱ्या महिलांविषयी नक्की कुणाला त्रास आहे? काय समस्या आहे? या भ्याड गुन्हेगारांना नक्की शिक्षा होईल, शांतीवार्ता पूर्णत्वास गेल्यावरही या घटनेतील गुन्हेगारांना शिक्षा होईलच.’ हा असा संताप अफगाणिस्तानात महिला मोठ्या संख्येनं व्यक्त करत असल्या तरीही युद्धग्रस्त अफगाणिस्तानात महिलांवर हल्ले होण्याचे, दहशत गाजवण्याचे प्रमाण मोठे आहे. द अफगाण जर्नलिस्ट सेफ्टी कमिटी हा तिथला पत्रकारांच्या सुरक्षिततेची काळजी घेणारा एक गट आहे. त्यांचं म्हणणंच आहे की, पत्रकारांवर असे हल्ले होत राहिले, त्यात पत्रकार बळी गेले तर गेल्या काही वर्षांत पत्रकारांनी या समाजात काम करत जी काही प्रगतीची, पुरोगामी विचाराची वाट चालली आहे, ते सारं संपुष्टात येईल. या कमिटीनेही ट्वीट केलं आहे, ‘ देशात पत्रकारांचे हत्यासत्र थांबले नाही तर अफगाणिस्तानने गेल्या काही वर्षांत वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि त्यातून कमावलेल्या समाजसुधारणा हे सारंच संपेल. या साऱ्या प्रकाराचा खोलवर तपास व्हायला हवा.’ गेल्या महिन्यातही आणखी एका पत्रकाराचा अफगाणिस्तानात खून झाला होता. जागतिक मानवी हक्क दिनाच्या दिवशीच मलालाई यांची हत्या झाली.
२००१ नंतर म्हणजे तालिबानचा पाडाव झाल्यानंतर अफगाणी महिलांनी जुनाट बुरसटलेली व्यवस्था नाकारत अनेक पुरुषप्रधान क्षेत्रात कर्तृत्व गाजवायला सुरुवात केली. अजूनही तिथं लिंगभेद मोठ्या प्रमाणात आहेच; पण तरीही शिक्षण, आरोग्य व्यवस्था यासह माध्यमात अनेक महिला काम करत समाजबदलाचं स्वप्न पाहत आहेत. अर्थातच ही वाट सोपी नाही, महिलांनी घराबाहेर पडू नये, दहशत कायम राहावी म्हणून अशा हत्या केल्या जातात. मलालाई यांचाही त्यातच बळी गेला आहे.
युद्धग्रस्त अफगाणिस्तानात बॉम्बहल्ल्यात पत्रकार दगावणे ते त्यांची हत्या होणे, हे गेली अनेक वर्षे चालले आहे. अनेक पत्रकारांनी त्याविषयी वारंवार सवाल उपस्थित केले आहेत. अफगाण ॲडव्होकसी ग्रुप इंटिग्रिटी वॉच या गटाचे कार्यकारी संचालक म्हणतात, ‘गेली अनेक वर्षे या नाही तर त्या घटनेत पत्रकारांचे बळी जात आहेत. त्यांचे खून पडतात; पण या घटनांतून माध्यम संस्था आणि सरकार दोन्हीही काहीच धडे घ्यायला, खबरदारी घ्यायला तयार नाहीत. अतिरेकी नागरिकांचे, सरकारी कर्मचारी, सुरक्षा अधिकारी आणि पत्रकारांचे बळी घेतात, तर त्यांच्याच बातम्या होत्या. ज्यांचे बळी जातात त्यांचं काय?..
पाकिस्तानातही हत्यारे मोकाट
अलीकडेच पाकिस्तानात एक अहवाल प्रसिद्ध झाला, त्याचं नाव ‘१०० % इमप्युनिटी फॉर किलर्स, ० % जस्टिस.’ नोव्हेंबर २०१८ ते नोव्हेंबर २०१९ या काळात पाकिस्तानातही ७ पत्रकारांचे खून झाले. गेल्या सहा वर्षांत ३३ पत्रकारांची हत्या झाली. मात्र, दोषींना शिक्षा होण्याचे प्रमाण शून्य आहे.