ब्राझीलचे  राष्ट्राध्यक्ष का म्हणतात, कोरोनाची लस टोचल्यावर बायकांना दाढी येईल!

By Meghana.dhoke | Published: December 23, 2020 03:47 PM2020-12-23T15:47:38+5:302020-12-23T15:48:21+5:30

खोटी माहिती पसरवणे कसे रोखायचे, फेक न्यूजला कसा आळा घालायचा, हे आव्हान मोठे किचकट असताना ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सेनारो स्वत:च जाहीर सांगतात की, लस घेतली तर बायकांना दाढी येईल. लस घेणाऱ्याचं मगरीत रूपांतर होऊ शकेल, तेव्हा तुमचं काय ते तुमचं तुम्ही पाहा!

Women may grow beard after taking corona vaccine: Jair Bolsonaro Brazil president | ब्राझीलचे  राष्ट्राध्यक्ष का म्हणतात, कोरोनाची लस टोचल्यावर बायकांना दाढी येईल!

ब्राझीलचे  राष्ट्राध्यक्ष का म्हणतात, कोरोनाची लस टोचल्यावर बायकांना दाढी येईल!

googlenewsNext
ठळक मुद्देही गत जर राष्ट्राध्यक्ष माणसाची, तर सामान्यांना बोल तरी कसा लावावा?

कोरोनाची लस टोचून घेणार का, या प्रश्नाला ब्राझीलचे ८५ टक्के लोक होकारार्थी उत्तर देतात. जगात हे प्रमाण पहिल्या क्रमांकाचे आहे, चीनसुद्धा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तात्पर्य हे की, ज्या देशात ७१ लाख लोक कोरोनाबाधित झाले, १,८५,००० लोकांचा कोरोनाने बळी घेतला, त्या देशात लोकांना आता तातडीने लस हवी आहे. आपल्याला लस परवडली नाही तर काय, याची चिंता करणारेही ब्राझीलमध्ये अनेक आहेत. मात्र, स्वत:च्या देशातील या भयाण वास्तवाचे गांभीर्य ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांना नाही. तीनच दिवसांपूर्वी राष्ट्राध्यक्ष बोल्सेनारो यांनी कोरोना लसीकरणासंदर्भात जाहीर मुक्ताफळे उधळली. एकीकडे ते चीनशी लशीसंदर्भात करार करीत आहेत, दुसरीकडे लसीकरणाविषयी लोकांच्या मनात संभ्रम तयार होईल, अशी विधानेही करीत आहेत. नुकतेच ते म्हणाले की, ‘फायझर-बायोटेकची लस घेतली तर माणसाचं मगरीत रूपांतर होईल, बायकांना दाढी येईल आणि लस घेऊन तुमची मगर झालीच, तर तो तुमचा प्रश्न आहे, पाहा काय करायचं ते.’- लस आणि त्यातून होणाऱ्या साइड इफेक्टस्‌ची शक्यता यावर ते बोलत होते; पण ही चर्चा भलतीकडेच गेली. एकीकडे त्यांनी देशात लसीकरण मोहिमेची सुरुवातही केली आणि लसीकरण करून घेणे सक्तीचे नाही, असेही घोषित केले. मात्र, हे सर्व करताना ते म्हणाले, ‘मी माझ्या मतावर ठाम आहे. मी काही लस टोचून घेणार नाही. मला कोरोना होऊन गेला आहे, माझ्या शरीरात ॲन्टिबॉडीज आहेत; मला काय गरज लसीकरणाची?’ हे बोल्सेनारो एकदाच नाही, तर दोनदा कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. एकदा कोरोना होऊन गेल्याने शरीरात तयार झालेल्या ॲन्टिबॉडीज त्यांचे रक्षण करू शकल्या नाहीत, हे वास्तव आहे. मात्र, तरीही त्यांनी आजवर अंतर नियम, मास्क घालणे हे सारे टाळलेच आहे. ‘साधासा फ्लू’ असे म्हणत त्यांनी कोरोनाला धुडकावून लावले होते. अमेरिकेत तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशी कोरोनाची टिंगल केली त्याहून जास्त टवाळी बोल्सेनारो यांनी आजवर केली आहे. दुसरीकडे अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी मात्र स्वत:ला लस टोचून घेतली आणि जगभरातील (फक्त अमेरिका नव्हे) नागरिकांना ते पाहता यावे म्हणून लाइव्ह व्हिडिओ प्रस्तुत केला.

कोरोना, त्याचे गांभीर्य, अर्थव्यवस्था ढासळणे, लसीकरण, त्यासंदर्भातील विधाने आणि जनतेला विश्वासात घेण्याचे प्रयत्न यासंदर्भात जगभरातील नेते जसे वागतात, त्याचा थेट परिणाम लोकांच्या मानसिकतेवर होताना दिसतो. आधीच कोरोना, त्याचे बदलते स्ट्रेन, लॉकडाऊन, घरबंदी याने लोक शिणले आहेत, त्यांना लस हा आधार वाटतो, असे असताना लसीविषयीच्या शंका, तर्क-वितर्क यामुळे अजूनच धास्ती वाटते. परिणाम म्हणून समाजमाध्यमात अनेक प्रश्न, मीम्स, व्हिडिओ विनोद फिरतात, माहिती व्हायरल होते; पण हे सर्व पसरवणारे तज्ज्ञ नसतात. त्यामुळे त्यातून संभ्रम कमी होण्यापेक्षा अधिकच वाढताना दिसतो.

कोरोना लस टोचण्यासाठी ‘डिसॲपिअरिंग नीडल्स’ अर्थात अदृश्य होणाऱ्या सुया वापरतात, असा एक व्हिडिओ लंडनमध्ये व्हायरल झाला. ती माहिती खरी नव्हतीच. हे नंतर सिद्ध झाले.

लस घेतल्याने नर्सचा मृत्यू झाला, अशी बातमी अमेरिकेतील अलाबामा या राज्यात फेसबुकवरून व्हायरल झाली, त्यात लस घेतल्याने नर्सचा मृत्यू झाला असे सांगण्यात येत होते. ते इतके पसरले की, शेवटी तिथल्या आरोग्य खात्याने खुलासा केला, ही माहिती खरी नाही, अशी एकही घटना घडलेली नाही.

 

‘एखाद्याला कसली ॲलर्जी असेल, त्यांनी लस घेतली तर काय होईल?’ या एका प्रश्नावर सध्या जगभरातील लोक जमेल ते ज्ञान वाटत सुटले आहेत आणि भयाचा पसारा वाढतोच आहे.

अशा प्रकारच्या एक ना अनेक चर्चा, चुकीची माहिती व या सोबतच भय समाजमाध्यमातून पसरवले जात आहे. साऱ्या जगासमोरच जो प्रश्न गंभीर आहे त्यासंदर्भात खोटी माहिती पसरवणे कसे रोखायचे, फेक न्यूजला कसा आळा घालायचा, हे जगभरातील देशांसमोरचे आव्हान आहे. ते आव्हान असे प्रचंड मोठे आणि किचकट असताना ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सेनारो स्वत:च जाहीर सांगतात की, लस घेतली तर बायकांना दाढी येईल. शिवाय लस घेणाऱ्याचं मगरीत रूपांतर होऊ शकेल, तेव्हा तुमचं काय ते तुमचं तुम्ही पाहा!

ही गत जर राष्ट्राध्यक्ष माणसाची, तर सामान्यांना बोल तरी कसा लावावा?

२१ दिवस दारू नाही?

लस घेण्यापूर्वी ७ दिवस आणि लस घेतल्यावर १४ दिवस मद्यपान करता येणार नाही, म्हणजे २१ दिवस अल्कोहोल पूर्ण वर्ज करावे लागेल. या विषयावर सध्या समाजमाध्यमात टोकाचे विनोद, मीम्स फिरत आहेत. संताप अनावर होऊन मद्यप्रेमी विचारताहेत, हा कोरोना अजून किती छळणार?

Web Title: Women may grow beard after taking corona vaccine: Jair Bolsonaro Brazil president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.