महिलांचा सन्मान नैमित्तीक नसावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 04:08 PM2019-03-08T16:08:22+5:302019-03-08T16:08:57+5:30
योगदानाविषयी कृतज्ञता
मिलिंद कुलकर्णी
८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातोय. ३६५ दिवसांपैकी एका दिवशी आम्ही नारीशक्तीचा सन्मान, आदर आणि सत्कार करीत असतो. त्यांच्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करीत असतो. अर्धे विश्व म्हणून त्यांचा गौरव करीत असतो. कोणतेही क्षेत्र आता शिल्लक नाही, ज्याठिकाणी महिलांनी स्वकष्टाने, स्वकर्तृत्वाने स्वत:ला सिध्द केलेले नाही, असे आपण अभिमानाने सांगत असतो. हे सारे खरे असले तरी केवळ एकच दिवस आम्ही महिलांचा सन्मान का करायचा? रोज महिलांना सन्मान तर सोडा, समान वागणूक आम्ही देतो का, याचा तमाम पुरुषवर्गाने विचार करायला हवा. आत्मपरीक्षण करायला हवे.
महिला दिनाकडे देखील आम्ही विचारसरणीच्या चष्म्यातून पाहत असतो. हिंदुत्त्ववादी विचारसरणीची मंडळी शुभेच्छा देताना पुरातन काळातील अरुंधती, अनुसया, सावित्री, जानकी, सती, द्रोैपदी, कण्णगी, गार्गी, मीरा, दुर्गावती, लक्ष्मी, अहल्या, चन्नमा, रुद्रमाम्बा, सुविक्रमा, निवेदिता, सारदा या मातृस्थानी असलेल्या महिलांचे स्मरण करतात. पुरोगामी मंडळींकडून राजमाता जिजाऊ, लोकमाता अहिल्यादेवी, क्रांतीज्योती सावित्रीबाई, माता रमाई यांचे स्मरण केले जात आहे. त्या त्या काळात या महिलांनी निश्चितच उल्लेखनीय आणि आदर्श स्वरुपाचे काम केले आहे. त्यात कोणाचे कार्य अधिक आणि कोणाचे उणे म्हणायची आवश्यकता भासायला नको. किंवा त्याची विचारसरणीनुसार विभागणीदेखील चुकीची वाटते.
मुद्दा हा आहे की, आदर्श मानणाऱ्या या महिलांचे कार्य आणि विचार आम्ही आमच्यात आणि कुटुंबामध्ये आत्मसात केलेले आहेत काय? घरात मुलगा आणि मुलगी यांच्यात आम्ही समानता बाळगतो काय? मुलाला अभियांत्रिकी आणि मुलीला कला, वाणिज्य शाखेचे शिक्षण घेण्यास आम्ही बाध्य करीत नाही काय? तिच्या आवडीचा अभ्यासक्रम घ्यायचा असला तरी आपल्या शहरात उपलब्ध असेल तरच घेऊ देतो, बाहेरगावी मुलीला कसे पाठवायचे? हा प्रश्न एकविसाव्या शतकात आम्हाला पडतोच ना? मुलाची वेशभूषा, केशरचना यासंबंधी भेद होतोच ना? मुलाविषयी आम्ही जेवढे निर्धास्त असतो, तो रात्री उशिरा आला तरी आम्ही फार काही गंभीरतेने घेत नाही, हे मुलीच्या बाबतीत घडले तर ...? याचा अर्थ पुढारलेल्या समाजात अजूनही मुलगा आणि मुलगी यांच्यात भेद होतोच. मुली-महिला सुरक्षित नाहीत. समानता तर दूर राहिली.
मध्यंतरी ‘मी टू’ चे वादळ घोंगावले तेव्हा भल्या भल्यांचा बुरखा टराटरा फाटला. सोज्वळ व सात्विकतेचा बुरखा पांघरुन समाजात मानमरातब मिरवणाऱ्या या मंडळींची काळी कृत्ये समोर येताच त्यांची निर्भत्सना किती झाली? आणि तक्रारदार महिलेला किती प्रश्न विचारले गेले? याचा प्रामाणिकपणे विचार केला तर समाजाची मानसिकता लक्षात येते. तक्रारदाराने तेव्हाच का तक्रार केली नाही? आताच का केली? प्रसिध्दीचा स्टंट आहे, ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे, अशी ओरड सुरु झालीच ना? रावणाच्या तावडीतून सुटलेल्या सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागलीच होती, मर्यादा पुरुषोत्तम राम सोबत असतानाही जनभावनेपुढे त्या राजाने मान तुकवली होतीच. म्हणजे पुरातन काळ असो की, वर्तमान काळ महिलेला समाजाने कायम आरोपीच्या पिंजºयात ठेवले आहे. हीन वागणूक दिली आहे.
पंचायत राज व्यवस्थेत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण देण्यात आले. या आरक्षणाचा लाभ खरोखर महिलांना किती मिळतोय? त्यांना अधिकार राबविण्या इतके सक्षम आणि सबल होऊ दिले आहे काय? ‘झेरॉक्स पती’ ही संकल्पना का उदयास आली? पतीला विचारल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला जर निर्णय घेऊ शकत नसतील तर त्यांना आरक्षणाचा फायदा काय? सूत्रे सगळी पुरुषांकडे राहत असतील तर ५० टक्के आरक्षणाचे श्रेय घेणाºया मंडळींनी यातून तोडगा देखील काढायला हवा ना?
मग केवळ दिवस साजरा करायचा, महिलांविषयी आम्हाला अतीशय आदर, सन्मान आहे हे आत्मसमाधान समाजाला, पुरुषांना मिळावे म्हणून तर महिला सन्मानाचे सोहळे साजरे होत नाही ना, असा प्रश्न पडतो. आपल्या उक्ती, कृती यातून महिलेचा सन्मान प्रकट झाला पाहिजे. तरच खºया अर्थाने महिलांना समानता असल्याची प्रचिती येईल, अन्यथा पुन्हा ८ मार्चची वाट पहावी लागेल.