उर्ध्व नजरेची दिलदार देशमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2016 04:11 AM2016-05-27T04:11:07+5:302016-05-27T04:11:07+5:30
स्व. विलासरावांची उर्ध्व नजर... संवेदनशील मनाला दिलदार देशमुखी थाटाची जोड लाभली होती. भव्यता आणि नावीन्यतेची ओढ असलेल्या व्यक्तिमत्त्वाची काल जयंती झाली...
- राजा माने
स्व. विलासरावांची उर्ध्व नजर... संवेदनशील मनाला दिलदार देशमुखी थाटाची जोड लाभली होती. भव्यता आणि नावीन्यतेची ओढ असलेल्या व्यक्तिमत्त्वाची काल जयंती झाली...
डोळ्यांची उपजत ठेवण हा कोणत्याही व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग असतो. असं म्हणतात की, उर्ध्व नजर लाभलेल्या व्यक्तीला नावीन्य, अभिनवता, सर्वोत्कृष्टता आणि भव्यतेची ओढ असते. शिवाय त्या व्यक्तिमत्त्वाला कर्तबगारी, रसिकता, महत्त्वाकांक्षा, संवेदनशीलता आणि दिलदारी या गुणांचीही उपजत समृद्धी लाभलेली असते. महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच आकर्षणाचा विषय ठरलेले स्व. विलासराव देशमुख हे देखील उर्ध्व नजरेचेच! त्या नजरेला लाभलेल्या सर्व गुणांना जोड मिळाली ती देशमुखी थाटाची. सर्वसामान्य माणसाशी असलेले आपले नाते नेहमीच घट्ट ठेवत विलासरावांनी आपला देशमुखी थाटही कायम राखला.
सोलापूर जिल्ह्याचे आणि त्यांचे राजकीय नाते नेहमीच राज्यात चर्चेचा विषय ठरले. त्यातूनच सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्यातील मैत्रीला ‘दो हंसोंका जोडा...’ असे संबोधन मिळाले. सोलापूरवर त्यांचे तसे विशेष प्रेम होते. त्याच नात्यातून २००२ सालच्या दंगलीवेळी आपले पिता दगडोजीरावांच्या निधनाचा दुखवटा काळ असतानाही ते सोलापुरात आले होते. त्या प्रेमापोटीच शहरात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय सोलापूरकरांनी त्यांच्या निधनानंतर घेतला. अगदी बाभळगावच्या सरपंचपदापासून, पंचायत समिती उपसभापतीपदाच्या मार्गाने राजकारणातील सर्वोच्च पदे त्यांनी मिळविली. त्या प्रत्येक पदाची उंची वाढविण्याचे काम त्यांनी केले. एखादा छोटा पण उत्कृष्ट असलेला उपक्रम विलासरावांपुढे आला की, तो भव्य आणि ‘पॅटर्न’ म्हणून नावारूपास कधी आला हेही कळायचे नाही. स्वत:च्या राहणीमानातील टापटीप आणि नजाकत त्यांनी कधीही ढळू दिली नाही.
नवे घडविण्याची जिद्द, कल्पकता आणि धडाडीच्या जोरावर त्यांनी लातूरला वेगळे स्थान निर्माण करून दिले. आज लातूरच्या जलपरीची चर्चा होते. सर्वार्थाने नैसर्गिक प्रतिकूलता असलेल्या लातूरची ओळख राज्यात त्यांच्यामुळे निर्माण झाली. प्रतिकूलतेवर मात करण्यासाठीच त्यांनी लातूर बॅरेजेसचा पॅटर्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या तीन-चार वर्षांत पाऊसच नाही तर बॅरेजेसमध्ये पाणी कोठून येणार? लातूरच्या पाणीप्रश्नावर उजनी धरण हा एकमेव कायमस्वरूपी उपाय आहे, हे मराठवाड्याला हक्काचे पाणी उजनीतून देण्याचा ठराव मुख्यमंत्री म्हणून करणाऱ्या विलासरावांना निश्चितच माहीत होते. कदाचित मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अजून मिळत नाही आणि विलासराव लातूरला पाणी नेण्यासाठी हट्ट करताहेत असा चुकीचा संदेश गेला असता, म्हणूनच त्यांनी त्याऐवजी अन्य मार्ग धुंडाळण्याचा प्रयत्न केला असावा, असो. आपल्या व्यक्तिमत्त्वाने जनमानसाच्या हृदयात त्यांनी निर्माण केलेले स्थान आजही कायम आहे.
जे नवे ते लातूरला हवे, असे आयुष्यभर म्हणणाऱ्या विलासरावांनी सदैव सकारात्मक राजकारण केले. त्यामुळे ते काही क्षणात राजकीय शत्रुत्व संपवून नव्या मैत्रीच्या पर्वाची सुरुवात करायचे. याची प्रचिती अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी उभ्या महाराष्ट्राला दिली. सहवासात आलेल्या माणसाला जतन करणे, संवेदनशीलता अबाधित राखणे आणि नव्याचा शोध घेत राहण्याचा प्रयत्न ते सतत करत राहिले. त्याच कारणाने १९९३ साली भूकंपग्रस्तांचे दु:ख पाहून ढसढसा रडताना आम्ही विलासरावांना पाहिले. लातूरच्या मूक-बधीर विद्यार्थ्यांमध्ये तासन्तास रमणारे विलासराव आम्ही पाहिले. ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी माझ्या सांगलीच्या निवासस्थानी भेट दिली होती. लिफ्ट नसलेल्या चौथ्या मजल्यावरील घरी मुख्यमंत्री येणार कसे, असा प्रश्न प्रशासनाला पडला होता. त्यांनी मात्र ‘माझ्या स्नेह्याच्या घरी जाण्यासाठी कितीही मजले चढू !’ असे ठामपणे सांगितले. असे वेगळे अनुभव राज्यातील असंख्य स्नेह्यांनी घेतले. त्या अनुभवांवर प्रभाव होता तो ‘दिलदार देशमुखी’चा ! तो वसा जतन करण्याचे काम स्व. विलासरावांच्या पत्नी वैशालीताई, बंधू आ. दिलीपराव, चिरंजीव आ. अमित, अभिनेता रितेश व धीरज नेटाने आज करीत आहेत.