माणसांवर प्रेम करणारा विचारवंत लेखक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 02:37 AM2018-03-28T02:37:08+5:302018-03-28T02:40:49+5:30
आंबेडकरी चळवळीत दलित साहित्याच्या माध्यमातून ज्या विचारवंत, लेखक, समीक्षकांनी मोलाचे योगदान दिले त्यातील एक उत्तुंग नाव म्हणजे ‘अस्मितादर्श’चे संपादक पद्मश्री
आंबेडकरी चळवळीत दलित साहित्याच्या माध्यमातून ज्या विचारवंत, लेखक, समीक्षकांनी मोलाचे योगदान दिले त्यातील एक उत्तुंग नाव म्हणजे ‘अस्मितादर्श’चे संपादक पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे सर हे एक होत. आज जागतिक पातळीवरील साहित्य विश्वात जे विद्रोही दलित साहित्य, दखलपात्र ठरले आहे त्याच्या पाऊलखुणा खरे तर औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात प्रथम उमटल्या. १९६० च्या दशकात प्राचार्य म.भि. चिटणीस, प्रा. ल.बा. रायमाने यांनी महाविद्यालयाच्या वार्षिकांकामधून विद्यार्थ्यांचे गावकुसाबाहेरील दाहक अनुभव छापले. हे अनुभव इतके दाहक ठरले की, वाचणारे पार हादरून गेले. या प्रक्रियेतूनच प्राचार्य म.भि. चिटणीस, डॉ. म.ना. वानखेडे आदींना अमेरिकन ब्लॅक लिटरेचरच्या धर्तीवर दलितांचे दाहक जीवन चित्रित करणारे दलित साहित्य लिहिले जावे, अशी कल्पना सुचली व दलित साहित्य संकल्पनेचा उदय झाला. याच काळात डॉ. पानतावणे सरांच्या ‘अस्मितादर्श’चाही जन्म झाला. राजा ढाले, नामदेव ढसाळसारखे लेखक-कवी ‘अस्मितादर्श’मधून लिहू लागले. प्र.ई. सोनकांबळे यांचे गाजलेले ‘आठवणीचे पक्षी’ हे दाहक आत्मकथन प्रारंभी ‘अस्मितादर्श’मधूनच प्रसिद्ध झाले. ‘अस्मितादर्श’ने दलित साहित्याची जी चळवळ सर्वदूर नेली त्यात डॉ. गंगाधर पानतावणे सरांचे कष्ट नि परिश्रम मोठे आहे. पानतावणे सरांनी ‘अस्मितादर्श’साठी जी मेहनत घेतली त्यास तोड नव्हती. लेखक-कवींना लिहिते करणे, पत्रव्यवहार करणे, छपाईचा मजकूर प्रेसमध्ये घेऊन जाणे, अंक पोस्टात नेऊन टाकणे आदी कामे करताना सरांनी आपण फार मोठे संपादक आहोत, असा गंड मुळीच बाळगला नाही. ‘अस्मितादर्श’वर त्यांनी अपत्यवत प्रेम केले. लेखक-वाचक मेळावे भरविले. मेळाव्यातून दलित साहित्य, साहित्यातील प्रवाह तसेच दलित समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक प्रश्नांची चर्चा घडवून आणून दलित चळवळीला आंबेडकरी दिशा देण्याचे उल्लेखनीय काम केले, हे नाकारता येत नाही.
डॉ. पानतावणे सर हे एक विचारवंत, अभ्यासक, लेखक नि जाणकार समीक्षक होते. फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा त्यांचा व्यासंग खोलवर होता. प्रभावी वक्तृत्व, अभ्यासपूर्ण मांडणी, हे त्यांच्या व्यासंगाचे वैशिष्ट्य होते. ग्रंथाच्या सहवासात राहणे, अखंड वाचन करणे आणि चिंतन-मननातून लेखन करणे हा सरांचा जीवनधर्म होता. विद्रोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धम्मचर्चा, मूकनायक, मूल्यवेध ही त्यांची ग्रंथसंपदा म्हणजे त्यांच्या व्यासंगाचा विलोभनीय आविष्कार ठरला. सरांची आंबेडकरी निष्ठा, त्यांचे दलित साहित्य चळवळीतील भरीव योगदान, मराठी समीक्षेला त्यांनी प्राप्त करून दिलेली एक उंची लक्षात घेता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळायला हवे होते; पण ते राहून गेले. मात्र, अमेरिकेत सॅनहोजे येथे २००९ साली झालेल्या पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले ही सरांच्या व्यासंग आणि साहित्य सेवेस मिळालेली पावतीच होती; पण दुर्दैवाचा भाग असा की सर रुग्णशय्येवर पडून असतानाच, त्यांना यंदा पद्मश्री पुरस्काराने गौरविले गेले हा सरांचा मोठा सन्मान ठरला.
डॉ. पानतावणे सरांचे माणसांवर मोठे प्रेम होते.
वेळेचे भान, वक्तशीरपणा हा त्यांचा स्वभाव होता. परखडपणा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आलेल्या-गेलेल्यांचे आगत-स्वागत करणे त्यांचा आग्रहाने पाहुणचार करणे, तब्येतीने खाणे आणि खिलवणे यात पानतावणे सरांना एक विलक्षण आनंद वाटायचा. सर निर्व्यसनी होते. दररोज सकाळी ६ वाजता नित्यनेमाने फिरायला जाण्याचा क्रम त्यांनी कधीही चुकविला नाही.
मराठवाड्याच्या जनजीवनाशी ते एकरूप झाले होते. भाऊसाहेब मोरेंविषयी त्यांना आदर होता. विद्यार्थीप्रिय शिक्षक असणारे पानतावणे सर अनेक लेखक-कवींचे आधारस्तंभ होते. पानतावणे सरांच्या जाण्याने माणसांवर-माणुसकीवर प्रेम करणारे एक सजग व्यक्तिमत्त्व हरवले आहे. व्यासंग पोरका झाला आहे. चिंतन कोलमडून पडले आहे. अभ्यास सुन्न झाला आहे. सरांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
- बी.व्ही. जोंधळे