शब्दझुळूक

By admin | Published: September 19, 2016 04:29 AM2016-09-19T04:29:27+5:302016-09-19T04:29:27+5:30

आपण सण उत्सव साजरे करतो. जयंत्या मयंत्या साजऱ्या करतो.

Word phrase | शब्दझुळूक

शब्दझुळूक

Next


आपण सण उत्सव साजरे करतो. जयंत्या मयंत्या साजऱ्या करतो. ह्यात मन किती, तन किती आणि धन तर आहेच, ह्याचा विचार करायला हवा. माणसांचा द्रोह हवा चांगल्या विचारांसाठी. पण द्रोहालाही सांगायला हवं! विवेक स्वीकार. विद्रोहाचा खरा अर्थ विवेकाने केलेला द्रोह हाच आहे. आपण फक्त आग आग करीत राहतो. उरते काय, प्रचंड धगीनंतर फक्त राख. सर्वच महामानवांनी ‘खळांची व्यंकटी सांडो’ म्हटलं. धर्मरक्षणासाठी केलेला द्रोह वैचारिक स्थित्यंतरात हवा, पण तो रक्त सांडण्यात जातो.
दु:ख, वेदना, द्रोह, नकार ह्या मानवी जाणिवा काव्य होतात. हरीण पळते आहे जीव मुठीत धरून मागे वाघ लागला म्हणून. एका ठिकाणी अडकते. हात पाय गुंतून पडतात. त्याला वाटते आता आपली सुटका नाही. आपण वाचू शकत नाही. ते अगतिक डोळ्यात भीतीयुक्त प्राण घेऊन उभे आणि मागून वाघ येतो आक्रमक पावलांची झडप घालण्याच्या तयारीत. अशा वेळी हरिणाच्या डोळ्यात जे काही असतं ना त्यालाच गजल म्हणतात. विविध शायर, कवींनी प्रत्येक काव्यप्रकाराचे वर्णन एकेका दृश्यभावनेशी निगडित केलंय. म्हणजे कोणतीही कला वा शब्द हा जगण्याशीच निगडित आहे.
आपण म्हणत राहतो ‘कफन को जेब नही होती’ म्हणजेच जाताना देहाएवढीच जागा, तीही आपली नाही, शवावर लोक चढवतील ते कपडे, वाहतील ती फुले, नाही तर अखंड नग्न. अपघातात छिन्नविच्छिन्न झालात तर शरीराचे तुकडे गोळा करून जमा करणार देह! आणि सामूहिक दहन करणार! म्हणून काय काय जमा करीत राहायचे आयुष्यभर? आपला अखंड निर्मळ श्वासच हवा! तो पुरेसा आहे! फक्त त्याची सोबत महत्त्वाची. तो म्हणाला बाय की आपलं खरं नाय. बघता बघता श्वासांसारखी सोबत करणारी माणसं फट्टदिशी विझतात, निघून जातात आणि आपण उर्वरित काळात हळहळत राहतो. मग त्या व्यक्तीच्या स्मृती, वस्तू, घर, कपडे सांभाळत राहायचे. कवटाळायचे. त्यापेक्षा त्याचा शब्द सांभाळा. ह्या अर्थाने कवी लेखक कलावंत भाग्यवानच म्हणायला हवेत. एखादी कलाकृती एखादी ओळ आपल्याला देऊन जाणारे कवी, विचारवंत हे खरे सोबती असतात. मग केशवसुत असोत, कुसुमाग्रज, बोरकर, ढसाळ, अरुण कोलटकर असोत की बालकवी, पाडगावकर ते अगदी काल परवाच जिवाला चटका लावून गेलेला नलेश पाटील, चिल्लर चांदण्या मोजण्यासाठी स्वर्गात सोडून गेलेला असो, शेवटी हे सगळे आपल्यासोबत आहेत हे महत्त्वाचे. ह्यांच्या अक्षरांनी, चित्रांनी, गाण्यांनी, निसर्गातील अखंड संवेदनांनी प्रत्येक हृदयाचा गाभारा भरलेला असला तर जीवन तर सुसह्यच होतं पण ये मरणा म्हणण्याचं अमोघ धाडस प्रत्येकाच्या आयुष्यात येतं. ह्या जगण्याच्या क्षणांची झुळूक मन सतेज करीत राहणार आहे आणि ही सतेज मनं एकत्र आलीत की माणुसकीच्या गंधाने भरणार आहे गगनाचा गाभारा! ही शब्दझुळूक जपू या!
-किशोर पाठक

Web Title: Word phrase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.