संघर्षाची प्रेरणा देणारा कामगार दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 03:59 AM2018-05-01T03:59:28+5:302018-05-01T03:59:28+5:30
१ मे हा जागतिक कामगार दिन असून योगायोगाने महाराष्ट्राचा स्थापना दिवस आहे. श्रमिकांवरील अन्याय व अत्याचाराच्या विरुद्ध संघर्ष व एकजुटीची प्रेरणा देणारा दिवस असून
१ मे हा जागतिक कामगार दिन असून योगायोगाने महाराष्ट्राचा स्थापना दिवस आहे. श्रमिकांवरील अन्याय व अत्याचाराच्या विरुद्ध संघर्ष व एकजुटीची प्रेरणा देणारा दिवस असून त्याचे महत्त्व कामगारांसाठी चिरंतन राहील. औद्योगिक क्रांतीनंतर व्यापारी, कारखानदार वगैरेचा आर्थिक वर्चस्व असलेला नवा वर्ग अस्तित्वात आला. या वर्गाने राजकीय वर्चस्व हस्तगत केल्यानंतर भांडवलशाही युगाची सुरुवात झाली.
अमेरिकन फेडरेशन आॅफ लेबर या संघटनेने असा संकल्प जाहीर केला की १ मे १८६६ पासून सर्व कामगारांसाठी आठ तासांचा कामाचा दिवस लागू करण्यात यावा. या मागणीच्या समर्थनार्थ ३ मे रोजी शिकागो शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यात पाच लाख कामगारांनी भाग घेऊन शक्तिप्रदर्शन केले. परंतु सत्ताधीशांनी ते आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसांकरवी वरवंटा फिरवला.
देशात कामगार हिताचे अनेक कायदे झाले आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी शासकीय यंत्रणेकडून परिणामकारकरीत्या होत नसल्यामुळे त्याचा फायदा कामगारांना मिळत नाही. कामगार संघटना हे एक सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे. परंतु कामगार वर्गामध्ये मोठी दरी निर्माण झाली असल्यामुळे त्यांची संघटन शक्ती विखुरलेली आहे. अशावेळी काही संकल्प करण्याची आवश्यकता आहे. १) एकच राष्ट्रीय कामगार संघटना करावी. २) ते जर शक्य नसेल तर राष्ट्रीय पातळीवर सर्व कामगार ट्रेड युनियनच्या महासंघाची राजकीय पक्षाशी असलेली संलग्नता बाजूला ठेवून स्थापना करावी.
-हरिभाऊ नाईक
ज्येष्ठ कामगार नेते व माजी राज्यमंत्री, नागपूर