कार्यकर्त्यांचा ‘मसिहा’ गेला !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 10:37 PM2018-04-02T22:37:25+5:302018-04-02T22:37:25+5:30

सामाजिक आणि राजकीय जीवनात एका उतुंग शिखरावर पोचलेल्या भार्इंचा प्रत्येक कार्यकर्त्याशी आणि त्या कार्यकर्त्याच्या घराशी असलेला स्नेह कुणालाही नव्या उमेदीनं जगण्याचं बळ देणारा असायचा. 2008-09 मध्ये भार्इंनी सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी सरकारने शिक्षण हक्क कायदा केला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, यासाठी महाराष्ट्रभर शिक्षण हक्क रॅली काढली होती.

Workers 'messiah' went! | कार्यकर्त्यांचा ‘मसिहा’ गेला !

कार्यकर्त्यांचा ‘मसिहा’ गेला !

Next

- धनाजी कांबळे

‘तुम्ही लढायची तयारी ठेवा, आम्ही तुमच्यासोबत आहोत,’ असे सामान्यातल्या सामान्य माणसाला बळ देणारे भाई वैद्य लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाला एक आधारवड वाटायचे. वैयक्तिक आणि सामाजिक-राजकीय कारकिर्दीत आयुष्यभर लोकशाही आणि समाजवादी मूल्यांची जोपासना करणारे आणि पदे गेल्यावर घरी बसणा-यांच्या गर्दीत ९०व्या वर्षीही गोरगरिबांच्या हक्कांसाठी तळमळीने लढणारे भाई वैद्य हे एक क्रांतिकारी अजब रसायनच म्हणायला हवे. सामाजिक आणि राजकीय जीवनात एका उतुंग शिखरावर पोचलेल्या भार्इंचा प्रत्येक कार्यकर्त्याशी आणि त्या कार्यकर्त्याच्या घराशी असलेला स्नेह कुणालाही नव्या उमेदीनं जगण्याचं बळ देणारा असायचा. 2008-09 मध्ये भार्इंनी सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी सरकारने शिक्षण हक्क कायदा केला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, यासाठी महाराष्ट्रभर शिक्षण हक्क रॅली काढली होती. त्या वेळी भार्इंच्या सोबत पहिल्या दिवसापासून काही दिवस पत्रकार म्हणून सोबत होतो. त्या वेळी भार्इंना जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. वय वाढलं होतं; पण भार्इंचा प्रत्येक शब्द अन् शब्द तरुणालाही लाजवेल असा असायचा. त्यांचा उत्साह आणि ताजेपणा सोबतच्या प्रत्येकाला एक नवी उमेद द्यायचा. शिक्षण हक्क रॅलीचे उद्घाटन पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते झाले होते. त्या वेळी देखील भार्इंनी शिक्षणक्षेत्रात काम करणा-या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, प्राध्यापकांनी आणि कुलगुरू पदापर्यंत पोचलेल्या शिक्षणतज्ज्ञांनी गोरगरिबांपर्यंत शिक्षण पोचले पाहिजे. प्रत्येक मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली पाहिजे, असे ठामपणे सांगितले होते. सरकारात असलेले कुणीही सत्ताधारी हे नेहमीच बड्या भांडवलदारांच्या हिताच्या बाजूला झुकलेले असतात. पण ज्यांना समाजाप्रती काही उत्तरदायित्व वाटते, त्यांनी तरी गरीब, पिचलेल्या समाजाबरोबर राहिले पाहिजे, त्यांच्या अंधारलेल्या संसारात उजेड पेरला पाहिजे, अशी भूमिका भार्इंनी मांडली होती. या उद्घाटनसत्राची सुरुवात... ग म भ न शिका आणि उचला पेन्सील पाटी...या गाण्याने झाली होती. आणि हे भाग्य मला लाभले होते. त्या वेळी नरेंद्र जाधव यांच्यासह सगळ्यांनी कौतुक करून शिक्षण घरोघरी पोचवायची जबाबदारी जशी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील लोकांची आहे, तशीच ती माध्यमांचीही आहे, म्हणून माझ्या पाठीवर थाप दिली होती. भार्इंनी पाठीवर ठेवलेल्या हाताचा स्पर्श आजही जाणवतो. स्वातंत्र्य चळवळीतला एक सैनिक आणि गोरगरीब जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत, असे शेवटपर्यंत म्हणत आलेल्या भार्इंनी लहान-मोठा असा कधीच भेद केला नाही. मी माध्यमातला असलो तरी कार्यकर्ता आहे, हे त्यांनी न सांगताही ओळखले होते. सामाजिक भान जागे ठेवून लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठवणा-या लेखक-पत्रकारांची गरजच आहे, असे ते नेहमी म्हणत. कोल्हापुरात रॅली पोचल्यावर त्या ठिकाणी पत्रके, सभा या माध्यमातून शिक्षणाचा जागर झाला आणि त्यानंतर आम्ही सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत गेलो. तिकडून परत येताना आम्ही आज-यातून येणार होतो. त्यामुळे भार्इंनी स्वत:हून माझ्या घरी जाऊ या असे सगळ्यांना सांगितले. गाडी अंबोलीचा घाट चढून वर येत होती, त्या वेळी भार्इंनी मला स्वत:जवळ बोलवून घेतले. आमच्यासोबत दोन मोठ्या गाड्या होत्या. त्यातल्या एका गाडीत आम्ही होतो. दुसºया गाडीत आणखी काही कार्यकर्ते होते. ज्येष्ठ कार्यकर्ते नितीन पवार यांच्यासह आणखी मोठे लोक होते. आमचे गाव (खेडे) आले. रस्त्यापासून आत साधारण ३-४ किलोमीटर आमचं घर आहे. सुरुवातीला गाव सुरू होतं. त्यानंतर गावाच्या शेवटी आमचं घर. घर येईपर्यंत भाई गावांच्या रचना कशा पद्धतीने केल्या जातात, याबद्दल बोलत होते. रस्ता असा होता, की त्या रस्त्यावरून त्या मोठ्या आकाराच्या गाड्या जात नव्हत्या. गाडीचा चालक खूप कसरत करून उतारावरून गाडी पुढे नेत होते. घरी पोचलो. त्या वेळी ही कुणीतरी मोठी माणसं आहेत, एवढंच काय ते माझ्या घरच्यांना कळत होतं. चहापाणी झालं आणि कुणीतरी कार्यकर्त्यांनी आमच्या घरासमोर भार्इंसोबत सगळ्यांचा फोटो काढला. तो फोटो पुढे माझे वडील सगळ्या गावभर दाखवत फिरायचे, आमच्या घरी गृहराज्यमंत्री आले होते म्हणून. घरातल्या साध्याभोळ्या माणसांसोबत बोलतानाही भाई अतिशय ओघवत्या भाषेत बोलले आणि तुमचा पोरगा आमच्याकडे चांगला आहे, तुम्ही काही काळजी करू नका, असे सांगितले. गावात भाई येऊन गेल्याचे समजल्यावर गावातल्या प्रस्थापित राजकीय नेत्यांनी त्यानंतर मला फोन करून आधी का सांगितलं नाही. आम्ही भार्इंचा सत्कार करणार होतो, असे सांगून पुढच्यावेळी आधी सांगा, असे म्हटले. पण, भाई आमच्या घरी येणं ही आमच्या गावासाठीही अभिमानाची गोष्ट होती. शिक्षण हक्क रॅलीचा आणि भार्इंनी केलेल्या पाठपुराव्याचा परिणाम असा झाला की, शिक्षण हक्क कायदा सरकारला करायला भाग पडले. गोरगरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे, ही भार्इंची मागणी सरकारने मान्य केली.

त्यानंतर सातत्याने भार्इंशी संपर्क होता. त्यांची भेट होईल तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी आमच्या कुटुंबाची आस्थेवाईकपणे चौकशी केली. काय कमी-जास्त असेल तर संकोच करू नको; मला कधीपण फोन करून कळव, असे भाई म्हणायचे. माझा मुलगा (मिहीर) तीन महिन्यांचा असल्यापासून मी चळवळीच्या आंदोलनांमध्ये जेव्हा जमेल तेव्हा जायचो. अनेकदा भाई त्या ठिकाणी असायचे. पोटाशी बांधलेल्या बाळाला घेऊन मी आंदोलनात आलेला पाहून त्यांच्या डोळ्यांत समाधान दिसायचं. समाजासोबत बांधिलकी जपणारी माणसं नेहमीच भार्इंना आपली वाटायची. एकदा मी आणि मिहीर भार्इंना भेटायला घरी गेलो होतो. त्या वेळी भाई नुकतेच एका कार्यक्रमातून आले होते. काही संशोधक विद्यार्थ्यांसोबत चर्चा करीत होते. घरात दुसरे कुणी नव्हते. त्यामुळे आम्ही घरात पोचलो. तेव्हा सूर्य डोक्यावर आला होता. त्यामुळे भार्इंनी मिहीरला आधी पाणी दिले आणि पाच मिनिटे जरा शांत बसा, असे सांगितले. मिहीर काही शांत बसायला तयार नव्हता. साधारण दोन-अडीच वर्षांचा होता मिहीर. त्यामुळे घरात इकडेतिकडे फिरायला मुक्त जागा दिसल्यामुळे मिहीर घरातल्या प्रत्येक खोलीत फिरून येत होता. तोपर्यंत संशोधक विद्यार्थी निघून गेले आणि भाई बोलत राहिले. स्वातंत्र्य चळवळीपासून ते आजच्या सामाजिक राजकीय चळवळींची अवस्था याबाबत भाई वास्तववादी भूमिका मांडायचे. अर्धा-एक तास झाला आणि भार्इंनी मिहीरसाठी दूध आणि बिस्किटे टेबलवर ठेवली आणि मिहीरला आपल्याजवळ घेऊन बोलू लागले. त्या वेळी माणूस कितीही मोठा झाला, तरी तो जर माणसांमधला असेल तर तो अंतर ठेवून जगत नाही, याची प्रचिती आली. आम्ही घरातून बाहेर पडताना मिहीरच्या डोक्यावर टोपी घालून, ऊन जास्त आहे, असे सांगणारे भाई माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना माणूसपण शिकवून जात. माणसाबद्दलची संवेदना नेहमी जिवंत ठेवा, असे सांगत. शरीर थकलं म्हणून माणसं बाहेर चालणं-फिरणं कमी करतात; पण हा क्रांतिकारी ‘मसिहा’ शेवटच्या श्वासापर्यंत थकला नाही. जिथे जिथे प्रबोधन करण्याची संधी मिळेल, ती भार्इंनी दवडली नाही. भार्इंची आणखी एक विशेष गोष्ट अशी की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात वेळेला खूप महत्त्व दिले. कोणत्याही ठिकाणी कार्यक्रमाला भाई असतील, तर ते वेळेच्या आधीच तिथे पोचायचे. जातीवादी, धर्मांध पक्ष-संघटनांचे कार्यक्रम वगळता ते सगळीकडे जात असत. प्रत्येक ठिकाणी त्यांनी लढणा-या माणसांना बळ देण्याचं काम केलं. आपल्या वयाचा आणि कार्याचा कधी बडेजाव केला नाही. सर्वसामान्य माणसांसोबतची त्यांची नाळ शेवटपर्यंत कायम होती. समाजाच्या कल्याणाचा विचार करणारा तो कुणीही असला तरी तो त्याला सोबत घ्या; पण देशात अशांतता पसरवणा-यांना थारा देऊ नका, असे ते सातत्याने सांगत राहिले. अशा भार्इंच्या जाण्याने माझ्यासारख्या अनेक तरुण कार्यकर्त्यांचा एक आधारवड आम्ही गमावला आहे. 

Web Title: Workers 'messiah' went!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.