कार्यकर्त्यांनी जबाबदारी ओळखावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:50 AM2018-04-12T00:50:06+5:302018-04-12T00:50:06+5:30
भाजपच्या स्थापना दिवसासाठी उपराजधानीतून मुंबईला गेलेल्या रेल्वेगाडीचे ‘पुराण’ चांगलेच गाजले. समन्वयाच्या अभावातून चुकलेली रेल्वेगाडीची वेळ, त्यानंतर कार्यकर्त्यांना झालेले ‘गुजरात दर्शन’ यांची चांगलीच चर्चा झाली.
भाजपच्या स्थापना दिवसासाठी उपराजधानीतून मुंबईला गेलेल्या रेल्वेगाडीचे ‘पुराण’ चांगलेच गाजले. समन्वयाच्या अभावातून चुकलेली रेल्वेगाडीची वेळ, त्यानंतर कार्यकर्त्यांना झालेले ‘गुजरात दर्शन’ यांची चांगलीच चर्चा झाली. विशेष रेल्वेगाडीने जाणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकाºयांकडून अतिउत्साहात नियमांचा भंगदेखील झाला. ‘सोशल मीडिया’वर ‘बौद्धिक’ देण्यात आघाडीवर असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून भारतीय रेल्वेच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन करण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे आमदार, वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासमोर हा प्रकार सुरू असताना कुणीही त्यांना थांबविण्याची तसदीदेखील घेतली नाही. वरकरणी ही बाब फारशी गंभीर वाटत नसली व सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाºयांना त्याची तसदी घेण्याचीदेखील गरज वाटली नसली तरी यातून जनतेला मात्र चुकीचा संदेश गेला आहे हे मात्र निश्चित आहे. रेल्वेगाडी तसेच रेल्वेस्टेशनात नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे व भारताचे नागरिक म्हणून सर्वांनीच नियमांचा आदर करणे अभिप्रेत आहे. परंतु ‘स्वच्छ भारत’चे खंदे समर्थक असलेल्यांना रेल्वेस्थानकावर भारत दिसला नाही की त्यांचे समर्थन हे केवळ दिखाव्यापुरते आहे, असा प्रश्नच निर्माण होतो. भाजप म्हणजे ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहे असा दावा पक्षनेत्यांकडून अगोदरपासूनच करण्यात येतो. त्यातच अनेक कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतूनच घडले असल्यामुळे शिस्त म्हणजे काय हे वेगळ््याने सांगण्याची त्यांना गरज नाही. परंतु संघाच्या शाखेतून पक्ष संघटनेत आल्यावर बहुदा अनेकांना शिस्तीचा विसर पडतो. म्हणूनच की काय रेल्वेस्थानकावर उघडपणे बेशिस्तीचे दर्शनच कार्यकर्त्यांनी दाखवून दिले. पक्षाचेच मंत्री रेल्वे नियमांचे पालन करा, असे आवाहन करताना दिसून येतात. परंतु कार्यकर्त्यांनी ते आवाहनदेखील पायदळी तुडविले आणि सर्रासपणे सुरक्षा यंत्रणांना न जुमानता रेल्वे रुळ ओलांडले. वास्तविकरीत्या सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक भान जपण्याची व आपली जबाबदारी ओळखून वागण्याची आवश्यकता असते. नियमांचे पालन काटेकोरपणे व्हावे हीच अपेक्षा असते. जनतेचे त्यांच्यावर बारीक लक्ष असते व समाजातील वर्तन पक्षाची प्रतिमा तयार करत असते. परंतु सत्ता आली म्हणजे सर्व काही मिळाले, अशा आविर्भावात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते वावरताना दिसतात. त्यातूनच ‘हम करे सो कायदा’ अशी विचारसरणी निर्माण होते. सत्ता टिकविण्यासाठी समाजाशी निष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांचे बळ लागते. मात्र ओठात एक आणि कृतीत भलतेच अशी कार्यकर्त्यांची वर्तणूक निवडणुकांमध्ये अडचण निर्माण करणारी ठरू शकते.