पर्यटन विकासाचा ध्यास घेतलेली कार्यकर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 05:09 AM2018-11-06T05:09:39+5:302018-11-06T05:10:09+5:30
पतीच्या निधनानंतर कोल्हापुरातच स्थायिक होण्याचा निर्णय. त्यानंतर मग कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न. ६२ वर्षांमध्ये ५२ देश फिरणारी ही पर्यटन अभ्यासिका, लेखिका, कार्यकर्ती अरुणा जगदीश देशपांडे.
- समीर देशपांडे
(वरिष्ठ वार्ताहर, कोल्हापूर)
पार्ल्यातील ही मध्यमवर्गीय मुलगी. शिक्षणानंतर २0 वर्षे पर्यटन कंपनीमध्ये नोकरी. लग्नानंतर जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या भारतातील एका मोठ्या राजकीय नेत्यासमवेत काम. पतीच्या आजारपणामुळे महाराष्ट्राच्या एका टोकाला कोल्हापूरला वास्तव्य. पतीच्या निधनानंतर कोल्हापुरातच स्थायिक होण्याचा निर्णय. त्यानंतर मग कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न. ६२ वर्षांमध्ये ५२ देश फिरणारी ही पर्यटन अभ्यासिका, लेखिका, कार्यकर्ती अरुणा जगदीश देशपांडे.
पर्यटन कंपनीमध्ये नोकरी करताना त्यांनी त्यातील सगळे बारकावे समजून घेतले. मराठी, हिंदी, इंग्रजी उत्तम बोलत असताना जर्मन भाषाही शिकून घेतली; त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांसमवेत अरुणा असणारच. कोल्हापुरातही परदेशी पर्यटक आले, की हॉटेल मालक संघाच्या उज्ज्वल नागेशकर, सिद्धार्थ लाटकर यांचा फोन अरुणा देशपांडे यांना जायचा. जग फिरताना भारतामधील अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत; परंतु पर्यटक तिथं जात नाहीत; त्यामुळेच त्यांनी ‘बुद्धिस्ट इंडिया रिडिस्कव्हर्ड’ पुस्तक लिहिलं. त्याला जगभरातून मागणी सुरू झाली. कोल्हापूरच्या पर्यटनावर त्यांनी ‘या माझ्या कोल्हापुरी’ हे पुस्तक लिहिलं. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, दलाई लामा यांसारख्या मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील हाजगोळी (ता. आजरा) येथील जगदीश देशपांडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. जगदीश हे जॉर्ज फर्नांडिस यांचे सहकारी; त्यामुळे साहजिकच अरुणा यांचा फर्नांडिस यांच्याशी संपर्क आला. या दोघांनी जॉर्ज यांच्यासाठी खूप काम केलं. जगदीश पाटण्यात राहून, तर अरुणा या मुंबईत असूनही कार्यरत होत्या. जगदीश यांच्या आजारपणामुळे अरुणा या कोल्हापुरात आल्या. जगदीश यांच्या निधनानंतर कोल्हापुरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
कोल्हापुरात राहिल्यानंतर मग त्यांचा विचार सुरू झाला. नेहमीच वेगळा विचार करण्याचा आणि स्वत:ला पटेल ते बोलण्याचा स्वभाव असल्याने त्या कोल्हापूरला परदेशी पर्यटक का पसंती देत नाहीत, यावर रोखठोक बोलायच्या. कोल्हापूर, विजापूर आणि गोवा हा पर्यटनासाठीचा सुवर्ण त्रिकोण आहे. तो शासनाने विकसित करण्याची गरज त्या नेहमी बोलायच्या. कोल्हापूरची मराठमोळी संस्कृती, विजापूरची मुस्लीमप्रभावी जीवनशैली आणि गोव्याची आधुनिक आणि ख्रिश्चन संस्कृतीचा प्रभाव असणारी जगण्याची पद्धत. अशा तीन वैविध्यपूर्ण संस्कृती आपल्याला पर्यटकांना केवळ चार, पाच दिवसांत दाखवता येतील, असे त्यांचे म्हणणे होेते. बुद्धप्रिय असणाऱ्या भारतातील स्थळांची माहिती देणारे पुस्तक प्रसिद्ध केल्यानंतर त्यांनी प्रभू रामचंद्रांनी ज्या मार्गाने वनवास पूर्ण केला, तो प्रवास करून पुस्तक लिहिण्याचा त्यांचा मनोदय होता. ‘भारतातील प्राचीन ॠषी’ या विषयावरही त्यांचे काम चालले होते.
कोल्हापुरात धड मार्ग आणि स्थळे दाखविणारे फलक नाहीत याबाबत त्या तीव्र नाराजी व्यक्त करायच्या. जॉर्ज फर्नांडिस यांच्या वाढदिनी दिल्लीत त्यांना भेटून यायच्या तर इतिहास संकलन परिषदेमध्ये शोधनिबंध वाचण्याची तयारी करायच्या. चरितार्थासाठी फार धावपळ करावी, अशी परिस्थिती नसताना गावाकडच्या लोकांपासून ते जॉर्ज फर्नांडिस यांच्या वर्तुळातील मित्रपरिवाराशी सहजपणे संपर्क साधणाºया अरुणा देशपांडे यांनी मार्च २0१९ मध्ये चीनला जाण्याचे नियोजन केले होते; परंतु चौथ्या टप्प्यातील कॅन्सर असल्याचे कळल्यानंतर महिनाभरात त्या अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या. पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी अस्वस्थ असणारे एक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.