स्पर्धेचं जग अन् अपेक्षांचं ओझं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:07 AM2017-11-23T00:07:15+5:302017-11-23T00:07:32+5:30

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, ही म्हण रुजविताना आयुष्याला शरण जाण्यासारखी परिस्थिती विद्यार्थ्यांसमोर कधीच दाखवली जाऊ नये.

The world of competition and the odds of the expectations | स्पर्धेचं जग अन् अपेक्षांचं ओझं

स्पर्धेचं जग अन् अपेक्षांचं ओझं

Next

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, ही म्हण रुजविताना आयुष्याला शरण जाण्यासारखी परिस्थिती विद्यार्थ्यांसमोर कधीच दाखवली जाऊ नये. १० वी, १२ वीच्या निकालानंतर मनासारखे गुण न मिळाल्याने आत्महत्येकडे वळणारी मुले किंवा मनासारख्या अभ्यासक्रमाला प्रवेश न मिळाल्याने मन खचलेली मुले पाहायला मिळतात. यामागे एकच कारण आहे अपेक्षांचं ओझं.
काळ इतका झपाट्याने बदलू लागला आहे की उद्याच्या पिढीसमोर काय वाढून ठेवलेले असेल हे विचार करण्यापलीकडे आहे. नवी पिढी ही अत्यंत कुशाग्र बुद्धीची आहे; मात्र सोशल मीडियामध्ये पुरती गुंतली असल्याचे दिसून येते. करिअर आणि सोशल मीडिया याचा मेळ बसवण्याची त्यांची कसरत चालू असून त्यासाठी ते रात्रीचा दिवस करत आहेत.
काहीवेळा भरकटलीही जाते. पालकांसाठी हा चिंतेचा विषय असला तरी ते त्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे. अभ्यासासाठी रात्रभर जागरण करून पहाटे चहासाठी महामार्गावर गेलेले तीन भावी इंजिनिअर वाहनाने ठोकरल्याने जागीच मरण पावले. दुसºया एका गुणवंत मुलाने मनासारख्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला नाही म्हणून आत्महत्या केली. या दोन्ही सोलापूरच्या घटना असल्या तरी ती एकंदरीतच शिक्षण क्षेत्रातील आणि स्पर्धेच्या जगातील संघर्षाची प्रतिबिंबे आहेत असंच म्हणावं लागेल.
ऐन उमेदीत आलेल्या तरुणांंनी स्वत:च्या आयुष्याची स्वप्ने पाहिली असतील. त्यांच्या पालकांनीही आपल्या मुलांच्या भवितव्याचे इमले मनात बांधले असतील. पण या सगळ्यांचा क्षणात चुराडा झाल्याने त्या कुटुंबांची अवस्था काय झाली असेल हे सांगण्यापलीकडचे आहे. आता ५० टक्के मार्काला काडीचीही किंमत राहिली नाही. ९० च्या पुढे गुण मिळवले तरच आपण कुठेतरी गुणवंतांच्या यादीत आहोत असा समज झाला आहे.
१० वी, १२ वीच्या निकालानंतर मनासारखे गुण न मिळाल्याने आत्महत्येकडे वळणारी मुले किंवा मनासारख्या अभ्यासक्रमाला प्रवेश न मिळाल्याने मन खचलेली मुले पाहायला मिळतात. यामागे एकच कारण आहे अपेक्षांचं ओझं. ‘ज्याने चोच दिली तो चाराही देईलच की’ अशी एक जुनी म्हण आहे ते खरंच आहे. नापास झाले किंवा कमी मार्क पडले म्हणजे जगण्याचा मार्ग संपला असं होत नाही. आपला मुलगा किंवा आपण मनामध्ये इतक्या अपेक्षा वाढवून ठेवतो की त्यात तडजोड करायला आपलं मन तयार होत नाही.
शिवाय बुद्धिमानांची फळीच्या फळी समोर असल्याने आपण तरी मागे का राहायचे हा मनाचा निग्रह त्यापलीकडे सुचू देत नाही. एकंदरीतच नव्या पिढीला या सगळ्या संकटाला सामोरे जायचे असल्याने तरुणाई सोशल मीडिया आणि अभ्यास या दोन्हीची कसरत करत आहेत. ही कसरत करताना आलेले नैराश्य हे आत्महत्येकडे नेणारे आहे. याचवेळी अपयश ही यशाची पायरी असते हे कुणीतरी सांगायला हवं.
आपल्या पाल्याची किंवा आपली मानसिक व बौद्धिक व आर्थिक कुवत किती, आपल्याला काय व्हायचे आहे, त्यासाठी आपण काय आणि किती प्रयत्न करतो याचा विचार जरुर केला पाहिजे. यासाठी शाळा-महाविद्यालयामध्ये कल चाचण्या घेतल्या जाव्यात. याशिवाय काही शैक्षणिक संस्था किंवा स्वयंसेवी संस्थांनीही यात पुढाकार घेतला पाहिजे.

Web Title: The world of competition and the odds of the expectations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.