विश्वचषक पराभवाची पुनरावृत्ती होते तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 05:29 AM2019-07-12T05:29:12+5:302019-07-12T05:29:53+5:30

संपूर्ण स्पर्धेत इंग्लंडविरुद्धचा पराभव वगळता विजयी घोडदौड केलेल्या भारतीय क्रिकेट संघाला उपांत्य फेरीत धक्का बसला आणि विश्वचषक स्पर्धेतील आव्हान ...

World Cup defeat repeats ... | विश्वचषक पराभवाची पुनरावृत्ती होते तेव्हा...

विश्वचषक पराभवाची पुनरावृत्ती होते तेव्हा...

Next

संपूर्ण स्पर्धेत इंग्लंडविरुद्धचा पराभव वगळता विजयी घोडदौड केलेल्या भारतीय क्रिकेट संघाला उपांत्य फेरीत धक्का बसला आणि विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. २०१५ साली ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतही साखळी सामन्यात एकही पराभव न पत्करलेल्या भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. त्याचीच पुनरावृत्ती यंदाही झाली असेच म्हणावे लागेल.


लोकसंख्येच्या दृष्टीने अब्जाधीश असलेल्या भारतात क्रिकेट म्हणजे श्वास. रोहित शर्मा-विराट कोहली यांचा सुरू असलेला धडाका, जसप्रीत बुमराह-भुवनेश्वर कुमार यांची भेदकता, कुलदीप यादव-युझवेंद्र चहल यांची फिरकी आणि एकदिवसीय क्रमवारीतील दुसरे स्थान या जोरावर तमाम भारतीय चाहत्यांचा विश्वास होता की, यंदाचा विश्वचषक आपणच जिंकू. पण उपांत्य फेरीत होत्याचे नव्हते झाले आणि सर्वांच्याच पदरी अखेर निराशा आली. हे का झाले? नेमकी कुठे चूक झाली? टीम इंडिया कुठे कमी पडली, यावर चर्चा करण्यात आता काहीच अर्थ नाही. पण या पराभवानंतर संघाला पाठिंबा दर्शवणारे सारेच चाहते क्रिकेटतज्ज्ञ झाले आहेत आणि प्रत्येक जण आपापल्यापरीने या पराभवाचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करीत आहे. यातील अनेक मुद्दे एकसारखे असून त्यावर टाकलेली एक नजर...
भारतीय संघाने स्पर्धेत जे काही विजय मिळवले, त्यात आघाडीच्या फलंदाजांचे योगदान मोलाचे राहिले. त्यामुळेच मधल्या फळीची चाचणी करण्याची फारशी संधीच मिळाली नाही. पहिले तीन फलंदाज स्वस्तात परतले, तर भारताची दैना होण्यास वेळ लागणार नव्हता आणि न्यूझीलंडविरुद्ध तेच घडले. मधल्या फळीने डाव सावरण्यावर भर दिला असता, तर आज चित्र वेगळे दिसले असते, असेच अनेकांचे मत आहे.


रिषभ पंत-हार्दिक पांड्या यांनी ‘हीरो’ बनण्याची नामी संधी गमावली. दोघांनी सावध खेळी करताना भारताचा डाव सावरत विजयाच्या अंधुक आशाही निर्माण केल्या होत्या. मात्र आक्रमणाच्या नादात दोघांनी आपल्या विकेट फेकल्या आणि पुन्हा एकदा न्यूझीलंडला वर्चस्वाची संधी मिळाली.


संघातील सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनीवर अनेकांनी संथ खेळीबद्दल टीका केली. मात्र त्यानेच रवींद्र जडेजासह न्यूझीलंडविरुद्ध अतिशय शांतपणे आणि जबाबदारीने खेळताना भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. त्याला सातव्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय का घेण्यात आला, हा प्रश्न साऱ्यांनाच सतावतो आहे. विश्वचषकाच्या आधीपासून पडलेला चौथ्या क्रमांकाचा तिढा, आता स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतरही कायमच राहिला. ३ बाद ५ धावा अशी बिकट स्थिती असताना धोनीने खेळपट्टीवर येण्याची अपेक्षा होती. परंतु, कर्णधार कोहलीने २१ वर्षीय पंतला का पाठवले? भले पंतने झुंज दिली, पण डाव सावरण्यात तो अपयशी ठरला. त्याउलट धोनीने नक्कीच अखेरपर्यंत टिकून राहत भारताला दडपणातून बाहेर काढले असते.


शिवाय सामन्यात चमकलेल्या रवींद्र जडेजाने मिळालेली संधी साधताना केवळ भारताच्या आशा उंचावल्या नाही, तर आपल्यावर झालेल्या टीकेचाही खरपूस समाचार घेतला. काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी त्याच्यावर टीका करताना ‘छोट्या छोट्या स्वरूपात चांगली कामगिरी करणारा खेळाडू’ असे मत व्यक्त केले होते. मात्र जडेजाच्या झुंजार खेळानंतर मांजरेकरने स्वत:हून आपली चूक कबूल करताना त्याची माफीही मागितली.


उपांत्य सामन्यातील अंतिम भारतीय संघ पाहून सर्वच चक्रावले. फॉर्ममध्ये असलेला मोहम्मद शमीऐवजी भुवनेश्वर कुमारला मिळालेली संधी सर्वांनाच खटकणारी ठरली. भले भुवीने ३ बळी घेतले, मात्र त्याने ६ सामन्यांतून १०, तर शमीने केवळ ४ सामन्यांतून १४ बळी घेतले. फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजाला संघाबाहेर ठेवण्याचे कारण केवळ कोहलीच देऊ शकेल. तसेच, अफगाणिस्तानविरुद्ध दमदार अर्धशतक ठोकलेल्या केदार जाधव, दिनेश कार्तिकच्या जागी अचूक बसला असता. कार्तिककडे नक्कीच अनुभव आहे, पण केदारने अनेकदा प्रतिकूल स्थितीतच छाप पाडली आहे. शिवाय कोहलीला अतिरिक्त गोलंदाजाचा पर्यायही मिळाला असता.
असो, आता जर-तर अशी चर्चा करण्याशिवाय क्रिकेट चाहत्यांकडे दुसरा पर्यायही नाही. भारतात परतल्यानंतर कर्णधार-प्रशिक्षक आपली बाजू मांडतीलच, पण आता झालेल्या चुका सुधारून पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाºया टी२० विश्वचषकासाठी पूर्ण तयारीने खेळण्यासाठी भारतीय संघाने प्रयत्न करावेत.


- रोहित नाईक। वरिष्ठ उपसंपादक

Web Title: World Cup defeat repeats ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.