मंगळाच्या जगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 01:37 AM2018-06-03T01:37:18+5:302018-06-03T01:37:18+5:30
खगोल निरीक्षणात शुक्रानंतरचा ग्रह म्हणजे मंगळ. मंगळ आपल्यासाठी नेहमीच खूपच कुतूहलाचा विषय होता. ग्रह मालिकेतील हा पहिला ग्रह जो आपल्याला रात्रभर दिसू शकतो
- अरविंद परांजपे
खगोल निरीक्षणात शुक्रानंतरचा ग्रह म्हणजे मंगळ. मंगळ आपल्यासाठी नेहमीच खूपच कुतूहलाचा विषय होता. ग्रह मालिकेतील हा पहिला ग्रह जो आपल्याला रात्रभर दिसू शकतो. याची कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर आहे. हा सूर्याची एक परिक्रमा १.८८ वर्षाने (पृथ्वीच्या ६८६.९८ दिवसांनी) पूर्ण करतो. तर दर २६ महिन्यांनी (२ वर्षे २ महिन्यांनी) अशी स्थिती येते की सूर्य पृथ्वी आणि मंगळ (सुमारे) एका रेषेत येतात. त्या वेळी याचा उदय सूर्यास्ताबरोबर होऊन, सूर्योदयाच्या वेळी तो पश्चिम क्षितिजावर अस्ताला जातो. तसेच दर १५ ते १७ वर्षांनी अशी स्थिती येते की त्या वेळी सर्ू्य-पृथ्वी-मंगळ एका रेषेत तर असतात पण त्याचवेळी मंगळ पण आपल्या कक्षेत सूर्याच्या जवळ आलेला असतो. या वेळी मंगळाचे निरीक्षण खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते.
दुर्बिणीच्या शोधानंतर १८७७ साली मंगळ ग्रहाचे असेच निरीक्षण इटलीतीत जियोवानी शापरेली या प्रख्यात खगोल निरीक्षकानी केले. त्यांना मंगळावर काही खुणा परत परत दिसल्या. त्यानंतर त्यांनी मंगळाचा नकाशा बनवण्यास सुरुवात केली. या नकाशात त्यांनी मंगळावर काही रेषा एकमेकांना छेदून जात असल्याचे दाखवले. याना इटलीत कनाली (म्हणजे खाचांसारखे) असे म्हटले. जेव्हा ही बातमी इंग्लंडमध्ये पोहोचली तेव्हा या कनालीचे भाषांतर कॅनॉल असे झाले आणि लोकांच्या कल्पनाशक्तीला जणू पंखच फुटले.
मंगळावर आपल्यासारखे किंवा आपल्याहूनही अधिक प्रगतीशील असे सजीव आहेत आणि त्यांनी मंगळाच्या ध्रुवीय भागातून विषुववृत्तीय भागावर पाणी पोहोचवण्याकरिता हे कॅनॉल बांधले आहेत असा समज पसरू लागला.
मंगळावरच्या प्रगत सजीवांचा हा प्रचार करण्यात अग्रस्थानी होते अमेरिकेचे धनवान उद्योगपती पर्सिव्हल लॉवेल. यांनी आपल्या आयुष्याचे दोनच उद्देश ठेवले होते - एक तर मंगळाचे निरीक्षण करणे आणि जेव्हा आकाशात मंगळ नसेल तेव्हा मंगळाच्या या प्रगत सजीवांबद्दल व्याख्याने देत जगभर प्रवास करणे.
याचा उच्चांक म्हणजे प्रख्यात विज्ञान कादंबरीकार एच.जी. वेल्स यांनी ‘वॉर आॅफ द वर्ल्ड’ ही कादंबरी लिहिली. यात त्यांनी मंगळवासी पृथ्वीवर आक्रमण करून पृथ्वी काबीज करण्याचा कसा प्रयत्न करतात आणि मग हे आक्रमण आपण कसे मोडून काढतो याचे वर्णन केले होते.
या कादंबरीचे रेडिओ नाट्यरूपांतर तर इतकेप्रभावी झाले होते की लोकांना खरेच वाटले की, पृथ्वीवर मंगळवासीयांनी आक्रमण केले आहे. पण आज आपण जाणतो की मंगळावर कधी काळी सजीवांचा वास होता याबद्दल कुठलाही पुरावा मिळालेला नाही.
मंगळाचा अक्ष सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या पातळीला २५ अंशाने कललेला आहे. पृथ्वीचा अक्ष साडेतेवीस अंशाने कललेला आहे. म्हणजे पृथ्वीच्या अक्षापेक्षा मंगळाचा अक्ष किंचित जास्त आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर पृथ्वीसारखेच ऋतू असतात. मंगळाच्या सूर्याच्या एका परिक्रमेत एकदा याचा उत्तर ध्रुव तर एकदा दक्षिण ध्रुव सूर्याच्या दिशेने कललेला असतो.
अनेक बाबतीत मंगळ पृथ्वीसारखा आहे. पण मंगळावर वातावरण खूप विरळ आहे आणि त्यात ७५ टक्के कार्बन डाय आॅक्साईड आहे. हे विरळ वातावरण सूर्यापासून येणाऱ्या हानीकारक विकिरणांपासून आपला बचाव करू शकणार नाही. मंगळावर कमाल तापमान २० अंश तर किमान उणे १४० सेल्सिअस असते.
मंगळाचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या फक्त अर्धा आहे आणि पृष्ठभागावर गुरुत्वीय बल पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या गुरुत्वीय बलाच्या ३८ टक्केच आहे. म्हणजे जर पृथ्वीवर तुमचे वजन ५० किलो असेल तर मंगळावर ते २० किलोपेक्षा कमी भरेल.
मंगळ आपल्याला लाल रंगाचा दिसतो, त्यामागचे कारण म्हणजे मंगळाच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात आॅक्सिडाईज्ड लोह म्हणजेच गंज आहे. ज्याचा रंग लाल असतो. याच्या ध्रुवीय भागावर आपल्याला बर्फाचा साठा दिसतो. म्हणजे कधी काळी इथे पाणी असलं पाहिजे जे काही कारणांमुळे उडून गेले. जर या ग्रहावर पाण्याचा साठा होता तर इथे कधी काळी जीवाणूंच्या स्वरूपाचे का असेना, सजीवांचे अस्तित्व असण्याची शक्यता नाकारत येत नाही.
(लेखक नेहरू तारांगणचे संचालक आहेत.)