तणाव आणि नैराश्याच्या दरीतली अंधारयात्रा

By विजय दर्डा | Published: October 10, 2022 09:05 AM2022-10-10T09:05:47+5:302022-10-10T09:06:58+5:30

ख्यातनाम तारे-तारका असोत, वा सामान्य माणूस; प्रत्येकाचे आयुष्य तणावाने झाकोळलेले आहे. या प्रश्नाचे गांभीर्य आपण जाणतो तरी का?

World Mental Health Day: A dark journey through the valley of stress and depression | तणाव आणि नैराश्याच्या दरीतली अंधारयात्रा

तणाव आणि नैराश्याच्या दरीतली अंधारयात्रा

Next

-  विजय दर्डा 
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, 
लोकमत समूह
अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये दीपिका पदुकोणने तिला आलेल्या ‘डिप्रेशन’च्या अनुभवाबद्दल खुलेपणाने सांगितले, तेव्हा अवघा देश थक्क झाला होता. त्याहीआधी एका मुलाखतीत दीपिकाने तिच्या आयुष्यातला तो गुंतागुंतीचा कठीण काळ उलगडून दाखवला होता. आपल्या मानसिक  अस्वास्थ्याबद्दल एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने इतक्या मोकळेपणाने बोलण्याची ही पहिलीच वेळ. तेव्हा दीपिकाच्या हिंमतीचे सर्वांनीच कौतुक केले. त्यानंतर  अभिनेता टायगर श्रॉफ, अनुष्का शर्मा, वरुण धवन यांनीही मानसिक अस्वास्थ्याच्या अनुभवाबद्दल सांगितले. प्रसिद्ध व्यक्तींचे जगणे इतके तणावाचे, तर सामान्य माणसाची परिस्थिती काय असेल, याचा  विचार करा.

आज १० ऑक्टोबर. जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन. जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने १९९२ मध्ये पहिल्यांदा ‘मानसिक स्वास्थ्य दिवस’ साजरा केला गेला. या गोष्टीला आता तीस वर्षे होत आली. या काळात आपण काय मिळवले? 
मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीच्या मुळाशी असतो, तो तणाव! काळानुसार आपल्या आयुष्यात तणाव सातत्याने वाढतो आहे. या तणावामुळेच लोक औदासिन्याची, नैराश्याची- म्हणजेच डिप्रेशनची शिकार होतात. ताज्या आकडेवारीनुसार देशात सुमारे ५ कोटी ६० लाख लोक डिप्रेशनचे तर सुमारे ३ कोटी ८ लाख लोक चिंतेशी संबंधित आजारांचे शिकार आहेत. हे झाले कागदावरचे आकडे ! वास्तव हे की सध्या प्रत्येकालाच कसल्या ना कसल्या नैराश्याने ग्रासले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तणाव नसेल का? राहुल गांधी, ममता बॅनर्जी किंवा अरविंद केजरीवाल किंवा अमिताभ बच्चन यांना तणावाला सामोरे जावे लागत नसेल का? ज्याचे जे स्थान आणि जे काम, त्यानुसार तणावाचे प्रकार वेगळे, एवढेच ! तणाव  असतोच! मुख्य प्रश्न असा की या तणावाचा सामना आपण कसा करता? 


तणाव अनेक कारणांनी निर्माण होऊ शकतो.  काही लोक अत्यंत छोट्या-छोट्या गोष्टींचा ताण घेतात. काही लोक इर्षेचे शिकार असतात. दुसऱ्याची प्रगती पाहून काहीजण तणावग्रस्त होतात. तिसरे कारण असते ते म्हणजे व्यवस्थेतील त्रुटी आणि वैताग ! सरकारी कचेऱ्यात आता पुष्कळ बदल झाला आहे; पण कारभारातली गुंतागुंत संपलेली नाही. आपल्याला एक साधे प्रमाणपत्र हवे असेल तर केवढे प्रयास करावे लागतात! एखाद्या गरिबाला रेशन दुकानातून रेशन घ्यायचे असेल किंवा सरकारी इस्पितळात उपचार घ्यायचे असतील किंवा काही सरकारी काम असेल,  नोकरीचा प्रश्न असेल; तर या सगळ्याचा केवढा ताण येतो ! 

घरातली तरुण मुलगी बाहेर गेली तर ती घरी परतेपर्यंत आई तणावाखाली असते. ही परिस्थिती बदलायची असेल तर शासकीय, सामाजिक आणि व्यक्तिगत स्तरावरील व्यवस्था सुधारावी लागेल, तरच तणावाची कारणे कमी होतील!
आजकाल लहान मुलांची स्थिती पाहून मी बेचैन होतो. मूल जेमतेम सहा वर्षांचे झाले रे झाले की त्याला तणावाच्या भट्टीत झोकून दिले जाते. तो बघ तो अमक्याचा मुलगा इतके टक्के मार्क मिळवतो, तुला इतके कमी कसे..? तो तमक्याचा मुलगा किती चांगला गातो; तू का नाही गात? वगैरे वगैरे... आई-वडिलांच्या अपेक्षांमधून जन्माला येणाऱ्या या तणावाने लहान मुलांचे लहानपण हिरावून घेतले आहे. तरुणाईचे तर कंबरडे मोडले आहे. हा सगळा तणाव साचत जातो आणि एक दिवस विक्राळ स्वरूप धारण करतो.
समाजातल्या काही लोकांना मात्र हा असा ताणबिण काही येत नाही.  ते कर्ज घेतात आणि विसरून जातात. काही लोक बँकांतून लाखो-करोडो रुपयांचे कर्ज घेतात आणि परदेशात पळून जातात. देशात राहिले तरी  दिवाळखोरी घोषित करतात. दिवाळखोरीत निघाल्यानंतरही त्यांच्याकडे राहायला आलिशान घर असते, विमान प्रवास करण्यासाठी दुसऱ्याच्या नावाने विमान असते, ही गोष्ट वेगळी. एखाद्या सामान्य माणसाला जर गाय विकत घ्यायला कर्ज पाहिजे असेल तर त्याला विचारले जाईल, ‘तुला दूध काढता येते की नाही?’ पण एखाद्याला ५० कोटींचे कर्ज पाहिजे असेल तर केवळ एका फोनवर ते मिळू शकते. 

- या गोष्टी सामान्य माणसाच्या मनात तणाव उत्पन्न करतात.  प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नित्यानंद ऊर्फ नीतू मांडके मुंबईत मोठे हॉस्पिटल बांधत होते. त्यात उत्पन्न झालेल्या समस्यांमुळे त्यांना मोटारीतच हृदयविकाराचा झटका आला. व्यवस्थेची योग्य ती मदत मिळाली असती तर त्यांना वाचवता आले असते. एक मुलगा मुलाखतीसाठी बसने जात होता. बस ट्रॅफिक जाममध्ये अडकली. त्याला वाटले, आपण मुलाखतीला वेळेवर पोहोचू शकणार नाही. या तणावाने  त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच त्याचे प्राण गेले. 
- तणावमुक्त राहणे आपल्या हातात नाही. संपूर्ण वातावरण तणावमुक्त असेल तरच सामान्य माणूसही तणाव मुक्त होईल. माझ्या स्वतःच्या अनुभवाच्या आधारे मी म्हणू शकतो की तणावावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय जीवन पद्धती सर्वात चांगली आहे. योगाभ्यास आणि ध्यानधारणा यांच्या अवलंबाने तणावाचे व्यवस्थापन करण्यात निश्चितच मदत होते. आधुनिक विज्ञानही हे मान्य करते.

महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा सगळ्यांनी योग आणि साधनेला आपल्या जीवनात स्थान दिले होते. त्यामुळेच ते १६ तास काम करूनही कधी थकले नाहीत. आपला हा वारसा समजून घ्या. संतुलित राहा. हसणाऱ्या हसवणाऱ्या लोकांमध्ये राहा. मस्त रहा. व्यस्त राहा. तणाव दूर ठेवण्यात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. 
एक जुनी म्हण आहे, ती लक्षात ठेवा - ‘इच्छा असते तेथे मार्ग दिसतो !’

Web Title: World Mental Health Day: A dark journey through the valley of stress and depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.