विश्वविक्रमी महिला
By admin | Published: May 19, 2017 02:41 AM2017-05-19T02:41:35+5:302017-05-19T02:41:35+5:30
क्रिकेट हा प्रामुख्याने पुरुषांचा खेळ म्हणून ओळखला जातो. परंतु, या खेळातील महिलांचे योगदान लक्षात घेतल्यास नक्कीच हा खेळ मर्यादित नसल्याची जाणीव होईल.
क्रिकेट हा प्रामुख्याने पुरुषांचा खेळ म्हणून ओळखला जातो. परंतु, या खेळातील महिलांचे योगदान लक्षात घेतल्यास नक्कीच हा खेळ मर्यादित नसल्याची जाणीव होईल. शिवाय सलग दोन आठवड्यात तीन महिला क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडवत हे सिद्ध केले आहे. झूलन गोस्वामी, दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत या त्रिकूटाने सध्या महिला क्रिकेटमध्ये विक्रमांचा एव्हरेस्ट उभारला असून, भारतीयांसाठी ही अत्यंत गर्वाची बाब आहे. त्याचवेळी, महिला कोणत्याही खेळात आणि क्षेत्रात कमी नाही हेदेखील पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गेल्याच आठवड्यात भारताची अव्वल आणि अनुभवी वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८१वा बळी घेत जगातील सर्वात जास्त बळी घेणारी महिला क्रिकेटपटू बनली. यासह सर्वच क्रिकेटप्रेमींना साहजिकच आठवण झाली ती विश्वविक्रमी गोलंदाज कपिल देवची. झूलनलादेखील ‘लेडी कपिल’ म्हणून प्रसिद्धी मिळाली. झूलनच्या या विक्रमाची चर्चा संपत नसतानाच लगेच दुसऱ्या आठवड्यात दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत यांनी फलंदाजीत नवा उच्चांक गाठताना आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल ३२० धावांची विश्वविक्रमी सलामी दिली. दखल घेण्याची बाब म्हणजे पुरुषांच्या क्रिकेटमध्येही इतकी मोठी सलामी रचली गेली नाही. त्यामुळे नक्कीच या महिलांनी केलेला हा विक्रम पाहून कसलेल्या पुरुषांनीही तोंडात बोटं घातली नसतील तर नवल. सांगायचा मुद्दा काय, तर या तिन्ही खेळाडूंमध्ये एक साम्य असून, ते म्हणजे प्रतिकूल परिस्थिती. हे तिन्ही खेळाडू अत्यंत सामान्य परिवारातून वर आले आहेत. सुरुवातीला क्रिकेट खेळण्याइतपत पुरेसे साधन नसतानाही या त्रिकूटाने आज भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे. गुणवत्ता असेल आणि त्याला कठोर मेहनतीची जोड दिली तर कोणतेही लक्ष्य कठीण नाही हेच या तीन खेळाडूंनी दाखवून दिले. त्याचबरोबर स्वत:ला कधीही कमी समजू नका असा संदेश महिलांना देत, आम्ही कोणत्याही क्षेत्रात कमी नाही हेदेखील या खेळाडूंनी या पुरुषप्रधान देशाला सिद्ध करून दाखवले आहे. त्यांचे अभिनंदन करायलाच हवे.