जगाला अमेरिकेची काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 05:58 AM2018-10-17T05:58:42+5:302018-10-17T05:59:01+5:30

डोनाल्ड ट्रम्प यांची प्रत्येक कृती अरब देशांना दुखविणारी आहे. तो सारा प्रदेश आपल्या नियंत्रणात असावा, असेच त्यांचे राजकारण राहिले आहे. शिवाय आता ट्रम्प यांनी द. अमेरिकेतील मेक्सिकोसह इतर देशांशी व उत्तरेत कॅनडाशीही संघर्षाचा पवित्रा घेतला आहे.

world worried about america | जगाला अमेरिकेची काळजी

जगाला अमेरिकेची काळजी

Next

तेल अविव हे इस्रायलच्या राजधानीचे अधिकृत शहर असताना, जेरूसलेम या ज्यू धर्माच्या पवित्र स्थळाला त्या देशाच्या राजधानीचा दर्जा देऊन व आपल्या राजदूताचे कार्यालय तेथे हलवून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी साऱ्या मध्य आशियाशी अगोदरच वैर घेतले आहे. सीरिया या शियापंथी मुस्लीम देशाशी त्याचे युद्ध या आधी सुरूही झाले आहे. इराकशी झालेले युद्ध जिंकून तो देश अमेरिकेने आपल्या ताब्यात आणला आहे आणि आता सौदी अरेबियात आमचा एक पत्रकार खशोगी याची हत्या झाल्याचे निमित्त सांगून, त्या देशावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.

इराण हा देश तेलनिर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. भारतात येणारे एक तृतीयांश एवढे तेल त्या देशातून आयात केले जाते. आता इराणकडून तेल घेणाºया देशावरही आम्ही निर्बंध घालू, असे जाहीर करून ट्रम्प यांनी अरब देशाविरुद्धचे त्यांचे युद्ध व त्या देशाची त्यांनी चालविलेली नाकेबंदी पूर्ण करीत आणली आहे, प्रत्यक्षात हे तिसऱया महायुद्धाला निमंत्रण आहे. अमेरिकेचा दक्षिण-मध्य आशियात वाढणारा प्रभाव रशियाला आवडणारा नसून, त्या देशानेही आता इराणच्या युद्धात अमेरिकाविरोधी भूमिका घेतली आहे. त्याच्या लष्करी विमानांनी एका अमेरिकी विमानाला जमिनीवर पाडलेही आहे. उद्याचे जग तेलासाठी व तेलाचे साठे ज्या देशाजवळ आहेत, त्या देशांसाठी लढेल, ही राजकारणाच्या जाणकारांची भविष्यवाणी खरी ठरत असल्याची ही चिन्हे आहेत. मुळात इस्लाम व ख्रिश्चन या दोन धर्मांतील लढाई ७०० वर्षे चालली व १४व्या शतकात इस्तंबुल येथे झालेल्या तहाने ती थांबली. ते वैर अजून शमले नाही आणि त्याची धग अद्याप कायम आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची प्रत्येक कृती अरब देशांना दुखविणारी व त्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणारी आहे. प्रत्यक्षात तो सारा प्रदेश आपल्या नियंत्रणात असावा, असेच त्यांचे राजकारण राहिले आहे.

काही काळापूर्वी युरोपात झालेल्या नाटो राष्ट्रांच्या परिषदेत ट्रम्प यांनी त्या राष्ट्रांशी असलेल्या मैत्रीविरुद्धचा पावित्राही धारण केला. ‘या देशांनी आजवर अमेरिकेचे संरक्षण घेतले. अमेरिकेकडून पैसा घेतला. मात्र, अमेरिकेला त्यांनी जराही मदत केली नाही, उलट अमेरिकेच्या उत्पादनावर जास्तीचे कर लावून त्यांनी अमेरिकेची लूटच केली,’ असे म्हणून यापुढे यावर आम्ही निर्बंध घालू, असा इशारा दिला आहे. जेवढे कर तुम्ही लावाल, तेवढेच आम्हीही लावू, असे त्यांनी या देशांना ऐकविले आहे. परिणामी, नाटो ही संघटना यापुढे राहील की राहणार नाही, असाच प्रश्न त्या राष्ट्रासमोर उभा राहिला आहे. ट्रम्प तेवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी रशियन मालाच्या आयातीवर निर्बंध घातले व रशियावरही अनेक नियंत्रणे आणली आहेत. रशियाशी इतर कुणीही मैत्री करू नये, असा इशारा त्यांनी भारतासकट इतर देशांना दिला आहे. याच काळात त्यांनी चीनशी दोन हात करण्याची तयारी करून, त्या देशातून अमेरिकेत येणाºया सर्व मालावर ५०० अब्ज डॉलर्सचे कर बसविण्याचा आदेश आपल्या सरकारला दिला आहे. चीननेही त्यावर स्वस्थ न राहता, अमेरिकेला तिच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे. तात्पर्य, तेलासाठी होणाºया युद्धात आता या आर्थिक युद्धाचीही भर पडण्याची शक्यता मोठी आहे. या प्रकारचे परिणाम जगावर दिसू लागले आहेत.

भारतात झालेली तेलाच्या भावातील भरमसाठ वाढ त्यातून आली आहे आणि आता ट्रम्प यांनी मूळ अमेरिकेचे नसलेले लोक आम्ही अमेरिकेबाहेर घालवू, असाही इशारा स्वदेशातील नागरिकांना दिला आहे. ‘अमेरिकेला जगातील पहिल्या क्रमांकाचे श्रेष्ठ व बलवान राष्ट्र बनवायचे,’ तर त्यासाठी हे करणे आवश्यक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचा हा अतिरेकी राष्ट्रवाद व जगापासून दूर जाण्याची व त्याच्याशी वैर घेण्याची वृत्ती हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे जगाएवढीच अमेरिकेतील जनताही त्यामुळे चिंतित आहे. ट्रम्प यांना पाठिंबा देणारा उजव्या राष्ट्रवाद्यांचा त्या देशातील गट मोठा असल्याने, ते याची काळजी करताना दिसत नाहीत. मात्र, अमेरिकेच्या या आक्रमकतेला कसा आळा घालायचा, हा जगाच्या काळजीचा विषय मात्र नक्कीच झाला आहे.

Web Title: world worried about america

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.