जगभर : चांगला ‘बाप’ होण्यासाठी कोणते गुण हवेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 06:37 AM2021-04-14T06:37:25+5:302021-04-14T06:38:00+5:30

good father : ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार चांगला बाप होण्यासाठी आणि मुलांबरोबरचे  संबंध चांगले असण्यासाठी हे पारंपरिक गुण पुरुषात असणे अत्यंत आवश्यक आहे.

Worldwide: What are the qualities needed to be a good father? | जगभर : चांगला ‘बाप’ होण्यासाठी कोणते गुण हवेत?

जगभर : चांगला ‘बाप’ होण्यासाठी कोणते गुण हवेत?

Next

पुरुषांमध्ये कोणते गुण असावेत, हे आपल्या समाजपरंपरेनं  कधीच ठरवून दिलं आहे. पुरुष धीट, मर्दानी असावा, संकटांना अंगाखांद्यावर खेळवण्याची हिंमत त्याच्यात असावी, तो साहसी असावा, कोणत्याही प्रसंगाला निडरपणे सामोरा जाणारा असावा, प्रसंग कुठलाही असो.. परिस्थिती कशीही असो.. हार न मानता संकटांना चारही बाजूंनी भिडणारा असावा,  मुळुमुळु रडत बसणारा आणि खांदे पाडून बसणारा नसावा... अन्यथा त्याच्यात ‘पुरुषत्वाचे’ गुण नाहीत, असं मानलं जातं. 
ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार चांगला बाप होण्यासाठी आणि मुलांबरोबरचे  संबंध चांगले असण्यासाठी हे पारंपरिक गुण पुरुषात असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचा मुलांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होतो, त्याचं पॅरेंटिंग बिहेविअरही अधिक चांगलं असू शकतं, असा निष्कर्ष या संशोधकांनी काढला आहे. हो, हे सारे पारंपरिक गुण तर पुरुषात हवेच, त्यानं तो एक चांगला बाप ठरू शकतो, पण एवढंच महत्त्वाचं नाही. तो महिलांचा सन्मान करणारा नसेल, महिलांप्रति आदर राखणारा नसेल, घरी आणि बाहेरही महिलांशी त्याचं वर्तन जर अरेरावीचं असेल, तर मात्र मुलांच्या वाढीवर त्याचा फारच वाईट परिणाम होतो, असा पुरुष चांगला बाप तर बनू शकत नाहीच, पण त्याची मुलंही बिघडण्याची किंवा त्याच्यासारखीच निघण्याची दाट शक्यता असते, असं या संशोधनातून सिद्ध झालं आहे. 
या संशोधनाचं नेतृत्व करणाऱ्या प्रा. सारा शोपे सुलिवन यांचं म्हणणं आहे, एखाद्यात पारंपरिक ‘पुरुषत्वाचे’ गुण दिसत नाहीत, म्हणजे तो चांगला बाप होऊ शकत नाही, असं नाही, पण या पारंपरिक गुणांबरोबर महिलांशी त्याचं वागणं सकारात्मक असेल, त्यांना आपल्यापेक्षा कमी लेखण्याचा  प्रयत्न तो करीत नसेल, बरोबरीच्याच नात्यानं महिलांशी वागत असेल, तर मात्र तो एक चांगला बापच नाही, तर चांगला पतीही ठरू शकतो आणि कुटुंबासाठीही ते फारच फायदेशीर ठरतं. या कुटुंबातील नाती चांगली राहतात आणि त्यांचे एकमेकांशी संबंधही घनिष्ठ राहतात.
या संशोधनासाठी खास करून उच्चशिक्षित आणि चांगली आर्थिक स्थिती असलेल्या दाम्पत्यांचा समावेश करण्यात आला. या साऱ्या विशेषतांसह पुरुषांच्या पालकत्वात किती सुधारणा होतो, याचा अभ्यास या संशोधनात केला गेला. 
या अभ्यासात असंही दिसून आलं की पारंपरिक गुणांसह ज्या पुरुषांनी इतरही अनेक कौशल्यं साध्य केली आहेत, त्याचा त्यांच्या पालकत्वावर सकारात्मक परिणाम झाला. महिलांच्या गर्भावस्थेच्या तिसऱ्या तिमाहीत पुरुषांना सात ‘पुरुषी’ लक्षणांच्या आधारावर स्वत:चं मूल्यांकन करायला सांगण्यात आलं. त्यात साहस, प्रतिस्पर्धी भावना, रोमांच, वर्चस्व गाजवण्याची क्षमता, आक्रमकता, जोखीम घेणं आणि दबाव सहन करण्याची क्षमता इत्यादी गोष्टींचा समावेश होता. 
बालसंगोपनातील पुरुषांची भूमिका जाणून घेण्यासाठी मुलांना अंघोळ घालणं, त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेणं, त्यांना भरवणं, कपडे घालून देणं, त्यांच्याशी खेळणं, त्यांच्यासाठी खास वेळ काढणं इत्यादी साध्या वाटणाऱ्या गोष्टींसाठी पुरुष किती तयार आहेत, हेदेखील जाणून घेण्यात आलं. मूल जन्माला आल्यानंतर नवजात बालक आणि त्याची आई यांच्याशी या पुरुषांची वागणूक कशी होती, याचाही बारकाईनं अभ्यास करण्यात आला. पारंपरिक ‘मर्दानी’ प्रतिमेसोबत ज्या पुरुषांनी आजच्या काळात आवश्यक असलेली नवी कौशल्यंही साध्य केली होती, ते पुरुष चांगले बाप आणि पती ठरले. मात्र ज्या पुरुषांचं वर्तन महिलांशी चांगलं नव्हतं किंवा महिलांवर वर्चस्व गाजवण्याची ज्यांची वृत्ती होती, ते पुरुष मात्र यात सपशेल अपयशी ठरले आणि त्यांचं पालकत्वही वाईट समजलं गेलं.  ‘रिअल लाइफ मॅन’ चांगले पिता आणि पती सिद्ध झाले. मुलांबरोबर असलेले त्यांचे भावनिक बंधही अधिक बळकट आणि चांगले होते. या अभ्यासात सहभागी झालेल्या पुरुषांचंही म्हणणं होतं, परंपरेनं ‘पुरुष’ ठरवणारी लक्षणं केवळ पुरेशी नाहीत, त्याचबरोबर अनेक नव्या गोष्टी शिकणं आणि त्यांचा अंगिकार करणं आजच्या पुरुषांसाठी अत्यावश्यक आहे.  

चांगला बाप होण्यासाठी पाच गोष्टी!
दुसऱ्या एका अभ्यासानुसार चांगल्या पालकत्वासाठी पाच महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. १- वडिलांची  आपल्या मुलांबरोबरची भावनिक गुंतवणूक चांगली असेल, तर त्यांचा मुलांच्या भविष्यावर थेट सकारात्मक परिणम होतो.  २- ज्या बापाकडे चांगली पॅरेंटिंग स्किल्स असतील, ते संपूर्ण कुटुंबच समाधानी असतं. ३- ज्यांचं बालपण चांगलं गेलं आहे, ते भविष्यात चांगले बाप होण्याची शक्यता खूप मोठी असते. ४- चांगल्या पालकत्वामुळे मुलांच्या आत्मविश्वासात आणि त्यांच्या कार्यक्षमतेतही खूप मोठी वाढ होते. ५- वडिलांची आपल्या मुलांमधील गुंतवणूक समाज सशक्त करण्यासाठी महत्त्वाची ठरते.

Web Title: Worldwide: What are the qualities needed to be a good father?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.