समाजाची बेचैनी वाढविणारी वाटचाल चिंताजनक!
By विजय दर्डा | Published: November 27, 2017 12:51 AM2017-11-27T00:51:06+5:302017-11-27T00:51:32+5:30
प्रसंग होता यंदाच्या दिवाळीतील. ‘लोकमत समूहा’चे बीज जेथे रुजले त्या यवतमाळच्या गांधी चौकातील ‘पृथ्वीवंदन’मध्ये आम्ही सालाबादप्रमाणे पानसुपारीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी माझा एक बालपणीचा मित्र आला. धर्माने मुस्लिम असलेला हा मित्र मला ३० वर्षांनी भेटत होता.
प्रसंग होता यंदाच्या दिवाळीतील. ‘लोकमत समूहा’चे बीज जेथे रुजले त्या यवतमाळच्या गांधी चौकातील ‘पृथ्वीवंदन’मध्ये आम्ही सालाबादप्रमाणे पानसुपारीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी माझा एक बालपणीचा मित्र आला. धर्माने मुस्लिम असलेला हा मित्र मला ३० वर्षांनी भेटत होता. त्याने मला आलिंगन दिले आणि आमच्या डोळ्यांत पाणी तरळले. पूर्वी हा मित्र आमच्या घराच्या शेजारीच राहायचा. अजूनही तेथेच राहतोस का, असे मी त्याला विचारले. त्याने नकारार्थी उत्तर दिले व आता तो मुस्लिमांच्या वस्तीत राहायला गेल्याचे सांगितले.
त्याचे हे उत्तर ऐकून मी अवाक् झालो. पूर्वी शहरात सर्व एकत्र राहात असत. आता तेच शहर जात आणि समुदायांच्या आधारे विविध मोहल्ले व वस्त्यांमध्ये विभागले गेले होते. तेली, दलित, मुस्लिम, ख्रिश्चन, पंजाबी, कुणबी असे आपापल्या वस्त्या करून राहू लागले होते. इतकी वर्षे का भेटला नाही, असे मी त्याला पुन्हा विचारले. यावर त्याने दिलेले उत्तर आणखीनच धक्कादायक होते. तो म्हणाला, ‘विजय, तू आता खूप मोठा माणूस झाला आहेस. त्यामुळे तुला भेटायला संकोच वाटत होता’. मला आमचे बालपण आठवले. त्यावेळी आमच्यामध्ये गरीब-श्रीमंत असा भेदभाव नव्हता. दोस्ती फक्त दोस्ती होती.
त्या काळी उर्दू आणि मराठी शाळा एकच असायची. आम्ही १५ आॅगस्ट व २६ जानेवारी एकत्र साजरे करीत असू. झेंडावंदनासाठी सर्व मिळून तयारी करायचो. जमीन सारवण्यापासून ते भिंती चुन्याने रंगविण्यापर्यंतची कामे धर्म आणि जात विसरून आम्ही सर्वजण एकत्रपणे करायचो. राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी एक मुस्लिम व्यापारी आम्हाला पाईप उधार देत असत. एकदा आम्ही इंग्रजीच्या कुरेशी मास्तरांना विचारले की, झेंड्याचा वरचा रंग कोणता असतो, हिरवा की भगवा? हे ऐकताच मास्तर संतापले व म्हणाले की, तुम्हाला देशाच्या झेंड्याचा रंग माहीत नाही? मी तुम्हाला घरासमोर उन्हात उभे राहण्याची शिक्षाच देतो! राष्ट्रभक्तीचा हा आविष्कार अद्भूत होता. मला बालपणीच्या गणेशोत्सवाचीही आठवण झाली. आम्ही सर्व मुले मिळून साफसफाई करायचो, मंडप सजवायचो व पूजा-आरती करायचो. जाती-धर्माचा कोणताही भेदभाव त्यात नसे. लहानपणी ईद, दिवाळी आणि ख्रिसमसला आम्ही एकमेकांच्या घरी जायचो. माझा धर्म मित्राच्या घरी ईद साजरी करण्याच्या कधी आड आला नाही. ईद, गणेशोत्सव व ख्रिसमस आम्ही तेवढ्याच उत्साहाने साजरे करायचो. ईद व ख्रिसमसला जाताना माझी आई माझी तयारी करून द्यायची.
मग लहानपणचा तो धर्म गेला कुठे? त्याला कुणाची दृष्ट लागली? मी सार्वजनिक जीवनात दीर्घकाळ घालविला आहे व त्यामुळे मी अनुभवाने सांगू शकतो की, आपला समाज भरकटला आहे. पूर्वीच्या स्नेहाची जागा आता द्वेषाने घेतली आहे. हल्ली समाज पूर्वीपेक्षा विभाजित झाला आहे हे जाहीरपणे कबूल करायलाही हिंमत लागते. धर्माची राजकारणात सरमिसळ झाल्याने पूर्वीचे परस्परांविषयीचे स्नेहाचे नाते तुटले आहे. धर्मरक्षणाच्या नावाने ज्याप्रमाणे संघटना उभ्या राहात आहेत व सरकारी व्यवस्थांकडून त्यांना जे खतपाणी घातले जात आहे, ते त्याहूनही अधिक धोकादायक आहे. हा बदल केवळ धर्मापुरताच मर्यादित नाही. गेल्या काही वर्षांत समाजात जातीय भावनाही उफाळून वर येऊ लागल्या आहेत. कधी कधी मनात विचार येतो की, आपण जणू पुन्हा टोळीने राहणाºया मानवी समाजाकडे वाटचाल करीत आहोत. त्याकाळी एका टोळीचे लोक दुसºया टोळीवाल्यांचे अगदी सहजपणे शिरच्छेद करायचे आणि त्याचा त्यांना अभिमानही वाटायचा! खरं तर आज समाज अशा अवस्थेला पोहोचला आहे की आदर्श नावाची गोष्ट शोधूनही सापडत नाही! गौतम बुद्ध, भगवान महावीर, स्वामी विवेकानंद, स्वामी रामकृष्ण परमहंस, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे किंवा साने गुरुजींनी अशाच समाजाची कल्पना केली होती का? नक्कीच नाही. या सर्व महात्म्यांनी एका आदर्श अशा मानवी समाजाची कल्पना केली होती. हल्ली वरिष्ठ पद आणि पैसा हे सन्मानाचे मापदंड झाले आहेत. काही सुसंस्कारित लोकांचा अपवाद सोडला तर एखादा श्रीमंत गरिबाला सन्मानाने वागणूक देताना आपल्याला अभावानेच दिसेल. माझे बाबूजी व माझ्या आईचा सामाजिक समरसतेवर विश्वास होता. गरिबांची दु:खे व अडचणी समजाव्यात यासाठी त्यांनी आम्हा दोन्ही भावांना मुद्दाम म्युनिसिपालिटीच्या शाळेत घातले. पणआता हे चित्र अभावाने दिसते.
हल्ली समाजात आणखी एक कुप्रवृत्ती फोफावत आहे व ती म्हणजे एकमेकांची उणीदुणी काढण्याची. तुमचाही असा अनुभव असेल की एखाद्या व्यक्तीची तोंडावर तोंडभरून स्तुती केली जाते आणि पाठ फिरताच त्या व्यक्तीची निंदानालस्ती सुरू होते. हे वागणे लज्जास्पद तर आहेच व समाजाच्या दृष्टीनेही ते घातक आहे. आपल्या संस्कृतीत महिलांच्या सन्मानाचीही थोर परंपरा आहे. पण त्यापासूनही भरकटत आहे, याचेही मला दु:ख होते. महिलांच्या विनयभंगाच्या व बलात्काराच्या वाढत्या घटना हृदय पिळवटून टाकणाºया आहेत. आपली मुले या वाईट गोष्टी शिकतात तरी कुठून? यावर उपाय आपल्यालाच शोधावेच लागतील! समाज बदलण्याची सुरुवात आपल्याला आपल्यापासूनच करावी लागेल!
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
बिल गेट््स यांनी किती सुंदर म्हटलंय की, घोकंपट्टी करणे म्हणजे शिक्षण नाही. पोथ्यांचे पठण करून कोणी पंडित होत नाही, हे आपल्या कबिरानेही त्याच्या दोह्यातून सांगितले आहे! माझे व्यक्तिगत मतही असेच आहे की ज्ञान केवळ पुस्तकांत नाही तर ते आपल्या चहूबाजूंना सर्वत्र विखुरलेले आहे. हे ज्ञानकण वेचायचे कौशल्य आत्मसात करा, मग तुम्हाला ज्ञान शोधत फिरावे लागणार नाही!