लोकसाहित्याच्या पूजक : सरोजिनी बाबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 05:35 AM2019-08-31T05:35:05+5:302019-08-31T05:35:17+5:30
लोकसाहित्याच्या ज्येष्ठ संशोधिका डॉ. सरोजिनी बाबर म्हणजे सगळ्यांच्या आक्का यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. यानिमित्त पुणे येथे १ सप्टेंबर ...
लोकसाहित्याच्या ज्येष्ठ संशोधिका डॉ. सरोजिनी बाबर म्हणजे सगळ्यांच्या आक्का यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. यानिमित्त पुणे येथे १ सप्टेंबर रोजी (उद्या) लोकसाहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. आक्का हे एक विलक्षण रसायन होते. माणूस एकाच जन्मात इतके मोठे काम करू शकतो यावर विश्वास ठेवायचा असेल तर आक्कांच्या जीवनाकडे पाहावे, नव्हे त्यांचा अभ्यास करावा लागेल. त्यांची कार्यक्षेत्रे इतकी भिन्न की पाहणाऱ्याला थक्क व्हायला होते. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती त्यांचा श्वासच होता. पण त्यांच्या रक्तातून वाहणारा विलक्षण प्रतिभेचा झरा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांचा अफाट अभ्यास आणि अनन्यसाधारण स्मरणशक्ती यांच्या संयोगातून त्यांनी निर्माण केलेले डोंगराएवढे काम विस्मयकारक आहे.
त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील बागणी गावी झाला. वडील लोकशिक्षक आणि लोकसेवक कृ. भा. बाबर यांच्या सरस्वती आणि शारदेचा वारसा आक्कांकडे चालून आला. तो त्यांनी हळुवारपणे जपला आणि वाढवला. एका छोट्याशा खेडेगावातून आलेल्या पोलिओ झालेल्या मुलीने मराठी मातीतील लोकवाङ्मय आपला कवेत घेतले. पायातले अधूपण त्यांच्या भटकंतीआड कधी आले नाही. त्या मोठ्या शहरात नाही गेल्या. रानावनात, गावागावातल्या माणसांकडे आणि आयाबायांकडे जात राहिल्या. त्यांच्याकडे असलेलं अप्रकाशित साहित्य सोने आपल्या झोळीत साठवू लागल्या. खेड्यातली गावाकडची स्त्री म्हणजे लोकसाहित्याची खाण आहे हे त्यांनी जाणले आणि ती स्त्री त्या अभ्यासू लागल्या. या अभ्यासातून त्यांना जो खजिना मिळाला तो त्यांनी जगापुढे रिता केला. मॅट्रिकच्या मांडवाखालून गेल्यानंतर त्यांनी पुण्याला स.प. महाविद्यालयात प्रवेश केला. गावाच्या विहिरीत डुंबणारी एक निरागस मुलगी थेट समुद्रात पोहायला आली होती. या सागरात अनेक रत्नांची खाण होती. त्यांच्या ज्ञानाची झळाळी आक्कांना मिळाली आणि त्या तेजाने चमकू लागल्या. एकाग्रतेने अभ्यास करण्याची लागलेली सवय आणि उपजत प्रतिभेचे लेणे घेऊन आलेल्या आक्कांना बी.ए., एम.ए., परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणे अवघड नव्हते. या दरम्यान त्यांची गावाकडच्या मातीशी असलेली नाळ तुटली नाही. त्यांची झोळी सतत भरतच राहिली. त्यातले धन त्या सतत वाढवत राहिल्या. अफाट संपदा गोळा करूनही त्यांची ज्ञानलालसा कमी होत नव्हती.
आक्का लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि लोकसंस्कृतीच्या पूजक. ग्रामीण शहाणपण आणि बोलण्यातला साधेपणा आणि अघळपघळपणा स्वभावातच रुजला होता. रसाळ गोष्टी, वेल्हाळपणा दिवसेंदिवस लोकप्रियतेत भर घालत होता. त्यांची लेखणी आणि वाणी यातली चमक, सुसंस्कृत राजकारणी असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या नजरेतून त्या वेळी सुटली नाही.
१९५२ साली चव्हाण यांनी त्यांना विधानसभेसाठी तिकीट दिले आणि अटीतटीच्या लढतीत त्या विजयी झाल्या. पुढे १९६३ ते ६६ विधान परिषदेवर तर १९६८-७१ या काळात राज्यसभेच्या सभासद झाल्या. एका लोकसाहित्याच्या अभ्यासकाचा उच्च सभागृहातला प्रत्यक्ष सहभाग हा खूप मोठा सन्मान होता. राजकारणाच्या धामधुमीत त्यांचा प्रवास आणि अभ्यास यात खंड पडला नव्हता. त्या पवनारच्या विनोबांच्या आश्रमात गेल्या तेव्हा विनोबांनी त्यांना सांगितले की, ‘राजकारण पुरे झाले, आता संशोधन आणि लेखनाकडे लक्ष केंद्रित करा.’ हा सल्ला त्यांनी मानला आणि आपला मोर्चा पुन्हा एकदा मूळ पदावर आणला.
आक्कांना गप्पा मारण्याचे, गोष्टी सांगण्याचे व्यसन होते. त्या गोष्टीवेल्हाळ होत्या. त्यांच्या गप्पा ऐकणे ही पर्वणी होती. त्यांचा अभ्यास, चिंतन, निरीक्षण, रसाळपणा आणि सहजता जेव्हा त्यांच्या वाणीतून प्रकट होई, तेव्हा आक्का आपले बोट धरून आपल्याला त्या गावात, घरात, जात्यावर, भोंडल्यात हातग्याच्या तालामध्ये घेऊन जात आहेत असा भास होई. त्यांची या सगळ्या गोष्टी सांगण्याची असोशी इतकी असे की हे संपावे असे कधी वाटायचे नाही. सांगताना खूप वेळ झाला की, ‘परत ये मग पुढचे सांगते’ असे म्हणून निरोप द्यायच्या. ज्यांना हे येणे लाभले ते खरेच भाग्यवान.
आक्कांनी साहित्याच्या सर्वच प्रांतांत मुशाफिरी केली. ‘मराठीतील स्त्रीधन’ आणि ‘वनिता सारस्वत’ हे दोन प्रबंध सादर केले. एकूण ७ कादंबºया, ३५ कथासंग्रह व ललित लेखसंग्रह लिहिले. त्या लोकसाहित्य समितीच्या अध्यक्ष असताना महाराष्टÑ लोकसाहित्य माला (प्रभण), लोकसाहित्य समितीचा स्मृती संमेलन वृत्तांत, बालराज, लोकसाहित्य भाषा आणि संस्कृती या गं्रथांचे संपादन केले. तर मराठी लोककथा, महाराष्टÑ : लोकसंस्कृती व साहित्य, लोकगीतातील सगेसोयरे, वृक्षवल्लरी, भारतीय स्त्रीशिक्षण संस्था आणि रेशीमगाठी या ग्रंथांची निर्मिती केली. त्यांचा मराठी, संस्कृत, लोकवाङ्मय आणि लोकसंस्कृतीचा अभ्यास या सर्व पुस्तकांतून ओसंडून वाहतो आहे. त्यांचे कर्तृत्व असे ग्रंथाच्या पानापानावर पसरलेले आहे. हा अनमोल ठेवा फक्त जतन करून ठेवणे एवढेच काम नाही तर त्यांचा अभ्यास करून तो वारसा पुढे नेण्याचे काम सुरू राहणे हे अधिक महत्त्वाचे.
प्रकाश पायगुडे
प्रमुख कार्यवाह,
महाराष्ट्र साहित्य परिषद