खेळाडू मुलींच्या अब्रूशी हे कसले खेळ?

By विजय दर्डा | Published: January 23, 2023 07:49 AM2023-01-23T07:49:28+5:302023-01-23T07:50:21+5:30

देशाच्या महिला पहिलवानांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपामागचे पूर्ण सत्य समोर आलेच पाहिजे!  हा शरमेने मान खाली घालावी, असा प्रकार होय

Wrestlers protest against WFI chief called off What happened in three days | खेळाडू मुलींच्या अब्रूशी हे कसले खेळ?

खेळाडू मुलींच्या अब्रूशी हे कसले खेळ?

googlenewsNext

विजय दर्डा 
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, 
लोकमत समूह

देशाच्या महिला पहिलवानांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपामागचे पूर्ण सत्य समोर आलेच पाहिजे!  हा शरमेने मान खाली घालावी, असा प्रकार होय!

आपल्या देशातल्या मुली जीवनातल्या हरेक क्षेत्रात गगनस्पर्शी काम करण्याचा प्रयत्न करत असतात; अशा वेळी वासनांध लांडग्यांची नजर त्यांच्यावर पडते ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. तसे तर हॉकीपासून फुटबॉल, टेबल टेनिस, कबड्डी, तायक्वांडो, ॲथलेटिक्स आणि अशा कित्येक क्रीडा संघटना पक्षपात आणि इतर कारणांनी वादात सापडलेल्या असतात. कित्येक वेळा सर्वोच्च न्यायालयाला नियमावल्याही तयार कराव्या लागल्या आहेत. परंतु, भारताच्या महिला पहिलवानांनी केलेले आंदोलन अशा वाद - विवादांपेक्षा पुष्कळच मोठे आहे. या अभूतपूर्व आंदोलनाकडे कोणत्याही चष्म्यातून पाहिले जाता कामा नये. लैंगिक शोषणाचा जो गंभीर आरोप देशाच्या महिला पहिलवानांनी केला त्यामागील पूर्ण सत्य समोर येणे अत्यंत आवश्यक आहे; कारण हा शरमेने मान खाली घालावी, असा प्रकार होय!

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रजभूषण शरण सिंह यांच्यावर ज्यांनी आरोप केले ते कोणी मामुली लोक नाहीत. विनेश फोगाट, साक्षी मलिक किंवा बजरंग पुनिया हे सर्वजण भारताचे नाव जगात झळकावणारे खेळाडू आहेत.  धूर निघतो आहे म्हणजे आग नक्की लागली असणार, म्हणतात ते खोटे नव्हे!  ही आग कोठे आणि कशी लागली, याची चौकशी  होत नाही तोवर सत्य समोर येणार नाही.  महासंघाच्या अध्यक्षांनी अनेक मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे विनेश फोगाट हिने यापूर्वीही सांगितले होते. महासंघाच्या अनेक महिला प्रशिक्षकही या शोषणाच्या शिकार झाल्या आहेत. साक्षी मलिकनेही अशा प्रकारचे आरोप केले.

या मुलींच्या समर्थनासाठी बजरंग पुनिया पुढे आले. हे सारे विनाकारण होणार नाही हे नक्की! कोणती मुलगी आपल्या इज्जतीचा असा पंचनामा करील? पाणी डोक्यावरून जाण्याची वेळ आली असेल, त्यातूनच हा स्फोट झालेला दिसतो. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांनी या संपूर्ण घटनेच्या बाबतीत चिंता व्यक्त केली आहे. 

एखाद्या व्यक्तीवर गंभीर स्वरुपाचे आरोप झाले तर त्याने आधी पद सोडले पाहिजे, अशी आपल्या देशातील सर्वमान्य परंपरा आहे. त्यामुळे सत्य समोर येण्याचा मार्ग मोकळा होतो. “मी कुणाच्याही कृपेने अध्यक्ष झालेलो नाही, निवडून आलो आहे; तर मग राजीनामा का देऊ?” - असे ब्रजभूषण शरण सिंह यांचे म्हणणे आहे; पण हा निव्वळ बकवास झाला. क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी आता निगराणी समिती तयार करण्याची घोषणा केली असून, ऑलिम्पिक महासंघाने सात सदस्यांची समिती स्थापन केली आहे. पहिलवानांनी आपले धरणे आंदोलन मागे घेतले आहे. क्रीडामंत्र्यांनी एका अधिकाऱ्याला निलंबित केले, शिवाय रॅंकिंग टूर्नामेंट रद्द करून टाकली. आरोपांची चौकशी पारदर्शक पद्धतीने होईल, अशी आता आशा बाळगली पाहिजे.

क्रीडा जगतात लैंगिक शोषण आणि मुलींच्या इज्जतीशी खेळण्याचे आरोप यापूर्वीही झाले आहेत. गेल्याच वर्षी एका महिला सायकलपटूने तिच्या प्रशिक्षकावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. तिने भारतीय खेल प्राधिकरणाकडे लेखी तक्रार केली. प्राधिकरण आणि सायकलिंग महासंघाने चौकशीसाठी एक समितीही नेमली. गेल्या १० वर्षांत भारतीय खेल प्राधिकरणाकडे लैंगिक शोषणाच्या ४५ तक्रारी आल्या. त्यापैकी २९ तक्रारी प्रशिक्षकांच्या विरूद्ध होत्या.

या तक्रारींचे पुढे काय झाले, किती जणांना शिक्षा झाली; हे सामान्यतः कधीही जाहीर केले जात नाही. माजी हॉकी खेळाडू आणि हरयाणाचे तत्कालीन क्रीडा राज्यमंत्री संदीप सिंह यांच्यावर महिला हॉकी संघाच्या एका प्रशिक्षकाने छेड काढल्याचा आरोप केला होता. सिंह यांना त्यावेळी राजीनामा द्यावा लागला होता. 

काहींचे म्हणणे, महिला पहिलवानांनी सर्वांत आधी अंतर्गत समितीकडे तक्रार करायला हवी होती. कामाचे ठिकाण, स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, प्रशिक्षणस्थळ, स्टेडियम तसेच खेळाचा परिसर लैंगिक शोषण निवारण अधिनियम २०१३ च्या कक्षेत येतात. या अधिनियमानुसार एक अंतर्गत समिती नेमलेली असते. कायदेशीरदृष्ट्या पाहू जाता या अंतर्गत समितीत ५० टक्के महिला असल्या पाहिजेत; आणि समितीचे अध्यक्षपद महिलेकडे असायला हवे. परंतु, कुस्ती महासंघाच्या अंतर्गत समितीच्या पाच सदस्यांत केवळ एक महिला आहे, अशा समितीवर महिला पहिलवान भरोसा कसा ठेवतील?

विविध कायदेशीर तरतुदी असतानाही लैंगिक शोषणाच्या तक्रारी सातत्याने येत असतात. शरमेने मान खाली घालावी, अशा या कृत्यांवर लगाम लावणे अजूनही शक्य झालेले नाही. ही लाजिरवाणी मनोवृत्ती बदलण्यासाठी अनेक स्तरांवर काम करावे लागेल. कायदा आपल्याजागी असतोच. पण, त्याचबरोबर व्यवस्था अत्यंत कडक आणि पारदर्शी करावी लागेल. पुरूषकेंद्री विचार बदलण्याचीही गरज आहे. मुलींकडे केवळ “शरीर” म्हणून पाहण्याच्या  प्रवृत्तीचा निपटारा सामाजिक पातळीवरच करावा लागेल.  स्त्री म्हणजे केवळ तिचा देह नव्हे!!... तिचा विचार, तिच्या भावना, तिचा सन्मान पुरुषांच्या सन्मानाइतकाच महत्त्वाचा असतो. आपल्या मुलींना स्वच्छंदपणे उडता आले पाहिजे, त्यांच्या वाट्याचे आकाशही त्यांना मिळाले पाहिजे.  कुणाला काही शिकवण्याच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी करणे घनघोर गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य तर आहेच; पण घृणास्पद  विचारांची पराकाष्ठाही आहे. आपली संस्कृती स्त्रियांचे पूजन करणारी आहे. आपण तर देशाकडेही आईच्या रुपात पाहतो. अशा देशातल्या मुलींच्या इज्जतीशी कोणी खेळ केला तर तो सहन करता कामा नये.

 

Web Title: Wrestlers protest against WFI chief called off What happened in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.