९९ चे १०० होताना पेट्रोल पंपांवर Y2K चा हल्ला?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 02:13 AM2021-02-22T02:13:59+5:302021-02-22T02:14:05+5:30

इंधनाचा दर दाखवणारी पेट्रोल पंपावरची यंत्रणा सध्या दोनच संख्या दाखवू शकते. पेट्रोलचे दर ज्याक्षणी १०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त होतील, तेव्हा काय होणार?

Y2K attack on petrol pumps when 99 out of 100? | ९९ चे १०० होताना पेट्रोल पंपांवर Y2K चा हल्ला?

९९ चे १०० होताना पेट्रोल पंपांवर Y2K चा हल्ला?

googlenewsNext

- दीपक शिकारपूर

१९९९ सालाच्या अखेरीस वायटूके (Y2K) नावाची समस्या निर्माण झाली होती. संगणकीय प्रणालींना दिलेल्या आज्ञावली म्हणजेच ‘कोड’मध्ये ३१ डिसेंबर १९९९ नंतर भयंकर घोटाळे होण्याची शक्यता त्याआधी एकच वर्ष सर्वांच्या ध्यानात आली. समस्या होती संगणकाने ३१ डिसेंबर १९९९ वरून आपोआप आणि सहजपणे ०१ जानेवारी २००० वर जाण्याची.

 बहुसंख्य काॅम्प्युटर प्रोग्रॅम १९९० च्या दशकात लिहिले गेले आहेत. त्यावेळी (मर्यादित असलेली) मेमरी वाचविण्यासाठी संगणकांना वर्ष ४ ऐवजी २ अंकांत लिहिण्यास शिकवले गेले होते, उदा. १९९८ ऐवजी फक्त ९८. ज्याकाळी हे प्रोग्रॅम्स लिहिले गेले तेव्हा  संगणकाची साठवण क्षमता व मेमरी इतकी कमी होती की जागा वाचविण्यासाठी २ डिजिट कमी करावे लागत. संगणकाला सारासार विचार म्हणजेच ‘प्रेझेन्स ऑफ माइंड’ नसल्यामुळे त्याला  ०० म्हणजे २००० हे समजेल याची खात्री नव्हती. तो १९०० देखील समजेल किंवा गोंधळला, तर काहीच न करता ‘Error’ असा संदेश दाखवत बसून राहील!

शिवाय हा प्रश्न फक्त संगणकाच्या प्रत्यक्ष कामापुरता मर्यादित राहणार नव्हता. आर्थिक आणि व्यापारी गणिते (फायनान्सिअल प्रोजेक्शन्स) वर्तवणाऱ्या संगणकीय प्रणाली १९९८ मध्येच चुका करू लागल्या. कारण त्यांना ०० म्हणजे सन २००० ही संकल्पना माहीतच नव्हती! Y2K ला ‘मिलेनियम बग’ असेही नाव दिले गेले. या यक्ष प्रश्नाला आणखीही काही पदर होते- २००० हे लीप वर्ष होते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात २९ दिवस असणार होते.

शिवाय त्या वेळच्या काही संगणकांच्या द्वि-अंकी (बायनरी) प्रणालींमध्ये ९ व ९९ या संख्या प्रोग्रॅमचा किंवा संबंधित ‘टास्क’चा  शेवट आल्याचे दर्शवीत असत. अशी प्रणाली ३१ डिसेंबरची वाट न पाहता ०९ सप्टेंबर १९९९ (9/9/99) रोजीच बंद पडण्याची शक्यता होती!  याबाबी संगणकीय प्रणालींवर परिणाम करणार होत्या. संगणकाशी फक्त दुरान्वयानेच संबंध असलेल्या यंत्रणा कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी Y2K च्यासंदर्भात नवीन कायदाच संमत करून सरकारला याचे गांभीर्य असल्याचे दाखवून दिले. सर्व संबंधित तंत्रज्ञांनी आणि यंत्रणांनी रीप्रोग्रॅमिंगचे हे काम वेळेवर यशस्वीपणे पार पाडल्याने ०१ जानेवारी २००० ला काहीही गडबड न झाल्याप्रमाणे संगणक नीट काम करू लागले. सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला....

अशाच स्वरूपाचे वादळ (जरा लहान प्रमाणात का होईना) आता पेट्रोल पंपांवरून उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे! पंपावरची, इंधनाचा दर दाखवणारी यंत्रणा सध्या दोनच संख्या दाखवू शकते. तिच्या दृष्टीने इंधनाचा दर जास्तीत जास्त ९९ रुपये ९९ पैशांपर्यंत जाऊ शकतो. ज्याक्षणी तो १०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त होईल त्याक्षणी ही प्रणाली कोलमडेल. कारण (Y2K प्रमाणेच) तीन आकडी गणित करणे तिला शिकवलेलेच नाही, तशी वेळच आली नव्हती कधी. भारतात इंडियन ऑइल, बीपीसीएल आणि एचपीसीएल या तीन मुख्य तेल कंपन्या इंधन वितरणाचे बरेचसे काम करतात.

सध्याच्या धोरणानुसार इंधनाची किंमत दररोज बदलत असते व ही बदलती किंमत तेल कंपन्यांच्या सेंट्रलाइज्ड सर्व्हरद्वारा प्रत्येक पेट्रोल पंपावरच्या प्रत्येक डिस्पेन्सिंग युनिटला (DU) संगणकीय यंत्रणेद्वारे कळवली जाते.  या सर्व्हर्सनी इंधनाची तीन आकडी किंमत कळवली, तर काय करायचे हे DU ला कळणार नाही व ते बंद होईल किंवा ० रुपये किंमत दाखवेल. यापैकी काहीही झाले तर देशभर केवढा गोंधळ माजेल याची कल्पना आपण करू शकतो.

काही कंपन्यांनी भविष्यातील ही शक्यता लक्षात घेऊन डीयूचे रीकॅलिब्रेशन सुरू केलेही आहे आणि पंपांवरील डीयू तीन आकडी किंमत हाताळू शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. भारतात जवळजवळ ६० हजार पेट्रोल पंप आहेत आणि प्रत्येक पंपावर (त्याच्या स्थानानुसार) २ पासून ४० पर्यंतही डीयू आहेत - आता पुनर्लेखनाच्या या कामाचा आवाका आपल्या लक्षात येईल. आता लवकरच इंधन किंमत रुपये १०० म्हणजे तीन आकड्यांत प्रवेश करेल तेव्हा खरे कळेल की किती पंपावर ते हाताळायची यंत्रणा रीकॅलिब्रेट करून सक्षम केली गेली आहे. 

Web Title: Y2K attack on petrol pumps when 99 out of 100?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.