मला ‘सेलीब्रिटी’ करणारं हे वर्ष!
By admin | Published: December 31, 2014 02:12 AM2014-12-31T02:12:46+5:302014-12-31T02:12:46+5:30
सरतं वर्ष माझ्यासाठी खूप आनंदाचं, धक्कादायक गेलं असं म्हणता येईल़ कारण माझ्यावर चित्रित झालेला चित्रपट ही धक्कादायक गोष्ट होती. २०१२मध्ये समृद्धी पोरे माझ्याकडे आल्या.
सरतं वर्ष माझ्यासाठी खूप आनंदाचं, धक्कादायक गेलं असं म्हणता येईल़ कारण माझ्यावर चित्रित झालेला चित्रपट ही धक्कादायक गोष्ट होती. २०१२मध्ये समृद्धी पोरे माझ्याकडे आल्या. त्यांनी चित्रपट काढण्याचा विषय काढला. तेव्हा माझ्यावर चित्रपट होऊ शकतो, हे खरं वाटलंच नव्हतं. किंबहुना हे शक्यच नाही, अशी चर्चा आम्ही घरची मंडळी करीत असू. त्यानंतर समृद्धी पोरे यांनी काही कागदपत्रांवर माझ्या सह्या घेतल्या आणि चित्रपटाच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
माझं आयुष्य या चित्रपटानं खराब झालं. या चित्रपटामुळे लोकांना कार्याची माहिती झाली़ त्यामुळे इथं गर्दी वाढली, लोकं वाढली. म्हणजे इथपर्यंत की, या चित्रपटामुळे मी ‘सेलीब्रिटी’ झालो. पण ‘सेलीब्रिटीपण’ काही मला रु चत नाही. मी आपला साधा माणूस आहे. साधेपणा हे माझं जगणं असल्यानं हे ‘सेलीब्रिटीपण’ अंगावर आल्यासारखं वाटतं. अचानक आलेल्या या सगळ्या परिस्थितीमुळं कधीतरी बावरायलाही होतं.
चित्रपटात हीरो, हीरोईन नाही आणि कुठेही ‘फूटेज’ खाणारा व्हिलन नाही, म्हणजे अगदी एंटरटेन्मेंटच नाही, असा चित्रपट कुणी का पाहील, हा प्रश्न सतावत होता. त्यानंतर चित्रपटाच्या पुढच्या तयारीसाठी समृद्धी पोरे आणि त्यांच्या चमूने प्रकल्पाला भेट द्यायला सुरुवात केली. त्यांची टीम यायची आणि इथे राहून शूटिंगही करून जायची. चित्रपटाच्या या गोतावळ्यात मी कधीच इंटरफीअर केलं नाही.
मार्च २०१४मध्ये जेव्हा पहिल्यांदा सिंगापूरमध्ये चित्रपट पाहिला. त्या वेळी उपस्थित लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत चित्रपटाला दाद दिली; तेव्हा असा चित्रपट स्वीकारला जाऊ शकतो याची जाणीव झाली. त्यानंतर बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या माध्यमांतून आल्या. मीदेखील चित्रपट पाहून थक्क झालो होतो, काहीसा भारावलोदेखील होतो. एका वेगळ्या विषयाचा, वेगळ्या धाटणीचा चित्रपट प्रेक्षक स्वीकारतील, हे माझ्यासाठी काहीसं चमत्कारिकच होतं. त्यानंतर मुंबईतही पुन्हा जब्बार पटेल, राजदत्त, नागराज मंजुळे अशा दिग्गज मान्यवरांसमोर या चित्रपटाचं स्क्रीनिंग झालं. त्यांनीही भरभरून दाद दिली.
‘चित्रपट पाहायला येताना रुमाल घेऊन या’ असं मी गमतीने म्हणायचो. पण हा चित्रपट अनेकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारा ठरेल किंवा कुणाच्या तरी आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरेल, यावर विश्वास बसत नव्हता. चित्रपट पाहून बऱ्याच लोकांनी माझ्याशी संपर्क केला, फोन्स, मेसेज, व्हॉट्सअॅप आदी सोशल मीडिया अशा वेगवेगळ्या स्तरांतून प्रतिक्रियांचा जणू पाऊसच पडत होता. त्यातल्या काही प्रतिक्रिया विसरता न येण्यासारख्या आहेत़ एका १० वर्षांच्या मुलाने फोन करून ‘मला मोठेपणी तुमच्यासारखं व्हायचं आहे,’ असं सांगितलं आणि माझ्या खाऊच्या डब्यातून पैसे घेऊन मित्र-मैत्रिणींना हा चित्रपट पाहण्यासाठी मेसेजेसही केले! त्याच खाऊच्या पैशातून हेमलकसासाठी मदत करायची, असा विचार त्या चिमुरड्याने मांडला़ तो क्षण कायम लक्षात राहील. त्याचप्रमाणे आमच्या आष्टीच्या एका पाणीपुरी विक्रेत्याने चित्रपटाची पायरेटेड सीडी घेऊन चित्रपट पाहिला. कुटुंबातल्या सदस्यांना या चित्रपटात हेमलकसामधल्या माणसाचं काम आहे, असं सांगितलं. शिवाय चित्रपट पाहिल्यानंतर आवर्जून सगळ्यांना घेऊन हेमलकसाला भेट दिली. या भेटीत हेमलकसामधील लहानग्यांसाठी त्याने ५० बटाटेवडे आणले होते़ अशा एक ना अनेक आठवणींचा खजिना चित्रपटाने मला दिला. बाबांना वाढदिवस साजरा केलेला आवडत नाही. त्यांचा तर नव्हेच, पण आमचा कुणाचाही नाही. पण यंदा बाबांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात साजरा करायचं ठरवलं. त्यासाठी हेमलकसाला मुद्दामच कार्यक्रम घेतला. आमच्याकडे डिसेंबर हा तसा सेलीब्रेशन महिना असतो़ त्याला कारणंही तशीच आहेत. म्हणजे २३ डिसेंबरला हेमलकसा प्रकल्पाचा शुभारंभ दिन, तर २४ डिसेंबरला आमचं लग्न झालं, २५ तारखेला मंदाकिनीचा वाढदिवस, २६ला माझा आणि बाबांचा वाढदिवस असतो. म्हणजे डिसेंबर हा खऱ्या अर्थाने सेलीब्रेशनचाच महिना आहे. बाबांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा त्यांच्या आठवणींचा गंध दरवळतोय. यानिमित्ताने डॉ. अनिल काकोडकर, माजी न्यायमूर्ती शिरपूरकर, भीष्मराज बाम, चंडीप्रसाद भट, मेधा पाटकर अशा विविध क्षेत्रांतील अनेक माणसांनी बाबांच्या आठवणी जागवल्या. बाबांच्या जन्मशताब्दी वर्षाचा कार्यक्र म व ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ हा चित्रपट ही बाबांच्या कार्याला वाहिलेली आदरांजली आहे, असे मी मानतो.
- डॉ. प्रकाश आमटे