ह. मो. मराठे - शापित प्रतिभावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 03:15 AM2017-10-06T03:15:09+5:302017-10-06T03:15:25+5:30
ह. मो. मराठे हे ‘हमो’ या टोपण नावाने ओळखले जात होते. त्यांच्या काही कथा कादंबºयांमधून उपरोधिक आणि विडंबनात्मक लेखनशैलीचा अनुभव त्यांनी वाचकांना दिला.
ह. मो. मराठे हे ‘हमो’ या टोपण नावाने ओळखले जात होते. त्यांच्या काही कथा कादंबºयांमधून उपरोधिक आणि विडंबनात्मक लेखनशैलीचा अनुभव त्यांनी वाचकांना दिला. ते चतुरस्र लेखक व साक्षेपी संपादक होते. आपल्या लेखनावर आणि विचारांवर ते कायमच ठाम राहिले,
१९७५ पासून ते अगदी आजपर्यंत मराठी वाचकांच्या मनावर राज्य करणारे ह.मो. स्वर्गवासी झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेला एक जिद्दी युवक साहित्य क्षेत्रात किती उत्तुंग भरारी घेऊ शकतो, याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांना एडिटर विईथ मिडास टच म्हणायचे. किर्लोस्कर मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. लोकप्रभाचे संपादक झाल्यावर त्यांनी त्याचा खप लाखाच्या पुढे नेऊन दाखविला होता. त्यामुळे पत्रकारितेतील ज्या दुढ्ढाचार्यांचा पोटशूळ उठला त्यांनी ह.मों.वर वैयक्तिक चिखलफेक करून त्यांना त्या पदावरून घालवले, घरदार नावाच्या नवख्या मासिकाला त्यांनी आपल्या संपादन कौशल्याच्या जोरावर लाखाच्या पुढे खप गाठून दिला होता. ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या त्यांच्या साहित्यकृतीमुळे मराठी वाचकाला ह. मो. यांचा खºया अर्थाने परिचय झाला.
परंतु प्रत्येक वेळी यश त्यांना हुलकावणी देत गेले. त्यामुळे घरदार मासिकाच्या मालकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली आणि ते बंद पडले. नवशक्तीचे ते काही काळ संपादक होते, त्याआधी मार्मिकचेही ते कार्यकारी संपादक होते. परंतु संपादनाची जी भट्टी किर्लोस्कर, लोकप्रभा आणि घरदारमध्ये जमली तशी ती परत जमलीच नाही. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते. यश त्यांच्या दृष्टिक्षेपात होते. परंतु त्यांनी काढलेल्या आवाहन पत्रातील काही विधानांना जातीय रंग देऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मजल काहींनी गाठली आणि साहित्य क्षेत्रातील या हनुमानाला पुन्हा एकदा माघार घ्यावी लागली.
पुढारीचे संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. परंतु तिथे ते रमले नाहीत. त्यांच्या लेखनाची भट्टी ही नंतर बिघडतच गेली. बालकांड हे त्यांचे आत्मचरित्र खूप गाजले, हे त्यांचे गाजलेले शेवटचे पुस्तक म्हणावे लागेल. परिस्थितीमुळे आणि साहित्यातील जातीयवाद व कंपूशाही याचा ते आयुष्यभर बळी ठरले. लेखन, पत्रकारिता, संपादन, आणि साहित्य क्षेत्र यात प्रभावी मुशाफिरी करणारा हा प्रतिभावंत अभिजात सृजनशीलतेचा धनी होता. परंतु त्याला नियतीची आणि नशिबाची साथ मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्यातील अस्सल प्रतिभावंत हा पूर्ण ताकदीने वाचकांपुढे येऊ शकला नाही.
मराठी साहित्यातील पुरस्कारांनीही त्यांची उपेक्षा केली. असे असले तरी सतत हसतमुख असणारा आणि चिरतरुण लेखणीचे वरदान लाभलेला हा प्रतिभावंत काळाच्या पडद्याआड गेल्याने मराठी सारस्वताची अपरिमित हानी झाली आहे. साहित्य पत्रकारिता आणि संपादन यातील ‘अरुण’ साधूंच्या रूपाने अस्ताला गेला आणि त्यापाठोपाठ काही दिवसांतच याच तीनही क्षेत्रात कर्तबगार भरारी घेणारा हनुमानही अंतर्धान पावला. हे मराठी साहित्याचे दुर्दैव म्हटले पाहिजे.