योगयुक्त आणि भक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:07 AM2017-10-19T00:07:25+5:302017-10-19T00:07:30+5:30
संत ज्ञानेश्वर माऊली हे केवळ तत्त्वचिंतक नव्हते तर तत्त्वानुभवी होते. त्यांची ग्रंथनिर्मिती म्हणजे त्यांच्या आत्मानुभूतीवर आधारलेल्या स्वानुभवी चिंतनाचा कृपाळू अविष्कार होय.
- डॉ. रामचंद्र देखणे
संत ज्ञानेश्वर माऊली हे केवळ तत्त्वचिंतक नव्हते तर तत्त्वानुभवी होते. त्यांची ग्रंथनिर्मिती म्हणजे त्यांच्या आत्मानुभूतीवर आधारलेल्या स्वानुभवी चिंतनाचा कृपाळू अविष्कार होय. भारतीय आचार्यांनी द्वैत, विशिष्टाद्वैत, केवलाद्वैत, पूर्वाद्वैत इत्यादी भिन्न भिन्न विचारसरणी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात प्रचलित केल्या. जीव, जगत आणि परमात्मा यांची स्वरूपे कथन केली. सर्वच तत्त्ववेत्त्यांची दृष्टी मोक्ष या चतुर्थ पुरुषार्थावर आरूढ होऊन थांबते. परंतु, ज्ञानदेवांची पारमार्थिक अनुभूमी मोक्षासी न थांबता त्याच्याही पलीकडे जाऊन ज्ञानोत्तर भक्तीत स्थिर झाली आहे.
‘चहू पुरुषार्थाचे शिरी। भक्ती जस्ौी।।’ असे प्रतिपादन करीत ज्ञानदेव भक्तीलाच पंचम पुरुषार्थ मानतात. ज्ञानदेवांनी आपल्या तत्त्वचिंतनातून अनाकलनीय ज्ञानाला भक्तीचा ओलावा आणि कर्माचे हातपाय दिले. तर शुद्धाचरणातून कर्माला ज्ञानाचे डोळे दिले.
कर्म व ज्ञान यांच्या अहंकारातून निवृत्त होण्यासाठी भक्तीचे मोठेपण सांगून ज्ञान-कर्म आणि भक्तीचा समन्वय साधला. अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारला की, भक्त आणि योगी यापैकी कुणी खरोखर योग जाणला आहे? माऊली त्यावर भाष्य करताना म्हणतात,
‘‘तयां आणि जी भक्तां।
येरायेरा माजीं अनंता।
कवणें योगु तत्त्वतां।
जाणितला सांगा।’’ त्यावर भगवंत स्पष्टपणे सांगतात, सूर्य अस्ताचलाच्या समीप गेल्यावरही सूर्यबिंबामागून जशी किरणे जातात, गंगा नदी समुद्रास मिळाल्यावरही जसा तिच्या मागील पाण्याचा अनिवार लोट येतच राहतो; त्या गंगेसारखा ज्यांच्या प्रेमभावाचा जोर कायम राहतो आणि जे सर्व इंद्रियासहित माझ्या स्वरुपी दृढ अंत:करण ठेवून माझी उपासना करता ते,
‘‘यापरी जे भक्त। आपणचे मज देत।
तेचि मी योगयुक्त।परम मानी।’’ याप्रमाणे जे भक्त आपला आत्मभाव देतात तेच खºया अर्थाने योगयुक्त झाले आहेत, असे समज.
भक्ती ही केवळ करायची नसून, जगायची आहे. अंत:करणात भगवत्विषयक प्रेम उत्पन्न होऊन त्याची पूजा नामस्मरणादी करीत राहणे एवढेच भक्तीचे मर्यादित स्वरूप नाही.
परमार्थ ही विवक्षित कालात, विवक्षित स्थळी, विवक्षित प्रकारची क्रिया नव्हे; तर ज्या भाग्यवंताच्या अंत:करणात भक्ती उत्पन्न झाली त्याच्या जीवनात क्रांती होणे असे आहे.