योग व उद्योगाने जीवन सुखी होईल; देशही स्वावलंबी बनेल!

By विजय दर्डा | Published: June 22, 2020 02:31 AM2020-06-22T02:31:15+5:302020-06-22T02:33:33+5:30

मुलांना वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच योग का शिकविला जात नाही? त्यात काय अडचणी आहेत.

Yoga and industry will make life happier; The country will also become self-sufficient! | योग व उद्योगाने जीवन सुखी होईल; देशही स्वावलंबी बनेल!

योग व उद्योगाने जीवन सुखी होईल; देशही स्वावलंबी बनेल!

googlenewsNext

- विजय दर्डा
रविवारी २१ जूनला संपूर्ण जगाने योगदिन साजरा केला. त्यानिमित्त ‘लोकमत’ समूहाने एका वेबिनारचे आयोजन केले. त्यात सुरुवातीस ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’चे संस्थापक व जागतिक शांतता आणि बंधुभावासाठी अग्रदूताची भूमिका बजावणारे श्री श्री रविशंकर आणि त्यानंतर भारतीय योगसाधनेने संपूर्ण जगाला आरोग्यसंपन्न करण्याचे व्रत घेतलेले योगगुरू स्वामी रामदेव यांच्याशी सविस्तर बातचीत झाली. मी या दोघांनाही विचारले की, योगाचे महत्त्व वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे व युरोप तसेच जगाच्या इतर अनेक देशांमध्ये योग शिकविला जात आहे, तर मग भारतात शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश का केला जात नाही? मुलांना वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच योग का शिकविला जात नाही? त्यात काय अडचणी आहेत.
आपल्याकडेही योग जीवनाचा अविभाज्य भाग व्हायलाच हवा, असे दोघांनीही आग्रहाने सांगितले. श्री श्री रविशंकर म्हणाले की, शाळांमध्ये तर योग शिकविला जायला हवाच, शिवाय नोकरीच्या ठिकाणीही योग सक्तीचा करायला हवा. कामाच्या ठिकाणी व्यक्ती खूप तणावाखाली असते, हे लक्षात घेता एव्हाना खरेतर अशा सर्व ठिकाणी योगाची व्यवस्था व्हायला हवी होती; पण एवढा उशीर का व्हावा हे कळत नाही. स्वामी रामदेव यांनी फारच चांगले सांगितले की, योगाचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही. योग सर्वांसाठी आहे व सर्वांनी त्याचा अंगीकार करायला हवा. घरोघरी लोक योगाभ्यास करू लागले, तर त्यासारखी उत्तम गोष्ट दुसरी कुठलीही नाही.


चर्चेमध्ये योगासोबत उद्योगाचा विषयही निघाला. कारण स्वामी रामदेव यांनी योगाप्रमाणेच उद्योग क्षेत्रातही स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. राष्ट्रीय तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही नाईलाजाने आयुर्वेदिक उत्पादनांकडे वळविण्याचे श्रेय त्यांनाच जाते. योग आणि उद्योग हे असे दोन मार्ग आहेत, ज्यांचा अवलंब केल्याने व्यक्तिगत आरोग्यासोबतच देश स्वावलंबीही होऊ शकतो. आज सर्वांत मोठी अडचण अशी आहे की, जगातील अनेक देश आरोग्याच्या बाबतीत कमजोर होत आहेत (किंवा त्यांना मुद्दाम कमजोर केले जात आहे.) लोकांची रोगप्रतिकार क्षमता कमी होत चालली आहे. परिणामी ‘कोविड-१९’च्या महामारीने जगात लाखो लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली होती ते या साथीची लागण होऊनही वाचले आहेत. कधी ‘सार्स’, कधी ‘चिकुनगुनिया’ तर कधी ‘स्वाईन फ्लू’च्या साथीला लोक बळी पडत असतात. महिन्याला किराणा मालापेक्षा जास्त औषधांवर खर्च करणारे अनेक लोक मला माहीत आहेत.
आपण दिनचर्येत योगाचा समावेश केला, तर विषाणूंच्या संसर्गाशी लढण्याची क्षमता आपण प्राप्त करू शकतो. व्यक्तीला आरोग्यसंपन्न ठेवण्यासाठी योग व आयुर्वेद सक्षम आहे; पण दुर्दैवाने इंग्रजी औषधांचे लागेबांधे एवढे प्रबळ आहेत की त्याने आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी उपचारपद्धतींना पार दाबून टाकले आहे. इंग्रजी औषधांच्या कंपन्यांपुढे जागतिक आरोग्य संघटनाही अगदी हतबल आहे. सन २०१८ च्या आकडेवारीनुसार, जगभरात औषधांची बाजारपेठ ९१ लाख कोटी रुपयांहून जास्त आहे व त्यात दरवर्षी ६.३ टक्क्यांनी वाढ होत आहे. एक रुपया उत्पादनखर्च असलेले औषध १०० रुपयांना विकले जाते. मला तर असे वाटते की, लोकांना ‘जंक फूड’च्या नादी लावणारे एक पद्धतशीर रॅकेट असावे. लोकांनी निकृष्ट आहार घेतला तर ते आजारी पडतील. मग औषधे घेतील व आरोग्य विमा उतरवतील, असे हे दुष्टचक्र आहे.
चीनने पाश्चात्यांच्या आहारी न जाता आपले पारंपरिक वैद्यकशास्त्र टिकवून ठेवले व विकसित केले. मग आपण तसे का करू शकत नाही, हा खरा प्रश्न आहे. आपला योग व आयुर्वेदाचा वारसा खूप प्राचीन आहे. आपण जगाला योग व प्राणायाम शिकविला आहे. या दोन्हींचा अवलंब केला तर औषधांवरचा लाखो रुपयांचा खर्च वाचू शकतो. शेवटी सार्वजनिक आरोग्यसेवांवर खर्च होणारा हा पैसा समाजाच्या कल्याणासाठी अन्य कामांवर वापरता येऊ शकेल.
स्वामी रामदेव यांच्या आधी योगाचार्य बेल्लूर कृष्णमाचारी सुंदरराजा अय्यंगार यांचे नाव संपूर्ण जगात योगाच्या संदर्भात मोठ्या आदराने घेतले जायचे. पहिल्या महायुद्धानंतर योगाचार्य अय्यंगार यांनी जगाला योगसाधनेने पूर्णपणे तंदुरुस्त राहण्याचा संदेश दिला. ‘अय्यंगार योग’ या नावाने त्यांनी योगाची एक नवी पद्धत सुरू केली. ‘जगातील सर्वांत वयोवृद्ध योगशिक्षक’ म्हणून गिनिज बुकात ज्यांची नोंद आहे त्या अमेरिकेतील ९८ वर्षांचे योगशिक्षक ताओ पोर्चोन यांनीही योगाचे धडे अय्यंगार यांच्याकडूनच घेतले होते. चीननेही देशातील सर्वोच्च बहुमानाने अय्यंगार यांचा गौरव केला होता. योगाचे महत्त्व पटल्याने बेल्जियमच्या महाराणीने सन १९५८ मध्ये अय्यंगार यांना निमंत्रण देऊन त्यांच्याकडून शीर्षासन शिकले होते. जे. कृष्णमूर्ती, जयप्रकाश नारायण, सचिन तेंडुलकरसह इतरही अनेक मोठे लोक अय्यंगारजींचे शिष्य होते.

मुंगेर येथील ‘बिहार स्कूल आॅफ योगा’ने अद्वितीय कामगिरी केली आहे. याखेरीज भारतात योगाची इतरही प्राचीन पीठे आहेत. हृषिकेशने तर ‘योगाची राजधानी’ अशी ख्याती मिळविली आहे. हा थोर वारसा आपण किती जपत आहोत, किती पुढे नेत आहोत, हा विचार करण्याचा मुद्दा आहे. योगामुळे आपल्या जीवनमूल्यांनाही संस्कारित करतो. आपल्याकडे आप्पासाहेब धर्माधिकारी, प्रल्हाद पै व अण्णासाहेब मोरे यांच्यासारख्या महानुभावांंनी समाजात संस्कार रुजविण्याचे महान कार्य केले आहे. त्यांचा हा वारसाही आपण जपायला हवा.
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी नियमितपणे योगाभ्यास करतात. पं. नेहरू, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई व राजीव गांधी हे आपले माजी पंतप्रधानही योग करायचे. असे असूनही योगाला राजाश्रय न मिळणे, हे आश्चर्यकारक आहे; असे का, असे विचारता स्वामी रामदेव यांनी मला सांगितले की, मोदीजी निर्णय घ्यायला जरा संकोच करतात.
सध्या आपण पुन्हा एकदा स्वदेशीच्या गप्पा जोरदार सुरू केल्या आहेत. ‘मेक इन इंडिया’ व ‘मेड इन इंडिया’च्या गोष्टी करत आहोत; पण चीन व बहुराष्ट्रीय कंपन्यांशी दोन हात करण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे का? ज्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर पत आहे अशी काही उद्योजक घराणी आपल्याकडेही आहेत. पतंजली, डाबर, विको यांसारख्या कंपन्या नक्कीच नेटाने संघर्ष करत आहेत; पण हा संघर्ष दीर्घकाळ करावा लागणार आहे. याच स्तंभात उद्योगाविषयी मी याआधी अनेकदा असे लिहिले की, आपण धोरणे सुलभ केली तरच आपल्याकडे उद्योग विकसित होऊन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्पर्धेत टिकाव धरू शकतील. स्वदेशी उद्योगांची भरभराट होईल तेव्हाच देश स्वावलंबी होऊ शकेल. सध्याच्या स्थितीत योग व उद्योगच आपल्याला जगाच्या पातळीवर बलशाली बनवू शकतात. त्यामुळे औषधांची सवय लागण्याआधीच आपल्याला नव्या पुढीला योगाची ओढ लावावी लागेल. बालवयात लागलेली सवय नंतर आयुष्यभर सुटत नाही, तर योग व देशी कंपन्यांच्या उत्पादनांना जीवनात स्थान द्या. त्याने तुमचे आयुष्य नक्कीच सुखी व आनंदी होईल.

(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

Web Title: Yoga and industry will make life happier; The country will also become self-sufficient!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.