विशेष लेख: भारतीय राज्यघटनेतील ‘पूर्व-पश्चिमे’चा संगम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 07:56 IST2025-04-16T07:55:09+5:302025-04-16T07:56:03+5:30

Indian Constitution: खरे तर, जगभरातल्या राज्यव्यवस्थेची औपचारिक यंत्रणा विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका अशा आधुनिक लोकशाही संरचनेवर उभारली गेली आहे.

Yogendra Yadav's Editorial about the Indian Constitution and Dr. Babasaheb Ambedkar | विशेष लेख: भारतीय राज्यघटनेतील ‘पूर्व-पश्चिमे’चा संगम!

विशेष लेख: भारतीय राज्यघटनेतील ‘पूर्व-पश्चिमे’चा संगम!

-योगेंद्र यादव (राष्ट्रीय संयोजक, भारत जोड़ो अभियान सदस्य, स्वराज इंडिया)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण नुकतीच साजरी केली. त्यानिमित्ताने एका महत्त्वाच्या मुद्द्याची चर्चा होणे महत्त्वाचे आहे. भारताच्या राज्यघटनेवर हल्ला करू पाहणारे बाबासाहेबांचे नाव घेऊन असा हल्ला आजकाल करत नाहीत. 

संविधान बदलण्याच्या वल्गना जनतेच्या पचनी पडत नाहीत हा धडाही त्यांनी नुकताच घेतला आहे. त्यामुळे घटनेला मस्तकी धारण करत असतानाच तिचा गाभा मात्र नष्ट करण्याची कावेबाज मोहीम त्यांनी आता सुरू केलेली दिसते. 

‘भारतीय घटनेच्या भारतीयत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणे’ हे या मोहिमेतील प्रमुख अस्त्र आहे. भारतीय राज्यघटनेवर विदेशीपणाचा शिक्का मारल्यामुळे एकाच दगडात अनेक पक्षी मारता येतात. त्यातून राज्यघटना बदलण्याच्या दीर्घकालीन योजनेचा पाया पक्का करता येऊ शकतो. 

देशी-विदेशी ही चर्चा छेडता-छेडता घटना समितीने मूलत: नाकारलेल्या  गोष्टी हळूच त्यात घुसडल्या जाऊ शकतात आणि त्यायोगे बाबासाहेबांचा खराखुरा वैचारिक आणि राजकीय वारसा नष्ट करता येतो.

हा प्रश्न उपस्थित करणारे लोक  वरवरचे पुरावे सादर करतात. उदा. भारतीय घटनेतील अनेक तरतुदी इंग्रजांनी बनवलेल्या १९३५ च्या कायद्यातूनच घेतल्यात. मूलभूत अधिकारांची कल्पना अमेरिकन घटनेतून घेतली आहे तर धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वांची संकल्पना आयर्लंडच्या घटनेतून. बाबासाहेबांसह समितीतील बहुतेक सदस्यांवर पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता. इत्यादी, इत्यादी. 

खरे तर, जगभरातल्या राज्यव्यवस्थेची औपचारिक यंत्रणा विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका अशा आधुनिक लोकशाही संरचनेवर उभारली गेली आहे. ही संरचनाच विदेशी म्हणणार असाल तर मग जगातील जवळपास सगळ्याच राज्यघटना विदेशी ठरतील. या अर्थाने मुळात घटनात्मक लोकशाही ही संकल्पनाच विदेशी आहे! 

भारतीयतेकडे अशा संकुचित दृष्टिकोनातून पाहण्यातच एक मूलभूत खोट आहे. भारतीय सिनेमाची भारतीयता तपासण्यासाठी आपण जे निकष लावू शकतो तेच संविधानाची भारतीयता तपासतानाही लावावे लागतील. सिनेमा बनवण्याचे तंत्र परदेशातून आले म्हणून भारतीय सिनेमाला विदेशी ठरवणे हा निव्वळ खुळचटपणा ठरेल. 

भारतीय सिनेमाची बाह्य सामग्री भले विदेशी असेल; पण त्याचा आशय आणि आत्मा पुरेपूर स्वदेशी आहे. राज्यघटनेच्या भारतीयत्वाचा अर्थही तिला विदेशी रचनेचा स्पर्शसुद्धा होता कामा नये असा मुळीच नसतो. आधुनिक संविधानाच्या संरचनेतून जे शब्द घडवले गेले ते भारतीय होते की नव्हते हा खरा प्रश्न! 

आपल्या लोकशाही संस्था भारतीय संदर्भानुरूप घडवल्या गेल्या की नाही, या राज्यघटनेच्या निर्मितीमागील तत्त्वज्ञानाच्या मुळाशी भारतीय विचारांची छाप होती की नाही; हा खरा सवाल आहे. या अर्थाने आपली घटना केवळ दोन वर्षेच नव्हे; तर तब्बल शंभर वर्षे लिहिली जात होती. 

भारताची राज्यघटना हा आधुनिक भारतातील राजनैतिक चिंतनाच्या अख्ख्या परंपरेचा वस्त्रगाळ अर्क आहे. ही परंपरा म्हणजे एक प्राचीन संस्कृती आणि आधुनिकता यांच्यातील द्वंद्वात्मक आंतरक्रियांचा परिपाक होय. या मंथनात भारतीय समाजाने आपले प्राचीन आणि वर्तमानकालीन श्रेष्ठत्व समजून घेऊन आपल्यातील हीनत्वाचा त्याग केला. या वैचारिक संघर्षातून भारताने अगदी स्वतःचीच अशी स्वदेशी आधुनिकता आकाराला आणली. आपली राज्यघटना  त्याच वैशिष्ट्यपूर्ण भारतीयतेची अभिव्यक्ती आहे.

भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत भारतीय लोकशाहीचा स्वधर्म शब्दबद्ध केलेला आहे. त्यातील शब्दप्रयोग पाश्चिमात्य राजनैतिक चिंतनातून आयात केलेले वाटू शकतील; पण या शब्दांना आपण भारतीय अर्थ दिला आहे. आपल्या स्वातंत्र्याच्या विचाराच्या मुळाशी व्यक्तिवादी स्वच्छंदता नसून समूहांतून आणि समूहाच्या साथीने प्राप्त केलेली बंधनमुक्ती आहे. 

आपल्या समतेच्या विचाराच्या मुळाशी करुणाभाव आहे. सहजीवनाच्या मुळाशी परस्पर मैत्रीचे तात्त्विक अधिष्ठान आहे. खुद्द बाबासाहेबच स्पष्टपणे म्हणाले आहेत की, ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संकल्पना मी फ्रान्सकडून घेतल्या अशा भ्रमात कुणी राहू नये. माझे गुरू गौतम बुद्ध यांच्याकडून मी या संकल्पना शिकलो आहे.’ 

भारतीय राज्यघटनेच्या संस्थात्मक संरचनेत आपण पाश्चिमात्य लोकशाही व्यवस्थासुद्धा आपल्या गरजा आणि आमच्या तत्त्वज्ञानाच्या साच्यात बसवली आहे. युरोपातील एकस्तरीय राष्ट्रराज्याची नक्कल न करता, विविध लोकशाही संस्थांची निर्मिती ‘विविध भारती’ या संकल्पनेला अनुरूप अशी केली गेली. 

संघराज्याचा अमेरिकन नमुना न स्वीकारता भारताने परिस्थितीला अनुरूप असे ‘राज्यांचा संघ’ असलेले संघराज्य बनवले. फ्रेंच निधर्मीपणा न स्वीकारता आपल्या सर्वधर्म समभावी तत्त्वज्ञानाच्या प्रकाशात बहुधार्मिक समाजाच्या मर्यादा ठरवल्या. 

अस्पृश्यतेचे निर्मूलन आणि जातिव्यवस्थेचा अंत करण्याचा भारताचा घटनात्मक संकल्पसुद्धा या समाजातील प्राचीन संत परंपरेचा भाग आहे. भारतीय संविधानातील भारतीयता काहीशी ब्रेड-पकोड्यासारखी आहे म्हणा ना. त्यातला ब्रेड भले विदेशी असेल; पण त्याला तिखट, पिठ-मिठाच्या मसालेदार देशी मिश्रणात घोळून, मग तळून त्यातून अस्सल देशी चवीचा एक रुचकर भारतीय पदार्थ बनतो. हीच तर सच्ची भारतीयता आहे. (yyopinion@gmail.com)

Web Title: Yogendra Yadav's Editorial about the Indian Constitution and Dr. Babasaheb Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.