दिल्लीश्वरांसमोर योगी आदित्यनाथांनी दंड थोपटले, पुढे...?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 08:13 AM2021-06-10T08:13:51+5:302021-06-10T08:14:15+5:30
Yogi Adityanath : योगी यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याचे, निदान नामोहरम करण्याचे सर्व प्रयत्न त्यांनी हाणून पाडले असून, श्रेष्ठींना पेचात पकडले आहे!
- हरीष गुप्ता
(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)
आसामचे सर्वानंद सोनोवाल नाही किंवा उत्तराखंडचे त्रिवेंद्र सिंग रावतही नाही, त्यामुळे सहजपणे आपल्यावर फुली मारण्याची स्वप्ने श्रेष्ठींनी पाहू नयेत, हे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे. जोवर आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहोत तोवर आपण आपल्या राज्यात आपल्याला हवे तसे प्रशासन राबवू हेही त्यांनी स्पष्टच सांगून टाकले असे म्हणतात. बंडखोर आणि इतरांशी बोलणी करायला भाजपचे सरचिटणीस बी. एल. संतोष लखनऊला गेले असता पक्ष मुख्यालयात योगी यांनाही बोलावण्यात आले होते. नंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. २०१७ मध्ये पक्षश्रेष्ठी योगी यांना अनुकूल नव्हते. मनोज सिन्हा यांना मुख्यमंत्री करण्याचे त्यांच्या मनात होते; पण ही योजना मुळातच खुडण्यात आली आणि योगी मुख्यमंत्री झाले. नंतर दोन उपमुख्यमंत्री त्यांच्या डोक्यावर बसवण्यात आले. अमित शहा यांचे कान मानले जाणारे पक्षाचे राज्य सरचिटणीस सुनील बन्सल हुकूम देऊ लागले; पण योगी बधले नाहीत. उलट ते मोदी यांच्यानंतरचे भाजपचे स्टार प्रचारक झाले.
या टप्प्यावर पंतप्रधान कार्यालयातले विश्वासू अधिकारी ए. के. शर्मा यांना योगींना वेसण घालण्यासाठी धाडण्यात आले. ते विधान परिषद आमदार झाले आणि भूमिहारांचे नेते म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपदाचा भावी चेहेरा ठरवण्याचा प्रयत्न झाला. पंचायत निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाली त्याचे खापर योगींवर फोडण्यात आले. मात्र योगी यांनी संतोष यांच्याकडे खुलासा केला की शर्मा वाराणसीचे प्रमुख होते आणि बन्सल अयोध्या निवडणुकीचे काम पाहत होते. या ठिकाणी भाजप मागे पडला आहे. “कोविडविरुद्ध लढाई नीट लढले नाहीत,” असाही दोष योगी यांना देण्यात आला. गंगेत प्रेते वाहत आली, तेव्हा त्याच्या बातम्या आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या.
लखनऊत आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकांत योगी यांना हटवणे किंवा शिवराजसिंग चौहान यांच्याप्रमाणे त्यांना नामोहरम करणे यासाठी गुप्त बैठका झाल्या. चौहान यांच्याकडे एके काळी पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. पण योगी वेगळ्या मुशीतून घडलेले आहेत. ते संतोष यांच्याशी थेटच बोलले. उत्तर प्रदेशात ५.१० कोटी इतक्या विक्रमी कोविड चाचण्या झाल्या. दररोज ४ लाख लोकांना लस देण्यात आली.
उत्तर प्रदेशाचा सात दिवसांचा कोविड लागण दर ०.३ टक्के आणि मृत्यू दर १.३ टक्क्यांच्या खाली आहे, असे त्यांनी सांगितले. गंगेत प्रेते का वाहत आली, याचे उत्तर देताना उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये प्राचीन काळापासून जलप्रवेश करण्याची प्रथा आहे, असा खुलासा योगी यांनी केला. “उत्तर प्रदेश हा भाजपचा मानबिंदू म्हणून दाखवण्याऐवजी आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न चालला आहे. या असल्या कारवायांपुढे गुडघे टेकण्यापेक्षा आपण पद सोडणे पसंत करू,” असेही ते म्हणाले. पाणी किती खोल आहे याचा अंदाज आल्यावर श्रेष्ठींनी माघार घेतली.
संघाचा योगींना पाठिंबा बातम्यांतून जे समोर येत होते त्याच्या अगदी उलट असे चित्र प्रत्यक्षात उलगडताना दिसत आहे. अध्यात्म सोडून नंतर राजकारणात आलेले भगवे वस्त्रधारी साधू योगी आदित्यनाथ यांना संघाचा पूर्ण पाठिंबा आहे. मोदींच्या नंतर त्यांची जागा घेऊ शकणारे प्रमुख नेते म्हणून योगी यांच्याकडे संघ परिवार पाहत आहे. कल्याणसिंग यांच्याप्रमाणे योगी यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची चूक करायची नाही असा संघाचा मानस दिसतो. १९९९ मध्ये वाजपेयी यांच्यामुळे कल्याणसिंग यांना बाजूला करण्यात आले. २००२ मध्ये भाजपने त्याची मोठी किंमत मोजली. पुन्हा सत्ता मिळवायला पक्षाला नंतर १५ वर्षे वाट पाहावी लागली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना उत्तर प्रदेशात पाठविण्याचे घाटत होते; पण संघाने पुन्हा चूक न होऊ देण्याचा निर्धार केला होता. पुढची निवडणूक केवळ योगींच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल, असे संघाने स्पष्ट करून टाकले. तडजोड म्हणून दिल्लीची पसंती असलेले नेते ए. के. शर्मा यांना मंत्री पद द्यावे; पण उप-मुख्यमंत्रीपद मिळणार नाही, हेही ठणकावून सांगण्यात आले. असे म्हणतात की, अमित शहा यांनी उत्तर प्रदेशात सुरक्षित अंतर राखायचे ठरवले आहे. पंजाबात भाजपची स्थिती सैरभैर आहे, अकाली दल एनडीएतून बाहेर पडले आहे, तेथे शहा जास्त लक्ष देतील अशी शक्यता आहे.
ममतांचा धसका
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धानकर यांनी कोलकात्याच्या बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे कानावर येते. अलीकडच्या काळात जे घडले ते पाहता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर सलोख्याने राहणे शक्य नाही या निष्कर्षापर्यंत ते आले आहेत. अनेक राज्यपालांकडे दोन दोन राज्ये असल्याने खांदेपालट संभवनीय आहे. दिल्लीचे राज्यपाल अनिल बैजल निवृत्त होत आहेत. केंद्रीय दक्षता आयोगाचे प्रमुख संजय कोठारी या महिन्याच्या उत्तरार्धात निवृत्त होतील; त्यांचे नाव या पदासाठी घेतले जाते.