आनंदी जगण्याचा मंत्र देणारा ‘योगी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 01:03 AM2018-04-29T01:03:26+5:302018-04-29T01:04:05+5:30

डॉ. धनंजय गुंडे यांचे नुकतेच निधन झाले. ‘मस्त मस्त व आनंदाने जगू या’ असा संदेश देणाऱ्या डॉ. गुंडे यांनी स्वत:चे जीवन तर सर्वार्थाने ‘आनंददायी’ बनवलेच

'Yogi' who gave the mantra of a happy life | आनंदी जगण्याचा मंत्र देणारा ‘योगी’

आनंदी जगण्याचा मंत्र देणारा ‘योगी’

Next

डॉ. धनंजय गुंडे यांचे नुकतेच निधन झाले. ‘मस्त मस्त व आनंदाने जगू या’ असा संदेश देणाऱ्या डॉ. गुंडे यांनी स्वत:चे जीवन तर सर्वार्थाने ‘आनंददायी’ बनवलेच, पण इतर असंख्य लोकांनाही हा प्रेरणादायी मंत्र दिला. त्यांच्या आनंददायी जीवनाच्या वाटेवर अत्यंत अनपेक्षितपणे सोबत करताना कदाचित मृत्यूलाही त्यांचा हेवा वाटला असेल....

- दशरथ पारेकर-
डॉ. धनंजय गुंडे यांच्या निधनाचे वृत्त अनेकांना धक्कादायक वाटणे साहजिक आहे. त्यांच्या जी. जे. जी. योग अकॅडमीच्यावतीनं नुकतंच त्यांचं ९०० व योग शिबिर कोल्हापुरात पार पडलं. देश-विदेशात सर्वांगीण आरोग्य योग कार्यशाळा घेण्याचा एक ऐतिहासिक टप्पा पूर्ण केल्याचा आनंद व समाधानात ते आठवडाभरासाठी केरळला आपल्या कन्येकडे गेले होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी कलपेटा इथं वास्तव्यास असणाºया कविताच्या बंगल्याच्या आवारातील कमळांच्या फुलांचे सुंदर फोटो व्हॉट्स अ‍ॅपवरून आपल्या मित्रांना पाठविले होते. अलीकडं ते सोशल मीडियावर फारच ‘अ‍ॅक्टिव्ह’ झाले होते. त्यामुळं व्हॉटस् अ‍ॅपवर रोज संदेश पाठवणं आणि फेसबुकवर विविध फोटो अपलोड करणं हे त्यांचं कार्य नियमितपणे सुरू असायचं. त्याचं वृत्तपत्रातून आणि ‘योगवार्ता’ या त्यांच्या नियतकालिकातून नियमित लिहिणं तर सुरू होतच, तशात सोशल मीडियात ते एखाद्या उत्साही तरुणाच्या जोशात रस घेत असत. जे जे चांगलं वाटे ते फॉरवर्ड करणं आणि प्रामुख्यानं आरोग्याशी निगडित संदेश असतील तर ते आवर्जून लिहिणं हे काम ते त्यासाठी खास वेळ काढून करीत.
‘योग आणि आरोग्य’ या विषयाला तर त्यांनी वाहूनच घेतलं होतं. इतकं की, आपण मूळचे अस्थिरोग शल्य विशारद आहोत, हे जणू ते विसरूनच गेले आहेत, असं वाटावं. सर्वार्थानं ते ‘योग-आरोग्य’मय झाले होते. लोकही त्यांना योगतज्ज्ञ म्हणूनच अधिकतर ओळखत. ही नवी ओळख त्यांना स्वत:ला फार आवडत असे. योगाकडे वळल्यानंतर त्यांनी स्वत:मध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणले. अनुभवानंतरच ते अधिकारवाणीने इतरांना सांगू लागले. उत्तम चाललेल्या वैद्यकीय व्यवसायाकडे काहीसे दुर्लक्ष करून त्यांनी हा नवा मार्ग चोखाळला. त्यांची योग-आरोग्य शिबिरं म्हणजे एक प्रकारची लोकांना अंतर्मुख बनविणारी कार्यशाळाच असे. ज्यांना ज्यांना अशा कार्यशाळेत सहभागी होण्याचा योग आला, ते भाग्यवानच म्हणावे लागतील.
आरोग्यविषयक जागृती तर त्यांच्यात झाली असणारच, पण त्यांचे मानसिक आरोग्यही सुधारले असणार हे निश्चित. अतिशय सुंदर वक्तृत्वाची व प्रभावी व्यक्तिमत्त्वाची त्यांना जणू देणगी लाभली होती. उपस्थित शिबिरात वा श्रोत्यांवर त्यांची अल्पावधीतच छाप पडत असे आणि मग त्यांचे जादूई प्रबोधन कार्य तासन्तास रंगतदारपणे चालत राही. उपस्थितांना ते अक्षरश: मंत्रमुग्ध करून सोडत. सार्वजनिक कार्यक्रमातील त्यांची उपस्थिती लक्षवेधी बनत असे आणि विनोदी शैलीतील साभिनय वक्तृत्वामुळे वातावरण उत्साही बनत असे. सलग तीन ते चार तासांची त्यांची योग कार्यशाळा असो किंवा तास दीड तासाचे भाषण असो. उपस्थितांना कंटाळा तर येत नसेच, उलट एक प्रकारचे चैतन्यदायी वातावरण आपसूक निर्माण होत असे. योगविषयक शेकडो कार्यशाळा त्यांनी घेतल्या आणि विविध विषयांवर हजारो व्याख्याने दिली. ज्यांना ज्यांना त्यांना ऐकण्याचा योग आला, त्यांच्या ते कायम स्मरणात राहिले असणार एवढे निश्चित.
डॉ. गुंडे यांना आपल्या जीवनाच्या वाटचालीत बºयाच अडचणींना, खडतर प्रसंगांना आणि पश्नांना सामोरे जावे लागले, पण त्यावर मात करीत ते सतत पुढे जात राहिले. बोरगावसारख्या ग्रामीण खेड्यातून आलेल्या व वैद्यकीय क्षेत्रात उच्चपदवी संपादन करण्याबरोबरच उच्चपद आणि सामाजिक स्तरावर लौकिक मिळविणाºया डॉक्टरांना मोठा संघर्ष करावा लागला हे खरे, पण त्यांनी ते आव्हान जाणीवपूर्वकच स्वीकारले आणि जीवनाची वाटचाल यशस्वी केली. त्यांचे व्यक्तिमत्त्व तसे बहुआयामी होते. चाकोरीबद्ध जीवन जगण्यात त्यांनी समाधान मानले नाही. वैद्यकीय व्यवसायाबरोबरच काही वर्षे त्यांनी शेती व दुग्ध व्यवसाय केला. ऊस उत्पादक शेतकºयांना रास्त दर मिळवून देण्यासाठी साखर कारखानदारांशी संघर्ष केला आणि ‘रोटरी क्लब’सारख्या संस्थांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमही राबविले. जगातील अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या. निसर्ग सांैदर्याचे ते भोक्ते असल्यामुळे जाणीवपूर्वक ते सतत पर्यटन करीत राहिले. डॉ. एच. एन. फडणीस या गुरूंच्या सहवासात आल्यानंतर आध्यामिक क्षेत्रातही त्यांनी गती प्राप्त करून घेतली. योग व आरोग्य कार्यशाळा आणि व्याख्यानाद्वारे शाकाहाराचे महत्त्व सांगण्याबरोबरच व्यसनमुक्ती कार्यातही त्यांनी सहभाग घेतला. ‘वीर सेवा दल’ व ‘युवक बिरादरी’च्या माध्यमांतून या उपक्रमांना त्यांनी चळवळीचे स्वरूप दिले. या विषयानुषंगाने सात ते आठ ग्रंथ आणि ‘योगवार्ता’ हे मासिक अनेक वर्षे चालविले.
तणाव बाँब हा अणुबाँबपेक्षा घातक असतो, असे ते सांगत. लोकांनी तणावमुक्त जीवनशैली अंगिकारली पाहिजे, यासाठी ते आग्रही असत. त्यासाठीच ‘हास्यक्लब’ चळवळ कोल्हापुरात रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या चळवळीचे ते शहरातील आद्यप्रवर्तकच. अनेक संस्थांना त्यांनी योग शिबिरे भरविण्यास प्रवृत्त व प्रोत्साहित केले आणि त्यांना त्यासाठी सहकार्यही केले. या चळवळीचे लोण महाराष्ट्रभर पसरविण्यातही त्यांचा मोलाचा वाटा राहिला.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगतज्ज्ञ म्हणून तर त्यांनी लौकीक मिळविलाच, पण थेट तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंह आणि राष्ट्रपती के. आर. नारायण यांना योग शिकविण्याचा बहुमानही त्यांना लाभला. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.कितीही मानसन्मान लाभले तरी आपल्या कार्यपद्धतीत त्यांनी नेहमीच सातत्य राखले. योग-आरोग्य कार्यशाळा घेण्याबरोबरच ‘निरोगी होऊ या, निरोगी राहू या आणि आनंदाने जगू या’ या नव्या प्रेरक प्रबोधन चळवळीसाठी ते झपाटून कार्यरत राहिले. अखेरपर्यंत त्यांनी या कार्याला एक प्रकारे वाहूनच घेतले. ज्याचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले तो ‘तरुण’ अशी तारुण्याची व्याख्या ते करीत. मग, ८0 वर्षे वय असले आणि शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असले, तरी तो ‘तरुण’च असे हे म्हणत. या व्याख्येप्रमाणे ते स्वत:ही वयाची ८१ वर्षे पार केल्यानंतरही ‘तरुण’च राहिले. त्यांचे सुहास्यवदनी, सदाबहार, टवटवीत ‘तरुण’ व्यक्तिमत्त्व त्यांच्या स्नेहीजन व चाहत्यांच्या सदैव स्मरणात राहील. असे सुंदर वैविध्यपूर्ण व समाधानी जीवन फारच कमी लोकांच्या वाट्याला येत असते. डॉ. गुंडे हे अशा भाग्यवंतांपैकी एक!
त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली !

Web Title: 'Yogi' who gave the mantra of a happy life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.