प्रकाश तुम्हीच आहात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 04:48 AM2018-11-07T04:48:48+5:302018-11-07T04:49:22+5:30

रामायण ही केवळ कित्येक युगांपूर्वी घडलेली कथा नाही, तर त्याला तत्त्वज्ञानाचे, आध्यात्माचे अधिष्ठान आहे आणि त्यात खोलवर काही अर्थ दडलेला आहे. ही महाकाव्याच्या रूपातील राजा दशरथ आणि त्याच्या तीन राण्यांची भव्य कथा आहे.

You are the light | प्रकाश तुम्हीच आहात

प्रकाश तुम्हीच आहात

Next

- श्री श्री रवीशंकर

रामायण ही केवळ कित्येक युगांपूर्वी घडलेली कथा नाही, तर त्याला तत्त्वज्ञानाचे, आध्यात्माचे अधिष्ठान आहे आणि त्यात खोलवर काही अर्थ दडलेला आहे. ही महाकाव्याच्या रूपातील राजा दशरथ आणि त्याच्या तीन राण्यांची भव्य कथा आहे. त्याने आणि त्याची एक राणी कौशल्या यांनी मिळून अश्वमेध यज्ञ केला. त्यानंतर, त्यांना चार पुत्र झाले. मेधा म्हणजे शुद्धिकरण (समारंभ); श्व म्हणजे काल किंवा उद्या; अश्व म्हणजे आत्ता, अनादी वर्तमान क्षण. मेधाचा दुसरा अर्थबुद्धी. अश्वमेध म्हणजे आपल्या बुद्धीला वर्तमानात स्थिर करणे, वर्तमानात स्थिर होत आपली चेतना आणि शरीर-मन समन्वयाला शुद्ध करणे, खोलवर आपल्या आत्म्यात, आपल्या ‘स्व’मध्ये स्थापित होणे. दशरथ म्हणजे अशी व्यक्ती जी दहा रथ एकाच वेळी हाकू शकते. जेव्हा दशरथ आणि कौशल्या अश्वमेध यज्ञ करण्यासाठी एकत्र येतात, तेव्हा रामाचा जन्म होतो.
‘रा’ म्हणजे प्रकाश. ‘म’ म्हणजे आपली अंतरात्मा. ‘राम’ आपल्या अंतरात्म्यातील प्रकाश दर्शवितो. तो दशरथ आणि कौशल्येचा पुत्र म्हणून जन्माला आला, म्हणजे जो दहा रथांना कुशलतेने संचालित करतो. ‘राम’ आपली अंतरात्मा दर्शवितो, म्हणजेच आपल्या आतील प्रकाश.
दिवाळी हा सण आपणही प्रकाशरूपी आहोत, याचे आपल्याला स्मरण करून देतो. केवळ तेलाचा दिवा लावून तुम्ही दिवाळी साजरी केली असे समजू नये. तुम्ही स्वत:च असा प्रकाश बना, जो इतरांना योग्य मार्ग दाखवेल. ऋषी पातंजलीनी म्हटलेच आहे, मूर्द्धज्योती, सिद्ध दर्शन. जेव्हा तुम्ही स्वत: प्रकाशरूप आहात, याबद्दल सजग होता, तेव्हा तुम्ही परिपूर्णता प्राप्त करता.
जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात ज्ञानरूपी प्रकाश उजळतो, तेव्हा सर्व तणावांचे निवारण होत द्वेष, मत्सर अशा नकारात्मक भावना आणि वृत्तींपासून मुक्ती लाभते. आता जेव्हा सर्वत्र ताण, तणाव, संघर्ष व्यापून आहे, तेव्हा आपणा सर्वांना याची प्रकर्षाने गरज आहे. आपल्याला जगात ज्ञान, शांती आणि आत्मीयतेची भावना पसरविण्याची जबाबदारी घ्यायची आहे.
या दिवाळीत ज्ञानाचा प्रकाश उजळा. मस्त प्रसन्न, आनंदी राहा आणि हाच आनंद इतरांसोबतही वाटा. भूतकाळातील सारे वादविवाद विसरून जा आणि मतभेद बाजूला सारा. ही वेळ आनंदी राहण्याची आणि मिठाया वाटण्याची आहे. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मन:पूर्वक खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या साऱ्या आशा आकांक्षा पूर्ण होवोत.

Web Title: You are the light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.