गुंगीतून बाहेर येण्यासाठी जोर लावला पाहिजे!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 05:52 AM2021-01-30T05:52:43+5:302021-01-30T05:52:58+5:30
माणसाला दुय्यमत्व दिलं जायला लागलं की नुकसानच होतं, हे विसरू नये! चांगुलपणाची दीर्घ परंपरा आणि सामुदायिक शहाणपण टिकवलं पाहिजे.
रंगनाथ पठारे, ख्यातनाम लेखक, समीक्षक
जगण्याकडं नव्यानं पाहण्याच्या अपरिमित शक्यता आहेत असं तुम्ही नेहमी म्हणता, गेल्या वर्षभराबद्दल काय म्हणाल?
सुरुवातीला सगळ्यांसारखाच मीही गोंधळून गेलो होतो, पण लवकर माझ्या लक्षात आलं की हे संपणारं नाही व मी वेगळ्या पद्धतीनं विचार करायला लागलो. या काळात लिहिणंबिहिणं अजिबात झालं नाही. मुळात ते शक्यच नसतं. आपण ज्या परिस्थितीतून जातोय त्याबद्दल लगेच लिहिणं वर्तमानपत्रात शक्य असतं, सर्जनशील प्रकारात ते जिरवणं, परिणामांचा अर्थ लावणं थोडं वेळ घेऊन होतं. याआधी सगळ्यांचंच धाबं दणाणून टाकणारी साथ आली होती ती एड्सची. तोही विषाणूच. मानवी प्रजातीची प्रमाणाबाहेर झालेली वाढ नियंत्रणात आणण्यासाठी जणू हा विषाणू प्रबळ झाला होता. स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊ नये, आलं तर ‘असं-असं’ होईल हे त्यानं सांगितलं. आता कोविडचा विषाणू म्हणतो, ‘एकत्र तर जाऊ द्या, तुम्ही एकमेकांत बरंच अंतर राखून राहिलात तरच जगाल, मग स्त्री असा की पुरुष.’ निसर्ग आणि मानव यांच्यातला समतोल बिघडून मानवी प्रजातीत प्रचंड मोठी वाढ झाली आहे त्यावर एका अर्थानं विषाणूंची कृती समतोल तयार करणारी आहे की काय असं वाटतं. दिवसेंदिवस हे विषाणू आपला गुणाकार व्हायला आळा घालू लागले आहेत. या नव्या वर्तमानासकट आपल्याला पुढं जावं लागेल, शारीर नव्हे, मानसिक-भावनिक निकटताही दिवसेंदिवस कठीण होत जाईल.
या मुश्कील गोष्टी आहेत. मग, निसर्गासारखं माणसाचंही वागणं आणखी बेभरवशाचं होणार का?
माणसाच्या मनाच्या तळातल्या गोष्टी कठीण प्रसंगात पृष्ठभागावर येतात. शहरांनी बाहेर घालवलेले श्रमिक लॉकडाऊननंतर आपापल्या गावी जायला निघाले तेव्हा काय दिसलं? शिक्षणाचा वगैरे संस्कार नसणारी साधी साधी माणसं शक्य तितकं करू बघत होती. रस्त्याकडेला चुली मांडून भाकऱ्या थापणं, मिळतील त्या भाज्या आणून शिजवणं, पाण्याचे रांजण भरून ठेवणं, पायी चाललेल्यांना घास खा नि पुढं जा म्हणणं यातून माणसामधल्या आस्थेचं फार सुंदर दर्शन झालं. मात्र माणसं घाबरलेली होती त्यामुळं हे लोंढे गावाकडे पोहोचले, आपल्या शहरात आले तेव्हा मात्र स्थानिकांनी त्यांना घुसू दिलं नाही. स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतोच. त्यातून नात्यांमधल्या बऱ्यावाईट गोष्टी, माणसाचं भित्रेपण पृष्ठभागावर आलं. आता वाटतं, लॉकडाऊनसारखा निर्णय जनतेला पूर्वकल्पना व वेळ देऊन घेता आला नसता का? मध्यमवर्गीयांचं ठीक आहे, पण हातावर पोट असणाऱ्यांची फार परवड झाली, सामान्य माणूस कुत्र्यामांजरासारखा संपला. बऱ्याच कॉन्स्पिरसी थिअरीज मोठ्या आंतरराष्ट्रीय पत्रिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या, ज्यात अमेरिका, फ्रान्स व चीन यांच्या गुपितांविषयी व काही जमाती नष्ट करण्याविषयी मांडणी केलीय. विश्वास ठेवणं वगैरे जाऊ दे, पण ती मांडणी वेधक आहे.
माणसाच्या हक्कासाठी, जगण्याच्या सन्मानासाठी देशभर, जगभर होणाऱ्या चळवळींचं भविष्य काय मग?
अलीकडच्या काळात राजकीय सत्तास्थानांची परिस्थिती बघा, अमेरिकेत (होते ते) ट्रम्प, रशियामध्ये पुतीन, चीनमध्ये शी जिनपिंग, भारतात मोदी... यांच्यापैकी कुणीही जागतिक नेता नेहरू, टिटो, नासर यांच्याप्रमाणे मानवी संस्कृतीचा, जिव्हाळ्याच्या प्रश्नांचा व आस्थांचा विचार करणारा नसणं ही भयंकर गोष्ट आहे. जसे समाजाविषयी कळवळा असणारे नेते जगाच्या प्रतलावर एकाचवेळी होते त्याचप्रमाणे तसा विचार नसणारे एकाचवेळी असणं हे कसं घडतं आहे?... विश्वाच्या व्यवहारात एका कालपटात असा काही काळ येतो ज्या वेळी एकाच प्रकारचे लोक व मानवी स्वार्थभाव वाढीला लागतो. हे चक्र दिसतं आहे. केवळ भारताचा विचार केला तरी फार धोकादायक सामाजिक वातावरणात आपण जगतो आहोत. सत्तास्थानातील व्यक्तींनी अशावेळी बोलणं व घाबरलेल्या लोकांना अभय देणं आवश्यक असतं. हा संदेश जर दिला गेला नाही व त्यानुसार वर्तन झालं नाही तर पुढे वेळ निघून गेल्यावर फार नुकसान झालेलं असेल.
माणसामाणसांत भिंती उभ्या राहाणं हे आपल्या पुरोगामी देशाला कसं मानवतं?
आपल्या पूर्वजांनी इथून तिथून माणूस एकसारखा असण्याचे विचार मांडले. काही मूठभर लोक पिढ्यांपिढ्या गुंगीत टाकून हे स्वप्न बदलू पाहतात. त्या गुंगीतून बाहेर पडायचा प्रयत्न होत आलेला आहे. तो जोर वाढायला हवा!
कोणताही शेवट हा मुळात आणखी एका आरंभाचं प्रास्ताविक असतो, हे इथं कसं लागू होईल?
माणसानं माणसाला दुय्यमत्व देणं यानं आपल्या इतिहासामध्ये पुन्हा पुन्हा नुकसान झालेलं आहे हे कुणीच लक्षात घेत नाही. कुठल्याही प्रदेशात जे लोक व्यापारी किंवा उच्चस्थानी असतात त्यांचे व सत्ताधाऱ्यांचे हितसंबंध धोक्यात आले की ते तिसऱ्या पार्टीला बोलावून स्थानिक राजकारणाचा पराभव घडवून आणतात व आपलं इप्सित साध्य करतात. परकीय आत शिरले की सामान्य माणसाला कुठलाच ‘से’ नसतो पण परिणामांना सामोरं जाण्याची वेळ मात्र येऊन ठेपते. गांधी व बाबासाहेब एकाच काळात समाजाचं दिशादर्शन करण्याचं भाग्य भारतीय समाजाला लाभलेलं होतं. आधुनिक काळात सामान्य माणसाला गांधींच्या अस्तित्वामुळं पहिल्यांदा आत्मविश्वास मिळाला. गांधी नसतानाही ते उरलेले असणं हे फार मोठं बळ आहे. चांगुलपणाची दीर्घ परंपरा असलेल्या आपल्या समाजातील सामुदायिक शहाणपणाचा जागर व्हावा! आता इंटरनेट व समाजमाध्यमांतील संवादाच्या नव्या रीती आलेल्या आहेत. नवं तंत्र रुजत चाललं की नवी परिभाषा येते, खूप मोडतोडी होतात. ही घुसळण उपकारक असते. त्याच्याही गैरवापराचे धोके आहेत, पण मूलत: आपली एकात्म बुद्धी, संघटित प्रज्ञा, शब्दांनी व शब्दांवाचून संवाद साधण्याची माणसाची इच्छा जिवंत राहील. उत्थानाची दिशा ठरवून आपण टिकू या!
मुलाखत : सोनाली नवांगुळ