दिखाई दिये यूँ... हमें आप से भी जुदा कर चलें!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 01:10 AM2019-08-21T01:10:24+5:302019-08-21T01:12:06+5:30

खय्याम साहेबांना संगीताखेरीज आणखी एक आवड होती, ती म्हणजे गप्पा मारायची.

You see, we have to be separated from you! | दिखाई दिये यूँ... हमें आप से भी जुदा कर चलें!

दिखाई दिये यूँ... हमें आप से भी जुदा कर चलें!

Next

- संजीव साबडे (समूह वृत्तसमन्वयक, लोकमत)

आपल्याला काही ठरावीक गाणी आवडतात, याचे मुख्य कारण त्यांना दिलेल्या चाली हेच असते. एखादी चाल आवडली की ते गाणे आपल्याला आवडते आणि लक्षातही राहते. नंतर ते आपण सतत गुणगुणू लागतो. चालीशिवाय गाणे लक्षात राहणे अवघड वा अशक्यच असते. त्यामुळे गाण्यांना दिलेली चाल वा संगीत याचे स्वत:चे एक वैशिष्ट्य आहे. याची प्रकर्षाने जाणीव व्हावी, अशी गाणी जुन्या पिढीतील अनेक संगीतकारांनी दिली. आपणच काय, पण लहान मुलेही तीच जुनी गाणी अलीकडे गाताना दिसतात. अशा या जुन्या पिढीतील खय्याम साहेब सोमवारी रात्री निवर्तले. ते बराच काळ आजारी होते आणि वयाची ९२ वर्षेही त्यांनी पार केली होती. त्यामुळे त्यांचे जाणे फारसे धक्कादायक नसले, तरी दु:खदायक मात्र आहे.

गुलाम मोहमद, नौशाद अशा जुन्या पिढीतील खय्यामसाहेब अगदी आतापर्यंत संगीत क्षेत्रात सक्रिय होते. त्यांनी संगीत दिलेला शेवटचा चित्रपट २0१६ सालचा. तो प्रदर्शित झाला नसला तरी वयाच्या नव्वदीपर्यंत त्यांच्या रोमारोमात संगीत असल्याचा तो पुरावा होता. त्यांचे पूर्ण नाव मोहमद जहूर खय्याम हाश्मी असले तरी संगीतप्रेमींसाठी ते खय्यामच होते. जवळपास ६८ वर्षे ते चित्रपटांना आणि त्यांतील गीतांना संगीतबद्ध करीत राहिले. मात्र एवढ्या काळात त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांची संख्या ६0 च्या आतच आहे. याचे कारण त्यांनी संगीतकार म्हणून कधी घाई केली नाही. चित्रपटांचे विषय पाहून त्यांनी आपण त्याला संगीत देऊ शकतो की नाही, हे ठरविले. बहुधा त्याचमुळे त्यांनी संगीत दिलेली बहुसंख्य गीते अतिशय लोकप्रिय झाली.

खय्याम म्हणताच आठवतात ‘कभी कभी’, ‘उमराव जान’, ‘बाजार’ या चित्रपटांतील गाणी. कभी कभी चित्रपटात प्रेमाचा बाजार नव्हता. उमराव जान हाही बाजारी चित्रपट नव्हता आणि बाजार हा तर प्रत्यक्षात हळवा चित्रपट म्हणता येईल. खय्याम साहेबांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी गाण्यांना जो संगीताचा बाज चढवला, तोही तशाच प्रकारचा होता. पहाडी राग हा त्यांचा खास आवडता राग. त्या रागात त्यांनी अनेक फिल्मी गीते संगीतबद्ध केली.

खय्याम साहेबांनी संगीत दिलेले बाजारमधील ‘हम है मता ए कुचा, ओ बाजार की तरह’ वा ‘दिखाई दिये यूँ के बेखुद किया, हमे आप से भी जुदा कर चले’ हे गाणे असो, ते त्या शब्दांमुळे लक्षात राहूच शकत नाही. ते लक्षात राहते ते केवळ संगीताच्या बाजामुळे. वो सुबह कभी तो आएगी आणि आसमां पे है खुदा और जमीं पे हम, (फिर सुबह होगी), बहारों, मेरा जीवन भी सवारो (आखरी खत), ए दिले नादान (रझिया सुलतान), दिल चीज क्या है, इन आखों की मस्ती के, ये क्या जगह है दोस्तो (उमराव जान) अशी शेकडो गाणी आजही संगीतरसिकांना भुरळ घालतात. याशिवाय खानदान, थोडीसी बेवफाई, त्रिशूल, नूरी, आहिस्ता आहिस्ता, पर्बत के उस पार अशा त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांतील गाणी आजही मनात रुंजी घालत राहतात.

त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांचे आणि संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात निष्कारण वाद्यांचा धांगडधिंगा आढळत नाही. वाद्यांचा बारकाईने वापर करणे आणि तालवाद्यांचा अतिवापर नसणे ही खय्याम साहेबांच्या संगीताची वैशिष्ट्ये. त्यामुळे त्यांनी संगीत दिलेल्या गाण्यांचे शब्द लक्षात राहिले नाहीत, असे होत नाही. किंबहुना गाण्यातील भावना व शब्द रसिकांपर्यंत नीट पोहोचावेत, असाच त्यांचा प्रयत्न असायचा. त्यांनी संगीत दिलेल्या ‘शगुन’ चित्रपटातील ‘तुम अपना रंज-ओ-गम, अपनी परेशानी मुझे दे दो’ हे गाणे तर खूपच गाजले. खय्याम साहेबांच्या पत्नी जगजीत कौर यांनी ते गायले होते.

खय्याम साहेबांना संगीताखेरीज आणखी एक आवड होती, ती म्हणजे गप्पा मारायची. गप्पांत ते अनेक आठवणी सांगत, एखाद्या गीताचे संगीत कसे सुचले, ते सांगत. फोनवर असो की समोरासमोर बसलेले असो, ते गप्पांमध्ये रंगून जात. त्यांना फिल्मफेअरचे अनेक पुरस्कार मिळाले, संगीत नाटक अकादमीने त्यांचा गौरव केला आणि ^‘पद्मभूषण’ किताबही त्यांना मिळाला; पण खय्याम प्रसिद्धीच्या मागे मात्र धावले नाहीत. मी ओळखला जातो संगीतकार म्हणून. त्यामुळे मी नव्हे, तर माझे संगीतच बोलते, असे ते म्हणत. त्यांनी चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून आपली सारी संपत्ती ट्रस्टला दिली होती. आपण व पत्नी यांचे फार आयुष्य शिल्लक नाही, हे ते ओळखून होते. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील गरजू तंत्रज्ञ व कलाकार यांना त्या ट्रस्टद्वारे ते मदत करीत. चित्रपटांतून आलेला पैसा त्यांनी पुन्हा चित्रपटांसाठीच दिला, असे म्हणता येईल.

Web Title: You see, we have to be separated from you!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.