तुम्ही तरी पुढे जा, नाहीतर दुसऱ्याला रस्ता द्या! ममता बॅनर्जींचा भाजपशी गुप्त समझोता?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 08:34 AM2022-08-03T08:34:11+5:302022-08-03T08:34:27+5:30

प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बदलत्या भूमिकांबाबत डेरेक ओ’ब्रायन यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेला संवाद.

You should go ahead, otherwise give way to someone else! Darek Obrayan on Voice President Election | तुम्ही तरी पुढे जा, नाहीतर दुसऱ्याला रस्ता द्या! ममता बॅनर्जींचा भाजपशी गुप्त समझोता?

तुम्ही तरी पुढे जा, नाहीतर दुसऱ्याला रस्ता द्या! ममता बॅनर्जींचा भाजपशी गुप्त समझोता?

Next

- डेरेक ओ’ब्रायन

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी उमेदवाराला मत न देणे हे सत्तापक्षाचे अप्रत्यक्ष समर्थन नाही का? 
वैचारिक पातळीवरून तर जाऊच द्या; व्यावहारिक स्तरावरही तृणमूल काँग्रेसने भाजपशी कधीही समझोता केलेला नाही. आमचा पूर्वेतिहास हेच सांगेल. खरे तर हा प्रश्नच गैरलागू आहे. एनडीएचे उमेदवार जयदीप धनखड यांचे ते पश्चिम बंगालचे राज्यपाल असताना तृणमूल काँग्रेसशी कसे नाते होते, ते जगजाहीर आहे. त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा देणे अशक्यच आहे.

मग मार्गारेट अल्वा यांनी असे काय केले की आपण त्यांनाही पाठिंबा दिला नाही? 
आम्ही अल्वा यांचा आदर करतो. ममतादीदींचे त्यांच्याशी सलोख्याचे नाते आहे; परंतु काँग्रेस ज्या प्रकारचे राजकारण करीत आहे, त्याला आमचा विरोध आहे. संसदेत आम्ही विरोधी पक्षांमधला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा संसदीय पक्ष आहोत. विरोधी पक्षाचा उमेदवार ठरवताना आमचे म्हणणे समजून घेतले गेले नाही. आम्हाला त्यांच्या उमेदवारीबद्दल केवळ माहिती दिली गेली. हे कसे चालेल? 

काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, सोनिया गांधी यांनी स्वतः दोनदा ममता बॅनर्जी यांच्याशी बोलणे केले होते. शरद पवार यांनीही त्यांच्याशी सल्लामसलत केली होती. मग अडचण कोठे आहे?
विरोधी पक्षाचे उमेदवार कोण आहेत, हे आम्हाला केवळ पंधरा मिनिटे आधी सांगण्यात आले होते. कुठलाही सल्ला घेतला गेला नव्हता. 

तृणमूल काँग्रेसला आपला सन्मान विरोधी पक्षांच्या एकतेपेक्षा मोठा वाटतो का? 
काँग्रेसला विरोधी पक्षांचे नेतृत्व करायचे आहे; परंतु इतरांना  बरोबरीचा दर्जा द्यायची त्यांची इच्छा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय जनता दलासारखे पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ‘यूपीए’चा भाग आहेत. त्यांच्याशी त्यांनी हवा तसा व्यवहार करावा; परंतु तृणमूल काँग्रेस आघाडीमध्ये नाही; म्हणून विरोधी पक्षांमध्ये आमचा वेगळा दर्जा आहे. हीच गोष्ट आम्ही काँग्रेसला सांगू इच्छितो.

भाजपशी आपला काही गुप्त समझोता झाला आहे का? जगदीश धनखड यांना विरोध असतानाही ममता बॅनर्जी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सर्मा यांच्या उपस्थितीत दार्जीलिंगमध्ये त्यांच्याशी बोलणे केले. त्याचा काय अर्थ? 
एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चहा घेणे म्हणजे गुप्त समझोत्याचा संकेत असतो का? जगदीश धनखड पश्चिम बंगाल सोडून जात होते आणि दार्जिलिंग पश्चिम बंगालचा भाग आहे. निरोपाच्या मुलाखतीचा वेगळा अर्थ काढता कामा नये. तृणमूल काँग्रेस कधीच भाजपशी कुठल्याही प्रकारच्या समझोत्याचा विचारही करू शकत नाही.

काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेत असफल होत आहे, असा याचा अर्थ घ्यायचा का? 
संकेतांनी विरोध होत नाही आणि केवळ पत्रकबाजीनेही होत नाही. काँग्रेस पक्ष जनतेशी जोडलेल्या मुद्द्यांवर सरकारला पिंजऱ्यात उभे करण्यात असफल ठरत आहे. मग तो महागाईचा मुद्दा असो वा बेरोजगारीचा. माध्यमांचे स्वातंत्र्य असो वा संस्थांची स्वायत्तता. ती संपवून टाकण्याचा नेतृत्वाचा एकच नियम असतो: एक तर तुम्ही पुढे जा किंवा दुसऱ्याला रस्ता मोकळा करून द्या.

विरोधी पक्षांमध्ये आपापसांत चाललेली लढाई सत्तारूढ पक्षासाठी शुभसंकेत नाही का? आपण भाजपचा रस्ता सोपा करता आहात.. 
अजिबात नाही. मी पुन्हा सांगतो, आपण तृणमूल काँग्रेसचा पूर्वेतिहास पहा. संसदेच्या सभागृहात आणि बाहेर रस्त्यावर भाजपचा सर्वाधिक कडवा विरोध तृणमूल काँग्रेसच करीत आहे. आम्ही त्यांना केवळ निवडणुकीत  वारंवार हरवलेले नाही, तर त्यांची  जनतेच्या विरुद्ध असलेली पोकळ धोरणेही उघड केली आहेत.

Web Title: You should go ahead, otherwise give way to someone else! Darek Obrayan on Voice President Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.