आपला माणूस...

By admin | Published: June 6, 2016 01:49 AM2016-06-06T01:49:40+5:302016-06-06T01:52:26+5:30

सरावाच्या प्रत्येक क्षणाचा मी धिक्कार करत असे; परंतु त्याच वेळेस मी माझ्या मनाला समजावत असे, माघार घेऊ नको.. आता कष्ट कर आणि नंतर आयुष्यभर चॅम्पियनसारखा जग

Your man ... | आपला माणूस...

आपला माणूस...

Next

सरावाच्या प्रत्येक क्षणाचा मी धिक्कार करत असे; परंतु त्याच वेळेस मी माझ्या मनाला समजावत असे, माघार घेऊ नको.. आता कष्ट कर आणि नंतर आयुष्यभर चॅम्पियनसारखा जग.. हे शब्द आहेत वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर महंमद अलीचे. बॉक्सिंगच नाही, तर आपल्या समाजसेवी वृत्तीमुळेही सर्व जगात लोकप्रिय झालेल्या महंमद अलीने अखेर एक्झिट घेतली. अलीच्या चाहत्यांच्या यादीमध्ये तिबेटचे दलाई लामा, क्युबाचे फिडेल कॅस्ट्रो, युगांडाचा इदी अमिन, इराकचा सद्दाम हुसेन एकाच वेळेस असणे हा योगायोग नसून ती त्याने लोकांच्या मनावर आपल्या वागण्याने केलेल्या गारुडाची पावती होती. शांततेसाठी त्याने केलेले प्रयत्न, त्याचे विचार, रोगनिवारण आणि संशोधनासाठी निधी संकलन, युद्धविरोधी भूमिका अशा विविध कारणांनी महंमद अलीने आपले वेगळेपण सिद्ध केले होते. केवळ खेळाडू म्हणूनच नव्हे, तर अन्यायाच्या विरोधात उभे राहून, अन्यायाविरोधात लढायला शिकवणारा तो सर्वात लोकप्रिय असा माणूसही होता. महंमद अली केवळ महंमद अली द ग्रेटेस्ट, आफ्रिकन-अमेरिकन मुष्टियोद्धा नव्हता तर तो सर्वांचा होता, असे कवयित्री माया अँग्लोउ यांनीच त्याचे वर्णन केले होते. महंमद अलीचा प्रभाव सर्वदूर होता असे त्यांनी ‘महंमद अली : थ्रू द आईज आॅफ द वर्ल्ड’ पुस्तकात लिहिले होते.
व्हिएतनाम युद्धाच्या काळात लष्करात भरतीस साफ नकार दिल्यामुळे अमेरिकेतील अनेक राज्यांचा विरोध अलीला सहन करावा लागला. वृत्तपत्राचे रकानेच्या रकाने भरून त्याच्यावर टीका झाली; मात्र त्याने आपला तात्त्विक विरोध मागे घेतला नाही. त्यामुळे त्याचा बॉक्सिंगचा परवानाही रद्द करण्यात आला होता. असे अनेक धक्के पचवत त्याने स्वत:चे आयुष्य घडवले. १९६४, १९७४ आणि १९७८ असा तीनवेळा विश्व चॅम्पियनचा किताबही त्याने मिळवला. तुमची कोणत्या शब्दांमध्ये आठवण ठेवली जावी असे त्यास विचारले तेव्हा तो म्हणायचा, मी असा माणूस आहे की ज्याने कधीच आपल्या लोकांचा सौदा केला नाही, किंवा मला सरळ एक चांगला बॉक्सर होता असे म्हटले तरी चालेल, मला सुंदर म्हटले नाही तरी मला वाईट वाटणार नाही. इतक्या उच्च विचारांसह, स्वत:च्या तत्त्वासह जगणाऱ्या अलीला कंपवात आणि श्वसनविकारामुळे जगाचा निरोप घ्यावा लागला तरी तो सतत प्रेरणास्रोत म्हणून आपल्यातच राहील.

Web Title: Your man ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.