अपना भी टाईम आयेगा !

By सचिन जवळकोटे | Published: February 24, 2019 10:10 AM2019-02-24T10:10:48+5:302019-02-24T10:14:43+5:30

रक्ताळलेल्या पाठींना पुन्हा खंजिरांची आपुलकी

Your time will come! | अपना भी टाईम आयेगा !

अपना भी टाईम आयेगा !

googlenewsNext

 लगाव बत्ती
- सचिन जवळकोटे

थोरल्या काकांच्या एका इशाºयावर अकलूजकरांनी केवळ आपली खासदारकीच नव्हे तर अख्ख्या घराण्याचं राजकीय भवितव्यही बारामतीकरांच्या चरणी अर्पण केलं, याला म्हणतात हतबलता. वाºयानंही लाजून चूर व्हावं इतक्या वेगानं संजयमामा निमगावकरांनी फिरविली आपली राजकीय पाठ. याला म्हणतात व्यावहारिक चतुरता. ‘दादा अन् मामां’च्या जीवावर माढ्याची निवडणूक जिंकण्याची स्वप्नं पाहणाºया सुभाषबापू अँड टीमला ताकदीचा उमेदवार मिळू शकला नाही. याला म्हणतात स्वप्नरंजनाची अगतिकता. तरीही प्रत्येकजण म्हणतोय, ‘अपना भी टाईम आयेगाऽऽ’


...म्हणून लोकसभेची तयारी !
 सुगीच्या दिवसात हुश्शार शेतकरी भरल्या पिकात बुजगावण्याचा करून घेतो वापर. अगदी तस्साऽऽच प्रकार लोधवडेकरांच्या बाबतीत झाला. थोरले काका बारामतीकरांचं नाव सांगून ते अख्खा मतदारसंघ फिरले. गावोगावच्या कार्यकर्त्यांची मानसिकता टिपून त्याचा रिपोर्ट त्यांनी बारामतीकरांना सादर केला. काही दशकात त्यांनी हेच काम प्रामाणिकपणे केलं होतं, हा भाग वेगळा. मात्र, या अहवालातलं गांभीर्य ओळखून थोरल्या काकांनी नेम लावला. एका दगडात किमान चार-पाच पक्षी खाली पडत नाहीत तोपर्यंत ते दगड उचलत नाहीत म्हणे...इथंही तसंच झालं. अकलूजकरांसोबत निमगावकरांनाही त्यांनी शांत केलं. प्रभाकर लोधवडेकरांचीही रोजची दगदग थांबविली. निकालानंतर यदाकदाचित त्रिशंकू अवस्था निर्माण झाली तर ‘भावी पंतप्रधान’ म्हणून चर्चेला वाव देण्यासाठी राज्यसभेऐवजी लोकसभेची सोय झाली. नेहमीप्रमाणं याहीवेळी मनासारखं घडलं नाहीतर किमानपक्षी ‘कृषीमंत्री’ पद तर मुकणार नाही, याचीही शाश्वती बाळगण्याची परिस्थिती निर्माण केली. 
एक खेळी...


..अनेक बळी !
 ...परंतु बारामतीकरांच्या एका खेळीत किती जणांचा राजकीय बळी गेला? थोरले दादा अकलूजकर अडीच महिन्यानंतर ‘माजी खासदार’ म्हणून ओळखले जाणार. अकलूजकरांना पाडून जिल्हाभर आपली ताकद दाखविण्यासाठी आसुसलेल्या संजयमामांवर आता ‘घड्याळ घ्या घड्याळ’ म्हणत माढा-करमाळ्यात फिरण्याची वेळ आली. गेल्या विधानसभेला त्यांच्या स्वत:च्या निमगावात घड्याळाला बोटावर मोजण्या इतकी मतं मिळालेली. आता लोकसभेला पुन्हा इथं ते ‘घड्याळ’ वाजवतील,  तेव्हा पुढच्या विधानसभेला याच चिन्हाला  नको कसं म्हणतील ? गोची...भलतीच गोची...


सुशीलकुमार माढ्यात...
...तर बारामतीकर सोलापुरात !
 खरंतर बारामतीकरांची इच्छा नव्हतीच. केवळ सोलापूर जिल्ह्याचा खूपच आग्रह (!) झाल्यामुळे म्हणे त्यांनी इथं उभारण्याचा निर्णय घेतला. त्याचा एक मोठा इफेक्ट झाला. वर्षानुवर्षे एकमेकांवर खंजीर उगारणारे हात अकस्मातपणे गळ्यात पडले. रक्ताळलेल्या पाठींना धारदार खंजिरांची उगाचंच आपुलकी वाटू लागली. अकलूजमधल्या पाटलांचा वाडा निमगावातल्या शिंदेंच्या गढीत पाहुणचारासाठी पोहोचला. पंगती झडल्या. खाल्ल्या मिठाला जगण्याच्या शपथाही घेतल्या गेल्या. राहता राहिला विषय संजयमामांचा. ते कुणाच्या मिठाला जागणार याचा शोध म्हणे अद्याप त्यांनाच लागला नाही. जाऊ द्या सोडा. देशमुख मालकांचं मीठच अळणी.
( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Your time will come!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.