तरुणांच्या आत्महत्या वाढल्या, कारण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2023 08:30 AM2023-12-27T08:30:05+5:302023-12-27T08:32:13+5:30
इथे काहीही शक्य आहे, हे आपण अनेकदा सिद्ध केले. आता तरुणांना वाचवण्यासाठी ‘आत्महत्या निर्मूलन’ मनावर घेण्याची वेळ आली आहे!
डॉ. सुनील कुटे, अधिष्ठाता, क. का. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक
विश्वगुरु बनण्याचे स्वप्न पाहणारा व तीन ते पाच ट्रिलीयनच्या अर्थव्यवस्थेचा पल्ला गाठण्याचे ध्येय समोर असलेला आपला देश जगात तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. भारताचे सरासरी वय २९ वर्षे असून, ५० टक्के लोकसंख्येचे वय २५ पेक्षा कमी तर ६५ टक्के लोकसंख्येचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी आहे. भविष्यातील स्वप्न व उद्दिष्टे पूर्ण करण्याचे सामर्थ्य ज्यांच्यात आहे ते तरुण इतक्या मोठ्या संख्येने असणे हे कोणत्याही देशाचे बलस्थान! पण अलीकडेच प्रसिद्ध झालेला राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचा अहवाल व त्यातील तरुणांच्या आत्महत्येचे वाढते प्रमाण या बलस्थानालाच नख लावणारे आहे.
२०२२ मध्ये देशात एक लाख सत्तर हजार आत्महत्या नोंदल्या गेल्या. हे प्रमाण २०२१ पेक्षा ४.२ टक्क्यांनी अधिक आहे. यातील २६.४ टक्के आत्त्महत्या रोजंदारी स्वरूपाचे काम करणाऱ्या तर ९.२ टक्के बेरोजगार युवकांच्या आहेत. २०२२ या केवळ एक वर्षात १२,००० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा काकणभर अधिक आहे हे विशेष लक्षणीय. परीक्षांमधील अपयशामुळे आत्महत्या करणाऱ्यांचे वय १८ पेक्षा कमी आहे. प्रगत महाराष्ट्राचा क्रमांक या आत्महत्यांच्या बाबतीत पहिला आहे; त्या खालोखाल तामिळनाडू, मध्य प्रदेश व कर्नाटकचा क्रमांक लागतो.
कोणतीही आत्महत्या हा भावनांच्या उद्रेकाचा जीवघेणा क्षणिक कल्लोळ असला तरी या टप्प्यापर्यंत पोहचण्याची एक दीर्घ प्रक्रिया असते. आज आत्महत्त्या करणारे युवक हे २००० च्या आसपास जन्माला आलेल्या जनरेशन झेडचे प्रतिनिधी आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मल्याने स्वातंत्र्यलढा, त्याग, बलिदान, देशप्रेम व विचारसरणी याबद्दलची त्यांची जडणघडण वेगळ्या कालखंडात झालेली आहे. त्यांचे वाचन, दृष्टिकोन, वैचारिक बैठक, सहनशक्तीची मर्यादा, संस्कार, मूल्य, देशप्रेमाच्या संकल्पना, पैशांबद्दलचे विचार, करिअरबद्दलच्या कल्पना मागच्या पिढीपेक्षा वेगळ्या आहेत. मोबाइल व संगणक यांचा वापर, ५ जी, ७ जी, इंटरनेट, समाजमाध्यमांचा विळखा, व्हाॅट्स ॲप विद्यापीठाचे आक्रमण व यातून निर्माण झालेली उथळ विचारशैली हा एक महत्त्वाचा घटक आहे.
बदललेल्या जीवनशैलीत पालकांचा मुलांशी तुटलेला संवाद, तरुण पिढीला आलेले एकाकीपण, औदासीन्य व नैराश्य, विद्यार्थ्यांकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा, परीक्षेतील जीवघेण्या स्पर्धा, शिक्षण संपल्यानंतर त्याच्या कुचकामीपणाची झालेली जाणीव व त्याची बेरोजगारीत झालेली परिणीती, वाढते वय, सुमार वेतन व भरमसाठ अपेक्षा यांचा व्यत्यास, ज्ञान आणि कौशल्याचा एकीकडे अभाव तर दुसरीकडे नोकरीतील न झेपणारी उद्दिष्टे व ती साधता न आल्याने क्षणाक्षणाला वाढत जाणारे ताणतणाव यांमुळे आजची तरुणपिढी हैराण आहे. समोर उभ्या आव्हानांचा धीटपणे सामना करण्याऐवजी मृत्यूला कवटाळणे त्यांना अधिक सुसह्य वाटते, हे आपल्या देशाला परवडणारे नाही.
सर्वांत प्रथम प्राथमिक उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर समुपदेशन केंद्र, सुसंवाद केंद्र, ऐकून घेण्याची व्यवस्था उभी करणे आवश्यक आहे. मध्यंतरी लडाखच्या प्रवासात मुख्य बाजारपेठेत एक तरुणी हातात एक फलक घेऊन उभी दिसली. त्यावर ‘तुम्हाला मन मोकळं करायचं आहे का?’ अशा आशयाचा मजकूर होता. तिच्याशी बोलल्यावर कळले, एक सामाजिक काम म्हणून दररोज ती दोन तास या उपक्रमासाठी देते. अनेक लोक तिच्याजवळ मन मोकळं करतात. त्यांचा पुढचा टप्पा म्हणून सुसंवाद सुरू होतो. तिच्यापासून प्रेरणा घेऊन इतरही काही तरुण-तरुणी या कामात सहभागी झाले आहेत. अशा व्यक्ती, संस्था व केंद्रांची निर्मिती केल्यास एक प्रगल्भ समुपदेशन व्यवस्था उभी करता येईल.
विशेषत: २००० सालानंतर आई-वडील झालेल्यांसाठी प्रशिक्षण वर्ग व समुपदेशनाची गरज खरेतर युवकांपेक्षा जास्त आहे. बालपणापासून वाचनाची गोडी लावली तर नवीन पिढीच्या मनाची मशागत चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. शाळांचे ग्रंथपाल या महत्त्वाची भूमिका बजावू शकतील. धार्मिकतेच्या पलीकडे जाऊन नागरिकशास्त्रावर आधारित संस्कार केंद्रांची व्यवस्थाही गरजेची आहे. सांस्कृतिक पोलिसगिरी करण्यापेक्षा अशी संस्कार केंद्रे उपयुक्त ठरतील.
जिल्हा उद्योग केंद्रांच्या माध्यामातून बेरोजगार युवकांना रोजगार निर्मितीक्षम कौशल्ये व त्यांचे शिक्षण देणे आवश्यक आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या मासिक बैठकांतून असे प्रशिक्षण रोजगारनिर्मितीत किती रूपांतरीत झाले याचा आढावा घेतल्यास रिकामे हात रिकाम्या मनाला बळ देतील. मोठ्या कंपन्यांना सामाजिक कामासाठी योगदान द्यावे लागते, त्याप्रमाणे प्रत्येक देवस्थानाला रोजगारनिर्मितीसाठी विशिष्ट निधी देणे बंधनकारक करावे. ग्रामीण भागातील तरुणांचे काही प्रश्न वेगळे आहेत. कृषी प्रधान देशात कृषी प्रधान रोजगार निर्मितीकडे देशाचे प्रचंड दुर्लक्ष झाले आहे. यावर वेगळे काम होण्याची गरज आहे.
पोलिओ निर्मूलन, देवी व क्षयरोग निर्मूलन, कोविड लस देण्याची देशव्यापी उद्दिष्टपूर्ती अशा घटनांतून देशाने मनावर घेतले तर काहीही शक्य आहे, हे सिद्ध होते. आता ‘आत्महत्या निर्मूलन’ मनावर घेणे गरजेचे आहे! sunil_kute@rediffmail.com