पन्नाशीतला युसूफ डिकेक इतका ‘हॉट’ का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2024 08:19 AM2024-08-03T08:19:34+5:302024-08-03T08:20:02+5:30

युसूफच्या या जिद्दी प्रवासानं उद्योगपती आनंद महिंद्राही भारावले.

yusuf dikec success in paris olympic 2024 | पन्नाशीतला युसूफ डिकेक इतका ‘हॉट’ का?

पन्नाशीतला युसूफ डिकेक इतका ‘हॉट’ का?

कुठलाही खेळ साधा, सोपा नसतो. त्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात, पराकोटीची एकाग्रता लागते, त्यासाठी वाहून घ्यावं लागतं, दिवसामागून दिवस, महिन्यांमागून महिने आणि काही वेळा तर वर्षांमागून वर्षं... त्याच एका ध्यासापोटी इतर साऱ्या गोष्टी विसरून जाव्या लागतात. ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांपर्यंत पोहोचायचं आणि पदक मिळवायचं ही तर महाकठीण गोष्ट. सध्या पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिकच्या महाकुंभमेळ्यात अशाच अतिरथी-महारथींचा परिचय जगाला होतो आहे. 

यातले अनेक खेळाडू तर असे आहेत, जे आजपर्यंत जगाला माहीत नव्हते, अनेकजण अत्यंत मेहनतीनं, काबाडकष्ट करून इथवर पोहोचले आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना त्यांनी पदकं मिळवून जगाला अचंबित केलं.. अशाच एका अनोख्या खेळाडूची चर्चा सध्या जगभरात होते आहे. तुर्कीच्या या खेळाडूचं नाव आहे युसूफ डिकेक. आपल्या पराक्रमानं, त्याहीपेक्षा आपल्या साधेपणानं आणि आपल्यापेक्षा कितीतरी तरुण असलेल्यांना मात देत ज्या सहजपणानं त्यानं पदक जिंकलं त्याकडे अख्खं जग विस्मयानं बघतं आहे. 

मुळात कोणत्याही खेळासाठी एक वय असतं. अर्थात इच्छाशक्ती आणि आवड असली तर कोणत्याही वयात कोणताही खेळ तुम्ही खेळूच शकता; पण ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये वय हा बऱ्याचदा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरतोच ठरतो. कारण वयानुसार तुमच्या क्षमता नैसर्गिकपणे कमी होतात, तरुण रक्ताच्या प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देणं अतिशय अवघड होऊन जातं. त्यामुळेच शरीर-मनाची परीक्षा पाहणाऱ्या ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांतून अनेकजण पंचविशी-तिशीतूनच बाद, ‘निवृत्त’ होतात.. अर्थात त्यालाही काही सन्माननीय अपवाद असतात, त्यातलाच एक अपवाद म्हणजे तुर्कीचा हा खेळाडू युसूफ डिकेक!
वयाच्या ५१व्या वर्षी तुर्कीच्या या जिद्दी खेळाडूनं ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला. त्याचा खेळही कोणता? - तर शूटिंग ! या खेळासाठी पराकोटीची एकाग्रता, नियमितता आणि मानसिक कणखरता लागते. वेगवेगळ्या आधुनिक उपकरणांचीही साथ त्यासाठी घ्यावी लागते. दहा मीटर शूटिंग मिक्स्ड इव्हेंटमध्ये त्यानं आपली जोडीदार सेव्वल लायदासह या स्पर्धेत भाग घेतला आणि अगदी सहजपणे ऑलिम्पिकचं रजत पदक आपल्या खिशात घातलं. 

वयाच्या ५१व्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणं ही तोंडाची गोष्ट नाही. या स्पर्धेत भल्याभल्यांची भंबेरी उडत असताना, ज्या आत्मविश्वासानं युसूफनं रजत पदक जिंकलं ते अतिशय कौतुकास्पद तर आहेच; पण त्याहीपेक्षा ज्या सहजतेनं, एखाद्या ‘सर्वसामान्य’ खेळाडूप्रमाणे त्यानं या स्पर्धेत सहभाग घेतला, त्यावरून जगभरात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आवाज, वारा, गोंगाट तसेच इतर बाह्य गोष्टींचा त्रास होऊ नये म्हणून शूटिंग हा खेळ खेळणारे अनेक खेळाडू अत्याधुनिक उपकरणांचा आधार घेतात. अनेकजण डोळ्यांना स्पेशल लेन्सेस लावतात, आयकव्हर वापरतात, इअर प्रोटेक्शन घालतात, लक्ष्य विचलित होऊ नये म्हणून विविध उपकरणं वापरतात; पण यातल्या कोणत्याही उपकरणांचा वापर न करता युसूफ या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाला. अगदी प्राथमिक फेऱ्यांमध्येही त्यानं कोणतीही उपकरणं वापरली नाहीत. त्याच्या डोळ्यांवर होता तो केवळ त्याचा चष्मा. बास्स!

याशिवाय जगभरातल्या अनेक क्रीडाचाहत्यांना आवडली ती युसूफची हटके स्टाइल ! पिकलेले केस, डोळ्यांवर नजरेचा चष्मा, अंगात आपल्या देशाचं नाव अभिमानानं मिरवणारा ढगळ टी शर्ट, पँट, डावा हात खिशात आणि उजव्या हातात पिस्टल ! सहजतेनं त्यानं लक्ष्याचा वेध घेतला आणि आपल्या जोडीदारासह आपल्या देशाला रजत पदक मिळवून दिलं!

युसूफचं हे पहिलंच ऑलिम्पिक पदक असलं तरी ऑलिम्पिक त्याच्यासाठी नवं नाही. यंदाची त्याची तब्बल पाचवी ऑलिम्पिक स्पर्धा ! प्रत्येक वेळी या स्पर्धेतून त्याला हात हलवत परत जावं लागलं; पण तो ना नाउमेद झाला, ना त्यानं जिद्द सोडली, ना स्वत:वरचा विश्वास गमावला. त्यानं प्रत्येक वेळी अधिकाधिक कठोर तपश्चर्या केली, आपल्या कमतरता शोधून काढल्या, त्यावर मात केली आणि यावेळी त्याचं फळ त्याला मिळालं.

१६ वर्षे, पाच ऑलिम्पिक!

युसूफनं पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला तो २००८च्या ऑलिम्पिकमध्ये. तेव्हापासून दर ऑलिम्पिकमध्ये तो भाग घेतो आहे. तब्बल १६ वर्षे झाली, तो लढतोच आहे. त्याच्या या अनोख्या लढाईमुळे केवळ तुर्कीच्या जनतेचाच नव्हे, तर अख्ख्या जगासाठी तो हिरो झाला आहे. तरुणाईनं तर त्याला डोक्यावर घेतलं आहे. युसूफच्या या जिद्दी प्रवासानं उद्योगपती आनंद महिंद्राही भारावले. सोशल मीडिया साइट ‘एक्स’वर युसूफचं कौतुक करण्यापासून स्वत:ला ते रोखू शकले नाहीत!

 

Web Title: yusuf dikec success in paris olympic 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.