युतीचा कल्याण पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 04:05 AM2018-05-11T04:05:33+5:302018-05-11T04:05:33+5:30
उल्हासनगरच्या सत्तेतील सध्याच्या मित्रांना वठणीवर आणण्यासाठी भाजपाला शिवसेनेची मदत हवी असल्याने त्या बदल्यात भाजपा नेत्यांनी कल्याण-डोंबिवलीचे महापौरपद सोडले, तेव्हाच ते शिवसेनेला मिळणार आणि ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित होते. तशी ती पारही पडली.
उल्हासनगरच्या सत्तेतील सध्याच्या मित्रांना वठणीवर आणण्यासाठी भाजपाला शिवसेनेची मदत हवी असल्याने त्या बदल्यात भाजपा नेत्यांनी कल्याण-डोंबिवलीचे महापौरपद सोडले, तेव्हाच ते शिवसेनेला मिळणार आणि ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित होते. तशी ती पारही पडली. पण ज्या आगरी कार्डाभोवती कल्याण-डोंबिवलीचे राजकारण फिरते आहे, त्या समाजाला हे पद न मिळाल्याने निवडणुकीला बाचाबाचीचे लागलेले गालबोट हे तेथील सत्तेची भाकरी वेगवेगळ्या समाजांत फिरवण्याची किती गरज आहे ते दाखवून देणारी आहे. कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणाने जसा युतीतील बेबनाव राज्याला दाखवून दिला; तसेच एकमेकांच्या जबड्यात हात घालण्याची आव्हाने देऊनही नंतर परस्परांवर कुरघोडी करत सुखाने सत्ताकारण कसे करता येते याचा वस्तुपाठही दिला. आताही पालघरच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा परस्परांविरोधात शड्डू ठोकून उभे राहिलेले असतानाही ही निवडणूक बिनविरोध पार पाडत दोन्ही पक्षांनी संयमाने प्रतिक्रिया दिल्या. याला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातील समन्वय जसा कारणीभूत आहे, तितकाच मुख्यमंत्र्यांच्या या दोन्ही नेत्यांशी जुळलेल्या सुरांचाही हा परिपाक आहे. कल्याण लोकसभा व शेजारच्या उल्हासनगर, अंबरनाथच्या विधानसभा मतदारसंघातील राजकारणाचेही पदर येथील घडामोडींना आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकांना वर्षभराचा कालावधी असला; तरी त्यासाठी आतला व बाहेरचा विरोध शमवणे, मित्र जोडणे, नाराजांना चुचकारण्याचे काम वर्षभर सुरू आहे. त्यामुळे स्थायी समितीचे सभापतीपद, महापौरपद, नगराध्यक्षपदाची आश्वासने देत इच्छुकांना संधीची कवाडे खुली करून दिली जात आहेत. लोकसभा-विधानसभेला युती झाली नाही; तरी आपला मार्ग निर्विघ्न व्हावा, याचे जे प्रयत्न सुरू आहेत त्याचेच प्रतिबिंब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पडताना दिसत आहेत. कल्याण-डोंबिवलीतील दोन विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे, एक त्यांच्या सहयोगी सदस्याकडे व एक शिवसेनेकडे आहे; तर कल्याणचा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. ठाणे व कल्याण या लोकसभा मतदारसंघांत तडजोडीचे दोन्ही पक्षांचे आतून प्रयत्नही सुरू आहेत; तशीच विधानसभेची आखणीही. त्यामुळेच उल्हासनगरमधील सत्तांतराच्या भाजपाच्या मागणीला शिवसेनेने सहकार्य करणे व त्या बदल्यात भाजपाने पक्षांतर्गत नाराजी सोसत कल्याण-डोंबिवलीचे महापौरपदही शिवसेनेला देणे या घडामोडी साध्या दिसत असल्या, तरी त्यामागे राजकीय तडजोडी दडलेल्या आहेत. पण डोंबिवली शहराला दशकभराने हे पद मिळणे व एकाचवेळी महापौर-उपमहापौरपदावर महिला विराजमान होणे हा योग यानिमित्ताने जुळला त्याचे कौतुक करायला हवे.