झेन कथा : तोंड उघडण्याआधी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 04:19 AM2020-09-18T04:19:58+5:302020-09-18T04:20:36+5:30
एका तळ्यामध्ये एक कासव राहात असे. त्याच तळ्यामध्ये रोज दोन हंस येत असत आणि बोलत असत एकमेकांशी. ते जगभर फिरत असायचे आणि अनेक उत्तम गोष्टी त्यांना बघायला मिळायच्या.
- धनंजय जोशी
माझे झेन गुरु नेहमी म्हणायचे, ‘ओपन माउथ इज आॅलरेडी अ मिस्टेक !’ समजायला जरा कठीण आहे, नाही का? यावरून एक गोष्ट आठवली.
एका तळ्यामध्ये एक कासव राहात असे. त्याच तळ्यामध्ये रोज दोन हंस येत असत आणि बोलत असत एकमेकांशी. ते जगभर फिरत असायचे आणि अनेक उत्तम गोष्टी त्यांना बघायला मिळायच्या. कासव त्या गोष्टी ऐकायचे आणि त्याला खूप वाईट वाटायचे. हंसांना त्याची दया आली आणि ते कासवाला म्हणाले, ‘असे दु:ख वाटून घेऊ नकोस. आम्ही तुला घेऊन जाऊ.’
- त्यांनी एक काठी आणली आणि ते म्हणाले कासवाला, ‘ही काठी धर तोंडामध्ये आणि आमच्याबरोबर चल. सुंदर विश्व बघत राहा.’ कासव आनंदाने निघाले आणि आकाशामधून त्याला सुंदर दृश्ये दिसू लागली. जाता जाता त्यांना जमिनीवर दोन मुले दिसली. ती मुले म्हणायला लागली, ‘अरे बघा ते हंस त्या कासवाला घेऊन चालले कसे !!’
कासवाने ते ऐकले. त्याला आश्चर्य वाटले आणि थोडा रागही आला. कासव मनात म्हणाले,
‘ह्या पोरांना धडा शिकवायला पाहिजे. हंस मला नेत नाहीत, मीच त्यांना नेतोय; सांगतोच त्यांना मी आता!’ - ते सांगण्यासाठी कासवाने तोंड उघडले आणि पुढे काय झाले हे सांगायला पाहिजे का?
प्रश्न असा की तोंड उघडणे हे कशामुळे? झेन गुरुंची पण एक काठी असते. ती काठी आणि ही हंसांची काठी एकच की वेगळी?
आता या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देणार कसे? तुम्ही तोंडात धरलेल्या काठीचे काय करणार तुम्ही?