राज्यातील सत्तांतराचा जिल्हा परिषद निवडणुकीवर मोठा परिणाम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 12:53 PM2019-12-26T12:53:37+5:302019-12-26T12:57:17+5:30

मिलिंद कुलकर्णी उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा राजकारणात रुढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपला बहुमत मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत ...

Zilla Parishad's ruling in the state has a big impact on elections! | राज्यातील सत्तांतराचा जिल्हा परिषद निवडणुकीवर मोठा परिणाम !

राज्यातील सत्तांतराचा जिल्हा परिषद निवडणुकीवर मोठा परिणाम !

Next

मिलिंद कुलकर्णी
उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा राजकारणात रुढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपला बहुमत मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमधील अनेक मातब्बरांचा भाजपकडे ओढा होता. ‘मेगाभरती’ म्हणून चर्चित ठरलेल्या ‘आयाराम अभियाना’चा भाजपला लाभ किती आणि तोटा किती याचा शोध आणि बोध आता संघटनमंत्र्यांच्या चिंतन बैठकांमध्ये सुरु असेल. त्याचे निष्कर्ष बाहेर येणार नसले तरी त्याची आवश्यकता देखील कुणाला उरलेली नाही, कारण राज्यात सत्तांतर झाल्याने आयारामांना ‘घरवापसी’चे वेध लागले आहेत, तर ‘आयारामां’मुळे अस्तित्वाला धक्का बसलेले ‘निष्ठावंत’ आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपला आणि नेत्यांना धडा शिकविण्याच्या बेतात असल्याचे चित्र नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात दिसून येत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा हे मोठे शहर. याठिकाणी पी.के.अण्णा पाटील यांचे अनेक वर्षे वर्चस्व होते. सहकार व शिक्षण क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. त्यांच्या पश्चात दीपक पाटील व मकरंद पाटील हे वारसा चालवित आहे. अण्णा हयात असताना त्यांचे काही विरोधक होते. त्यातील मोतीलाल फकीरा पाटील हे एक. त्यांचीही मोठी शिक्षणसंस्था आहे. भाजपा-शिवसेना युती सरकारच्या काळात शहादा पालिकेच्या निवडणुकीत भाजपाने ऐनवेळी मोतीलाल पाटील यांना लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात दीपक पाटील यांचे बंधू मकरंद पाटील हे काँग्रेसतर्फे रिंगणात उतरले. मोतीलाल पाटील यांना भाजप नेते डॉ.विजयकुमार गावीत यांचा पाठिंबा लाभला आणि ते विजयी झाले. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी दीपक पाटील हे भाजपमध्ये आले. आमदार राजेश पाडवी यांच्या विजयात त्यांचेही योगदान होते. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची सूत्रे त्यांच्याकडे जाणार हे उघड असताना मोतीलाल पाटील यांचे पूत्र आणि माजी जि.प.सदस्य अभिजित पाटील यांनी काँग्रेसची सूत्रे हाती घेतली. भाजपच्या दोन नेत्यांमधील हा संघर्ष पुन्हा एकदा टिपेला पोहोचलेला पाहायला मिळणार आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे निष्ठावंत डॉ.सुहास नटावदकर यांनी बंडखोरी केली होती. त्यांच्या समर्थनासाठी मैदानात उतरलेल्या माजी आमदार डॉ.नरेंद्र पाडवी यांच्या पत्नी आशा पाडवी यांनी या निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी स्विकारली आहे.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि माजी मंत्री जयकुमार रावल यांचे मामा जयपाल रावल व त्यांच्या पत्नी माजी जि.प.सदस्य ऐश्र्वर्या रावल यांनी तर या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचे ठरविले आहे. त्यांची ही भूमिका अनाकलनीय असली तरी भाजपसाठी हा मोठा धक्का आहे.
अशीच स्थिती धुळ्यात आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे दोन वेळा निवडणूक लढविणाऱ्या माजी महापौर मंजुुळा गावीत यांना साक्री मतदारसंघात ऐनवेळी तिकीट नाकारण्यात आले. त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी केली आणि त्यांना काँग्रेसचे माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार योगेश भोये यांनी पाठिंबा दिला. तिरंगी लढतीत गावीत निवडून आल्या. त्यांनी भाजपऐवजी शिवसेनेला पाठिंबा दिला. आणि आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही त्यांनी रस घेतला आहे. याठिकाणी भाजपला मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागेल, असे चित्र आहे. खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्या वहिनी मंगला पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांचे पूत्र हर्षवर्धन हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. काँग्रेस, शिवसेना उमेदवारांशी त्यांची लढत आहे.
विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपमध्ये प्रवेश केलेले जि.प.चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे यांची लढत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्याशी होत आहे.
डॉ.सुभाष भामरे, जयकुमार रावल, अमरीशभाई पटेल यांना भाजपच्यादृष्टीने प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. या जिल्हा परिषदेवर पूर्वी भाजप-शिवसेनेची सत्ता एकदा आलेली होती. आता एकट्याच्या बळावर ते शक्य होते काय, याची उत्कंठा लागली आहे. उमेदवारी अर्जांच्या माघारीनंतर खºया अर्थाने चित्र आणि लढती स्पष्ट होतील.

Web Title: Zilla Parishad's ruling in the state has a big impact on elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.