झिंग... झिंग... झिंगाटामुळे होणारे मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 04:24 AM2019-03-05T04:24:15+5:302019-03-05T04:24:22+5:30
दारू हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. पण आपल्या शत्रूवरही प्रेम करा, अशी बायबलची शिकवण आहे.
- डॉ. एस. एस. मंठा
दारू हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. पण आपल्या शत्रूवरही प्रेम करा, अशी बायबलची शिकवण आहे. पुराणकाळापासून झिंग आणणाऱ्या दारूच्या मोहात माणूस पडत आला आहे. पण दारूमुळे माणसं मरत असतील तर त्याचा जाब कुणाला तरी द्यावाच लागेल. आसामच्या गोलाघाट येथील चहाच्या मळ्यात काम करणारे १५० मजूर हातभट्टीच्या दारूचे सेवन करून मरण पावल्याची घटना नुकतीच घडली. या शोकांतिकेचे स्वरूप फार भयानक आहे. त्या दारूमुळे बाधा झालेल्या ३५० हून अधिक लोकांना इस्पितळात भरती करावे लागले. त्याअगोदर दोन आठवड्यांपूर्वी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथेही बेकायदेशीरपणे तयार करण्यात आलेल्या गावठी दारूच्या सेवनाने १०० लोकांचा मृत्यू ओढवला होता! उच्च नैतिकता जपण्याच्या उद्देशाने दारूबंदीचे धोरण अमलात आणण्यात येते. पण त्यामुळे गरीब लोकच बाधित होतात. कारण दारूबंदीमुळे ते हातभट्टीची दारू चोरून पितात आणि प्राण गमावून बसतात.
हूच म्हणून ओळखली जाणारी देशी दारू कशी तयार करतात? मोठ्या पातेल्यात १० लीटर पाणी ओततात. त्यात पाच पौंड साखर घालतात. त्यात टमाटे घालून उकळतात. त्यानंतर ते टमाटे त्या पाण्यातच सडू देतात. तीन-चार दिवसांनी ते आंबतात. त्यामुळे पाण्यातील साखरेचे रूपांतर अल्कोहोलमध्ये होते. त्या दारूचा प्रभाव वाढावा म्हणून त्यात मेथानॉल टाकण्यात येते. पण हेच मेथानॉल माणसाला घातक ठरते. त्याचे प्रमाण जर जास्त झाले तर अंधत्व येऊ शकते किंवा माणसाला मृत्यू येऊ शकतो. चार मिलीलीटर मेथानॉल अंधत्व येण्यास कारणीभूत ठरते, तर ३० एमएल मेथानॉल मृत्यूला कारण ठरते. दारू तयार करण्याच्या प्रक्रियेत निर्माण होणारे अॅसीटोन आणि अल्डीहाइड्स हे अपंगत्व आणू शकते.
भारतातील ठिकठिकाणी चालणाऱ्या हातभट्ट्या या खरंच खूप धोकादायक आहेत. अधिक पैसे कमावण्याच्या लोभातून या हातभट्ट्यांतून भेसळयुक्त वस्तूंचा वापर केला जातो. कधी कधी मोटारीतील रेडिएटर्सचा वापरही करण्यात येतो. त्यातून तयार होणारे ग्लायकॉल हे अत्यंत धोकादायक रसायन असते. कारण रेडिएटरमधील जस्तामुळे हे द्रव्य विषारी होते. ते माणसाची मूत्रपिंडे निकामी करतात. तसेच त्यामुळे दृष्टिहीनता येऊ शकते.
बेकायदेशीरपणे चालविल्या जाणाºया हातभट्ट्यांच्या दुष्परिणामाविषयी येथे सांगितले. आता त्यावरील उपायांचीही चर्चा करू. मधुमेहाचा उपचार घेणाºया न्यूझीलंड येथील एका नागरिकाला व्होडका प्यायल्याने अंधत्व आले. त्यावर उपाय म्हणून डॉक्टरांनी त्यांना जॉनी वॉकर ब्लॅक लेबल व्हिस्की पिण्यास सांगितले. त्यामुळे त्या माणसाची गेलेली दृष्टी परत आली! मेथानॉलमुळे रक्तातील अॅसिडचे प्रमाण वाढते, जे आॅप्टिक नर्व्हसाठी धोकादायक असते. पण व्हिस्कीतील इथानॉलने मेथानॉलचे घातक परिणाम रोखण्यास मदत होते, म्हणून हे गुपित लोकांपर्यंत पोहोचवीत आहे!
अल्कोहोल व्यवसायापासून मिळणाºया उत्पन्नाला तिलांजली देणे कोणत्याही राज्याला शक्य होणार नाही. तसे केले तर अनेक कल्याणकारी योजनांवरही पाणी सोडावे लागेल. तेव्हा एका कल्याणाचा विचार करताना अनेकांचे अकल्याणही करणे कितपत योग्य ठरेल? भारतातील अल्कोहोल उद्योग हा जगातील तिसºया क्रमांकाचा मोठा उद्योग आहे. जगातले सर्वाधिक व्हिस्कीचे उत्पादन भारतात होते. एकट्या उत्तर प्रदेश राज्याला अल्कोहोलपासून ३५० बिलियन रुपयांचे उत्पन्न होते! महाराष्टÑात ते १००० बिलियन रुपये इतके आहे. अल्कोहोलच्या एकूण उत्पन्नातील ६० टक्के हिस्सा हा दक्षिण भारताचा आहे. मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात झालेल्या वाढीमुळे मद्य सेवनाचे प्रमाण वाढले आहे. २०२२ सालापर्यंत अल्कोहोलचा वापर १६.८० बिलियन लीटरपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. वाइन आणि व्होडका पिणाऱ्यांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. जगात व्हिस्कीचा जेवढा खप होतो त्यापैकी ६० टक्के खप एकट्या भारतात होतो. तेव्हा एवढ्या मोठ्या बाजारपेठेवर बंदी आणणे कसे शक्य आहे?
आता लोकसभेच्या निवडणुका होण्याच्या मार्गावर आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशाप्रमाणे दारूचा वापरही मोठ्या प्रमाणात होत असतो. दारू पिण्यासाठी कोणतेही कारण चालते. शेतकºयांना मिळणारी कर्जमाफी किंवा बेरोजगारांना मिळणारा बेकारी भत्ता यासारख्या गोष्टी फुकटात मिळणाºया असल्याने त्यांचा विनियोग कशाप्रकारे होईल हे सांगणे सहज शक्य आहे. राजकीय पक्ष राजकीय लाभासाठी दारूबंदीसारखे उपाय योजतात, पण त्यामुळेच परवानगीशिवाय दारू गाळण्याच्या व्यवसायाला ऊत येतो. अशा वेळी स्वस्तातल्या वस्तूंचा वापर करून अधिक नफा कमावण्याच्या मागे उत्पादक असतात.
बेकायदा दारूच्या उद्योगाने करचुकवेगिरीही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे हातभट्टीची दारू स्वस्तात पुरविणे शक्य होते, पण त्याचे परिणामही घातक होत असतात. त्यातूनच दारू पिऊन मृत्यूला सामोरे जाणाºयांच्या प्रमाणात वाढ होत आहे. मूर्खपणा करण्यासाठी
लागणारी सहनशीलता अल्कोहोलच्या सेवनाने मिळत असते, पण थोडासा मूर्खपणा फारसा घातक
नसतो. मोठ्या प्रमाणातील मूर्खपणा मात्र अक्षम्य असाच आहे!
(माजी चेअरमन, एआयसीटीई एडीजे, प्रोफेसर, एनआयएएस, बंगळुरू)