भाषेचा जांगडगुत्ता
By Admin | Published: August 26, 2016 06:54 AM2016-08-26T06:54:36+5:302016-08-26T06:54:36+5:30
नेत्रदीपक हा शब्द चुकीचा आहे असे जर मी म्हटले तर सगळे मराठी भाषाप्रेमी मला मारायला धावतील.
नेत्रदीपक हा शब्द चुकीचा आहे असे जर मी म्हटले तर सगळे मराठी भाषाप्रेमी मला मारायला धावतील. व्याकरणाच्या नियमानुसार नेत्र आणि दीपक या दोन शब्दांची संधी नेत्रोद्दीपक अशी होते पण असे असले तरी
गेली किमान पंचवीस वर्षे हा शब्द चुकीच्या पद्धतीने लिहिला बोलला जात आहे.
एखादी चूक माणूस सतत करायला लागला की तिचे नियमात रूपांतर होते, या न्यायाने हा रोग जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत बळावला असून अयोग्य जीवनपद्धती हीच योग्य जीवनपद्धती ठरू लागली आहे. योग्य आणि अयोग्य या शब्दांच्या व्याख्याही सापेक्ष झाल्या आहेत. जगणे आपल्या सोयीच्या अंगाने वळवून आपापल्या इच्छेनुसार प्रत्येकजण कालक्रमणा करीत आहे. जगण्याची दिशा शक्य तेवढी सोपी, बिनकष्टाची आणि मनोरंजनाकडे घेऊन जाणारी
आहे. ज्याना याची चिंता वाटते ते म्हणतात, जगण्याचे सुमारीकरण, सपाटीकरण सुरू आहे, चंगळवाद बोकाळला आहे.
या परिस्थितीला तोंड देण्याचे दोन मार्ग दिसतात. एक म्हणजे विरोध करून मोडून पडण्याची तयारी ठेवणे किंवा जनांचा प्रवाहो चालला म्हणत त्यात सामील होणे. गर्व आणि अभिमान या दोन शब्दांना दोन वेगवेगळे अर्थ
आहेत. ‘गर्व से कहो हम हिंदू है’, हे हिंदीत ठीक आहे पण, ‘गर्व आहे मला मी मराठी असल्याचा’ असे म्हटले की घोटाळा सुरू होतो. तिथे अभिमान हाच शब्द हवा. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमाचा नायक एका प्रसंगात छाती ठोकत, हो हो
मला गर्व आहे मी मराठी असल्याचा असे म्हणतो तेव्हा त्याने आधी मराठी भाषा नीट बोलायला शिकले पाहिजे असा विचार मनात येतो. त्याला अभिमान असे म्हणायचे असावे
अशी मनातल्या मनात दुरूस्ती करत सुजाण प्रेक्षक पुढील सिनेमा पाहू लागतो.
पीएच.डी.साठी प्रबंध लिहायचा असेल तर एक मोठा कालखंड अभ्यासासाठी घ्यावा लागतो. मराठी भाषेची अधोगती हा विषय ठरला तर फक्त एका दिवसातील चार प्रमुख वृत्तपत्रे तुलनात्मक अभ्यासासाठी खूप झाली. प्रत्येक वृत्तपत्राचे शुद्धलेखन वेगळे. इतकेच काय, एकाच वृत्तपत्रातील प्रत्येक पानावरील शुद्धलेखन वेगवेगळे. आणि विविध चित्रवाहिन्यांवरील मराठी म्हणजे तर संशोधकांची चंगळच.
तात्पर्य: मराठी भाषा रोज मरत आहे.ज्यांना हे मान्य नाही त्यांनी थोडासा बदल करून, मराठी भाषा रोज घडत आहे असे म्हणावे.
--प्रल्हाद जाधव