मीरा भाईंदरमध्ये दहावीचे १० हजार ६०६ विद्यार्थी परीक्षेला
By धीरज परब | Published: March 2, 2023 07:28 PM2023-03-02T19:28:42+5:302023-03-02T19:29:11+5:30
वाहनकोंडीमुळे विलंब होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरा भाईंदर मध्ये १० विच्या परीक्षेसाठी १० हजार ६०६ विद्यार्थी बसले आहे . परीक्षेची २१ केंद्र असून २५ मार्च पर्यंत परीक्षा चालणार असल्याने केंद्रात पोहचायला वाहनकोंडी मुळे विलंब होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत.
शहरात असणारी वाहतूक कोंडी पाहता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी उशीर होऊ नये म्हणून मीरा भाईंदर वाहतूक शाखेने नियोजन केले आहे . शहरात मुख्य ठिकाणी व दहावी- बारावीच्या परीक्षेचे केंद्र असलेल्या शाळा व महाविद्यालय परिसरात वाहतूक पोलीस व वॉर्डन तैनात करण्यात आले आहेत.
दहावी व बारावी परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रात एक महिला व एक पुरुष पोलीस अंमलदार तसेच केंद्राच्या शंभर मीटर परिसरात २ पुरुष पोलीस अंमलदार व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान नेमले आहेत . शिवाय पोलिसांची फिरती गस्त वाहने वेळोवेळी परीक्षा केंद्र व परिसरात फिरून आढावा घेणार आहे . परीक्षेच्या अनुषंगाने पोलिसांनी मनाई आदेश लागू केले असल्याचे वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांनी सांगितले .